नवसमांतर मिथ्या
>> Wednesday, August 27, 2008
"मिथ्या' हे नाव सर्वांना कळण्याइतकं किंवा त्याहूनही अधिक म्हणजे जवळचं वाटण्याइतकं सोपं किंवा आकर्षक नाही. मात्र, इथं दिसणाऱ्या आशयाला चपखल बसणारं जरूर आहे. इथला नायक व्ही. के. (रणवीर शौरी) ज्या दुनियेत राहतो, तिचा आभासीपणा, खोटेपणा दिग्दर्शक रजत कपूर आपल्याला पहिल्या शॉटपासूनच दाखवतो. मात्र, या खोटेपणाची व्याख्या ही कथेच्या चढत्या आलेखाबरोबर अधिकाधिक गहिरी होत जाते. 15 वर्षं रंगभूमीवर काढल्यानंतर (किंवा थिएटर केल्यावर) हिंदी चित्रपटात सटरफटर काम शोधणाऱ्या व्ही. के.चं आयुष्य हाच पुढे एक आभास बनतो आणि त्यातलं खरं काय अन् खोटं काय हे त्याला आणि बऱ्याच प्रमाणात इतरांनाही कळेनासं होतं.
या चित्रपटाचे पोस्टर्स पाहिले तर वाटावं, की हा विनोदी सिनेमा आहे. काही प्रमाणात ते खरं आहे. मात्र, पूर्ण सत्य नव्हे. इथला विनोद हा विसंगती आणि विडंबनातून तयार होणारा आहे अन् प्रामुख्याने प्रासंगिक आहे. इथला प्रत्येक प्रसंग हा कमी-अधिक प्रमाणात हसवतो. मात्र, याचा संपूर्ण परिणाम हा विनोदी चित्रपट पाहिल्याचा नाही. तो आपल्याला विचार करायला लावणारा आहे.
"स्ट्रगलर' या लोकप्रिय नावाने ओळखल्या जाणाऱ्या जमातीचा व्ही.के. हा प्रतिनिधी. फालतू चित्रपटातून काम करून, मोठा होण्याची स्वप्नं पाहणाऱ्या हजारो कलाकारांपैकी एक. शेक्सपिअरचे संवाद त्याला तोंडपाठ आहेत, पण तो ज्या प्रकारच्या सूक्ष्म भूमिका करतो, तिथे या तयारीचा काहीच उपयोग नाही. चांगल्या भूमिकेच्या शोधात अन् हलाखीच्या परिस्थितीत राहणाऱ्या व्ही.के.चा अचानक गुन्हेगारी जगाशी संबंध येतो. राजेभाईसाब (पुन्हा रणवीर शौरी) नावाने ओळखल्या जाणाऱ्या एका गॅंगस्टरचा चेहरा त्याच्याशी मिळताजुळता असल्याचं गावडे (नसिरुद्दीन शाह) या विरोधी गॅंगप्रमुखांपैकी एकाच्या लक्षात येतं आणि एक कट रचला जातो. राजेला उडवून त्याच्या जागी व्ही. के. ला आणण्यात येतं अन् प्रथमच आव्हानात्मक वाटणारी भूमिका करण्याची संधी व्ही.के.पुढे चालून येते. तिही पडद्यावर नव्हे, प्रत्यक्षात.
"मिथ्या'बद्दल जी भिन्नं मतं प्रदर्शित केली जातात, त्यांचं चित्रपटाच्या पूर्वार्धाबद्दल एकमत असतं. तो उत्तम आहे, याबद्दल दुमत असल्याचं ऐकिवात नाही. मात्र, उत्तरार्धाबद्दल "तो गोंधळाचा आहे,' किंवा "शेवट फसला आहे,' इथपासून ते "शेवटानेच चित्रपटाला अर्थ मिळतो,' इथपर्यंत अनेक मतं आहेत. प्रेक्षक किंवा समीक्षक यातल्या कोणाचंच यावर एकमत दिसून येत नाही.
मला स्वतःला शेवट (आणि उत्तरार्धातला बराचसा भाग) पटला; किंबहुना "मिथ्या' या नावामधलं गांभीर्य आणि यातल्या नायकाच्या अस्तित्वाच्या प्रश्नाला हा शेवट खऱ्या अर्थानं टोकाला पोचवतो. केवळ एवढंच नाही, तर एका परीनं हा शेवट केवळ व्ही.के. किंवा सोनम (नेहा धुपिया)विषयी बोलत नाही, तर एकुणातच सामान्य माणसाच्या शोकांतिकेविषयी बोलतो. जग हे कसं प्रत्येकासाठीच मायावी आहे, सारं काही मिळूनही आपले हात कसे रिकामेच असतात आणि सुख हे कसं थोडक्यात आवाक्यापलीकडे राहतं, हे इथं दिसून येतं. रजत कपूर अन् सौरभ शुक्ला या पटकथाकारांना जर केवळ गंमत करायची असती, तर त्यांनी कथानकाचा शेवट हा सांकेतिक अर्थानं सुखांत केला असता. तो तसा केला जात नाही, याचाच अर्थ चित्रकर्त्यांना केवळ करमणुकीपलीकडे काही दिसणं अपेक्षित आहे.
पूर्वार्धावरून चित्रपटाचा आकार थोडा "डॉन' छापाचा वाटला, तरी तो तसा नाही. मध्यांतराजवळ येणारा एक धक्का (ज्याविषयी तपशिलात लिहिणं उचित होणार नाही.) त्याला या साच्यातून बाहेर काढतो. मात्र, त्याचं "थ्रिलर' हे स्वरूप शेवटापर्यंत तडजोडीशिवाय टिकवलं जातं आणि सुरवातीला पकडलेल्या विनोदाच्या सुरासकट. इथला विनोद हा मुद्दाम तयार केलेला वाटत नाही, तर रोजच्या निरीक्षणातून आलेला दिसतो. गुंड लोक व्ही.के.चे फोटो काढण्याचा प्रयत्न करत असताना, दर फोटोचा त्याचा चेहरा वेगवेगळ्या पद्धतीनं झाकला जाणं, किंवा मोबाईल कंपन्या रेंजबाहेर गेल्यावर सारखे मेसेज का पाठवतात, यासारखी निरीक्षणं, अशा आपल्या अनुभवातून येणाऱ्या गोष्टी वेगळ्या संदर्भात पडद्यावर येऊन हास्यकारक ठरतात. त्याचबरोबर गुन्हेगारीकडे पाहण्याचा तिरकस दृष्टिकोनही दिसतो. राजेला मारल्यावर व्हीकेच्या झालेल्या अवस्थेचा त्यानं शोधलेलं "आपण मघाशी खाल्लेला वडापाव खराब होता' यासारखं उत्तर आपसूकच हसू आणतं. त्याला असलेल्या विदारक पार्श्वभूमीसकट.
रजत कपूरच्या या आधीच्या दिग्दर्शक प्रयत्नाहून (रघू रोमिओ, मिक्स्ड् डबल्स) मिथ्या हा कितीतरी पटींनी अधिक वरचा आहे. केवळ तांत्रिक बाबीनंच नव्हे, तर तो जे सांगू पाहतो आहे, त्यातदेखील. अर्थात त्याचा बाज पाहता, तो पूर्णतः स्वतंत्र वाटत नाही; मात्र, चांगलं रूपांतर असणं, हेदेखील काही कमी नाही. कपूर, पाठक आणि शौरी यांचा हळूहळू एक स्वतंत्र प्रेक्षक वर्ग तयार होताना दिसतो आहे. आणि गेल्या काही वर्षांमधली या तिघांची कामगिरी पाहता, त्यात गैर काहीच नाही.
शौरी आणि पाठक हे मुख्य धारेतल्या चित्रपटांमध्ये त्यामानानं कमी लांबीच्या सहायक भूमिकांमध्ये हजेरी लावताना दिसून येतात; पण त्यांचा खरा कस लागतो, तो या प्रकारच्या निर्मितीत. रजत कपूरचीच निर्मिती असलेल्या "भेजा फ्राय'मध्ये विनय पाठकनं आपली किमया दाखवली होती, तर इथं शौरीनं एका अस्तित्वहीन कलावंताची शोकांतिका फार ताकदीनं पडद्यावर आणली आहे. हे दोघे विनोदाच्या आहारी न जाता, पडद्यावरल्या व्यक्तिमत्त्वाशी प्रामाणिक राहून प्रेक्षकांना हसवतात, जी गोष्ट गेल्या काही वर्षांत दुर्मिळ झाली होती.
मध्यंतरी समांतर चित्रपट बंद झाल्याची आवई उठली होती आणि बेनेगल, निहलानीसारख्यांनीही मुख्य धारेचाच आसरा घेतला होता. या दरम्यान, मुख्य धारेत केल्या जाणाऱ्या प्रयोगांची संख्या वाढली. मात्र, समांतर मंडळी ही काही प्रमाणात उपरीच राहिली. भेजा फ्राय, मिथ्यावरून हे दिसून येतं, की समांतर चित्रपटांची लाट अजूनही स्पष्टपणे स्वतंत्र वाटेलसं अस्तित्व टिकवून आहे. तिच्या स्वरूपात थोडा फरक पडला आहे. आणि आता अधिक वेगळं पाहण्याची तयारी असलेल्या प्रेक्षकांच्या कृपेनं तिला मिळणारा प्रतिसादही वाढता आहे. अर्थात हे जर टिकून राहायला हवं असेल, तर हा प्रतिसाद टिकायला हवा. भव्यपटांच्या स्पर्धेतही "मिथ्या'सारखी छोटी निर्मितीदेखील पाहिली जायला हवी, ती त्यासाठीच.
-गणेश मतकरी
0 comments:
Post a Comment