रिचर्ड लिन्कलेटर आणि बिफोर सनसेट

>> Saturday, November 1, 2008


स्लॅकर नावाचा चित्रपट. एका विशिष्ट पिढीची दिशाहिनता, त्यांचे वैचारिक गोंधळ, महत्वाकाक्षेचा अभाव यांचे चित्रण एवढाच या चित्रपटाचा हेतू. हे अधिकाधिक स्पष्टपणे मांडता यावे म्हणून दिग्दर्शकाने पारंपरिक रचना, तिचे कथेशी जोडलेले असणे आणि ठराविक उतार-चढाव यांना पूर्णपणे निकालात काढलेले. स्लॅकर आपली या विशिष्ट पिढीच्या अनेक प्रतिनिधींशी धावती भेट घडवतो. पण त्यासाठी तो कथेचा आधार न घेता केवळ सुटे सुटे प्रसंग एकापुढे एक रचत जातो. त्यांना जोडतात ती केवळ एका ठिकाणाहून दुस-या ठिकाणी जाणारी पात्रे. म्हणजे एका प्रसंगातली व्यक्तिरेखा जेव्हा तो प्रसंग संपताच बाहेर पडते, तेव्हा कॅमेरादेखील तिच्याबरोबर बाहेर पडतो. तिचा माग काढत तो आपसूकच दुस-या प्रसंगात जाऊन पोचतो. तिथला कार्यभाग संपताच इतर कोणी बाहेर पडते. त्यांच्याबरोबर कॅमेराही.
असा तुकड्यातुकड्यांचा बनलेला असूनही, सांकेतिक मांडणी नसूनही किंवा नसल्यामुळेच स्लॅकर जो परिणाम साधतो, तो अगदी थेट आहे. कोणत्याही कृत्रिमतेपासून मुक्त पाहणा-याला ताजेतवाने करणारा. स्लॅकरचा आणखी एक विशेष हा, की दिग्दर्शक रिचर्ड लिन्कलेटरच्या या चित्रपटाने स्टीवन सोंडरबर्गच्या सेक्स, लाईज अँड व्हिडीओटेपबरोबर मिळून अमेरिकेतल्या इण्डिपेंडंट फिल्ममेकिंगच्या चळवळीला मुख्य प्रवाहात आणले. अनुक्रमे १९९१ आणि १९८९मध्ये आलेल्या या दोन चित्रपटांनी अनेक नव्या चित्रकर्त्यांना प्रोत्साहन दिले आणि अमेरिकन चित्रपटाला निर्बुद्ध समजणा-या अनेकांना आपल्या संकल्पनांचा पुनर्विचार करायला भाग पाडले.

इंडिपेंडंट फिल्ममेकिंगला जवळजवळ अमेरिकेतला समांतर सिनेमा म्हटले तरी चालेल. हॉलीवूडबाहेर स्वतंत्रपणे काम करणारे. पण वितरणासाठी काही वेळा स्टुडिओंची मदत घेणारे हे चित्रकर्ते ही आजच्या जागतिक चित्रपटांची एक महत्त्वाची शाखा आहे. विषयांची विविधता, अर्थकारणासारख्या कालबाह्य गोष्टींकडे असणारे दुर्लक्ष, मर्यादित बजेट आणि कलेसंबंधातला प्रामाणिकपणा ही या शाखेची व्यवच्छेदक लक्षणे म्हणावी लागतील. मात्र या शाखेचेही दोन प्रमुख भाग पडलेले दिसतात.
पहिल्या भागातली मंडळी ही प्रामुख्याने नवोदित आहेत. मुख्य धारेत प्रवेश मिळावा म्हणून ही थोडक्यात पण साधारण हॉलीवूड शैलीतलेच चित्रपट बनविण्य़ासाठी झगडतात. आठ आणि सोळा मिलीमीटरच्या किंवा डिजिटल कॅमे-यावर नेहमीचा हॉलीवूड मसाला, स्पेशल इफेक्ट्स वगैरे आणून या फिल्म्स आपल्याला कुण्या स्टुडिओच्या नजरेत आणता येतील, असा त्यांचा प्रयत्न असतो. वैद्यकीय प्रयोगशाळेला स्वतःवर प्रयोग करायला देऊन मिळालेल्या सात हजार डॉलर्समध्ये अल् मिराची (१९९३) केलेला आणि लवकरच मिरामॅक्सच्या नजरेत येऊन प्रस्थापित झालेला रॉबर्ट रॉड्रिग्ज मुळात याच प्रकारातला. मात्र पुढे हॉलीवूड शैलीत राहूनही त्याने स्टुडिओचा अंकुश नाकारला आणि स्वतंत्र काम करणेच पसंत केले.

दुस-या भागात येणारे चित्रकर्ते हे थोडे विचारवंत म्हणण्याजोगे. मोठ्या प्रमाणात वाचन, नाटकांची आवड, तत्वज्ञान, मानसशास्त्रासारख्या विषयात रस असणारे हे लोक आपले विषय मुळातच लोकप्रियतेच्या चाैकटीबाहेरचे विषय निवडणारे. रिचर्ड लिन्कलेटर मुख्यतः या प्रकारातला. गेल्या काही वर्षांमध्ये मोजके चित्रपट हॉलीवूडसाठी देखील करणारा, पण प्रामुख्याने स्वतंत्र.
आपले विचार समोरच्यापर्यंत पोचावेत ही इच्छा या दिग्दर्शकाच्या डोक्यात पहिल्यापासूनच असणार. कारण त्याची महत्त्वाकांक्षा ही चित्रपटसृष्टीत जाण्याची नव्हती, तर लेखक होण्याची होती. त्यासाठी महाविद्यालयीन शिक्षणात त्याने साहित्य हा विषय निवडला होता. पुढे अचानक त्याने शिक्षण सोडले आणि मेक्सिकोतल्या एका ऑईल रिगवर कामाला लागला. या काळात त्याने चिकार वाचन केले. आणि जमेल तेव्हा ह्यूस्टनमध्ये जाऊन चित्रपट पाहिले. ही त्याच्या चित्रपटप्रेमाची सुरूवात. ऑईल रिगवरल्या दिवसात मिळालेल्या पैशांचा वापर त्याने सुपर-८ कॅमेरा, प्रोजेक्ट आणि संकलनाची काही मूलभूत उपकरणे घेण्याकरता केला आणि ऑस्टिनमध्ये जाऊन स्थायिक झाला. इथल्या टेक्सास युनिव्हर्सिटीमध्ये त्याने फिल्म सोसायटीची स्थापना केली आणि ब्रेसाँ,ओझूसारख्या आवडत्या दिग्दर्शकांचा अभ्यास सुरू केला.
लिन्कलेटरला स्लॅकरपर्यंत पोचायला काही वर्षे लागली. चित्रपटाचे तंत्रशुद्ध शिक्षण न घेता त्याने स्वतःच काही प्रयोग करायला, शॉर्ट फिल्म बनवायला सुरुवात केली. मग वर्षभर लावून इट्स इम्पॉसिबल टू लर्न टू प्ले बॉय रिडिंग बुक्स (१९८९) हा चित्रपट बनवला. आणि त्यानंतर दोन वर्षांनी स्लॅकर.

स्लॅकरमध्ये लिन्कलेटरच्या चित्रपटाची अनेक वैशिष्ट्ये दिसून आली. कथेची आवश्यकता न वाटणे. स्वतंत्रपणे विविध कल्पना आणि विषय पसंत पडून त्यांची सांगड घालण्याचा प्रयत्न करणे, दिशाहीन व्यक्तिरेखा प्रामुख्याने वापरणे आणि दिशाहीनता प्रत्यक्ष पडद्यावर दाखविण्याचा प्रयत्न करणे, संवादामध्ये कथेशी थेट संबंध नसलेल्या, पण तरीही चमकदार कल्पनांवर चर्चा/वाद घडवून आणणे, मांडणीचे सांकेतिक नियम न पाळणे इत्यादी इत्यादी. डेझ्ड अँड कन्फ्यूज्ड (१९९३), वेकिंग लाईफ (२००१ याला स्लॅकरचा जुळा चित्रपट म्हणता येईल. केवळ अँनिमेशनचा वापर करून बनलेला.) सारख्या चित्रपटांत त्याच्या या शैलीचा वापर दिसून येतो. पण हाच वापर अधिक प्रगल्भ होऊन एका कथेच्या आणि दोन चिरकाल स्मरणात राहतील अशा व्यक्तिरेखांच्या संदर्भात येतो. तो बिफोर सनराईज (१९९५) आणि बिफोर सनसेट (२००४) या जोड चित्रपटांत. जेसी (इथन हॉक) आणि सेलीन (ज्युली डेल्पी) या दोघांची नऊ वर्षांच्या अंतराने आलेल्या दोन दिवसांत घडणरी प्रेमकथा हा लिन्कलेटरच्या कारकिर्दीचा उत्कर्षबिंदू आहे. दोन्हीला कथानक नाममात्र. पहिल्या भागात अमेरिकन जेसी आणि फ्रेंच सेलिन एकमेकांना व्हिएन्नात भेटतात. अन् ताबडतोब एकमेकांच्या प्रेमात पडतात. त्यांनी भटकत, गप्पा मारत काढलेला हा दिवस बिफोर सनराईजमध्ये येतो. लिन्कलेटरच्या व्यक्तिरेखांच्या कॅरेक्टरीस्टीक असुरक्षिततेमुळे त्यांना वाटते, की कदाचित हे प्रेम आपण एकमेकांना भेटत राहिलो तर टिकणार नाही. त्याची परीक्षा म्हणून ही दोघे ठरवितात की आपले प्रेम मनात टिकून राहते का पाहायचे. सहा महिने एक दुस-याच्या संपर्कात राहायचे नाही. येता येऊ नये म्हणू एक दुस-याची काहीच माहिती जाणून घ्यायची नाही. पण सहा महिन्यानंतर अमूक जागी भेटायचे. ही दुसरी भेट येते बिफोर सनसेटमध्ये. पण सहा महिन्यांनी नव्हे. तर नऊ वर्षांनी.

बिफोर सनसेट हा या जोडीतला उजवा आणि पर्यायाने लिन्कलेटरचा सर्वोत्कृष्ट चित्रपट आहे. एका दृष्टीने पाहायचे तर ही साधी प्रेमकथा (तीही आर्धी) आहे. पण दुस-या बाजूने ती प्रत्येकाच्या आयुष्याविषयी काहीतरी सांगते. हा चित्रपट जवळजवळ रिअल टाईममध्ये घडतो, म्हणजे चित्रपट जितका वेळ चालतो. तितकाच वेळ ते कथानक घडायलाही लागतो. याची सुरुवात होते चित्रपट प्रदर्शित होण्याच्या कालावधीपासून. जेसी, सेलिनला भेटल्याला जशी चित्रपटात नऊ वर्षे होऊन गेली आहेत, तसे बिफोर सनराईज आणि बिफोर सनसेट यांच्या प्रदर्शित होण्यातही नऊ वर्षाचेच अंतर आहे. इथे जेसीने आपल्या सेलिनबरोबरच्या भेटीवर एक पुस्तक लिहिले आहे. जे चिकार लोकप्रिय आहे. त्याच्या प्रसिद्धीसाठी तो फ्रान्समध्ये आला आहे. आणि निघायला तासभर असताना त्याला सेलिन भेटते. तिने पुस्तक वाचलेले, आणि तो येणार हे कळल्याने त्याला भेटायला आलेली. थो़डी प्रस्तावना आणि पुढे जेसीची निघायची वेळ होईपर्यंतचा कालावधी चित्रपटात येतो. इथेही ते अनेक ठिकाणी फिरतात. अनेक विषयांवर बोलतात. मात्र इथे प्रेमाबरोबर आणखी एका गोष्टीला महत्व आहे. काहीतरी गमावल्याच्या. आपण एकमेकांची अधिक माहिती न करून घेतल्याने आयुष्याची नऊ वर्षे फुकट घालवली आणि आता भविष्यकाळही संदिग्ध आहे, असे हा चित्रपट सुचवतो. त्यात हरवलेले सापडल्याचा आनंद आहे आणि मुळात हरवल्याचे दुःखही. ही भावना चित्रपटाला प्रेमकथेपलीकडे पोचवते.
सनसेटमध्ये कॅमेरा हा जवळजवळ अदृश्य आहे. त्याचे अस्तित्व हे आपल्याला जाणवतही नाही. तो या दोघांबरोबर अनेक ठिकाणी सतत फिरतो. पण दृश्याचा संपूर्ण नैसर्गिकपणा कुठेही सुटत नाही. रिअलटाईमचा पडद्यावरला वापर कठीण असतो. तसेच काही निश्चित घडत नसताना प्रेक्षकांचे लक्ष वेधून ठेवणेही. आपण या दोन व्यक्तींच्या आय़ुष्यातला दीड तास कोणत्याही आडपडद्याशिवाय पाहतोय, हे दाखवायला जितका हा अदृश्य कॅमेरा जबाबदार आहे. तितके संवादही. हे संवादही नियम पाळत नाहीत. एरवीच्या आयुष्यात आपण अनेक असंबद्ध विषयांवर बोलत राहिलो तरी चित्रपटातली पात्रे बहुदा कथेसंबंधातच बोलताना दिसतात. इथे मात्र जेसी आणि सेलीन या बंधनापासून मुक्त आहेत. ही संपूर्ण संहिता केवळ एक आकार ठरवून संपूर्णपणे इम्प्रोवाईज केली असावी, अगदी संदर्भासकट कारण श्रेयनामावलीत संवादांचे श्रेय दिग्दर्शक आणि कलाकारांना एकत्रितपणे दिलेले आहे. या रचत जाण्याच्या पद्धतीमुळेच दिग्दर्शकाने छोटे शॉट्स घेण्याचे टाळून अनेकदा मोठ्या तुकड्यांमध्ये प्रसंग चित्रित केले आहेत. शक्य तितक्या प्रसंगांचा प्रवाहीपणा शाबूत ठेवून अनेकदा नव्या पिढीच्या दिग्दर्शकांमध्ये दिसणारा तंत्रकाैशल्य दाखविण्याचा उत्साह इथे दिसत नाही. त्याऐवजी वास्तववादावर भर दिलेला दिसून येतो.
सनराईज-सनसेट चित्रद्वयीला लिन्कलेटरचे प्रातिनिधीक चित्रपट म्हणता येतील. दिग्दर्शक इथे महत्व देतो ते आहे ते व्यक्तिरेखांना. त्या कोणत्या परिस्थितीत आहेत याहून अधिक महत्व त्या कोण आहेत, कुठून आलेल्या आहेत आणि यापुढला काळ त्यांना कुठे घेऊन जाणार आहे, याला आहे. त्यामुळे चित्रपट घडवणा-या घटना नाहीत. तर व्यक्तिरेखा आहेत.
लिन्कलेटरचा सिनेमा हा माणसांचा सिनेमा आहे. वेकिंग लाईफ आणि स्कॅनर डार्कलीमध्ये अँनिमेशन तंत्राचा वापर आहे. पण तोही व्यक्तिरेखांची खरी प्रवृत्ती बाहेर काढण्याच्या दृष्टीने उपयुक्त ठरणारा. इतर बाबतीत त्याला तंत्राचे प्रेम नाही. त्याच्या दृष्टीने तंत्र ही गरज आहे आणि पात्रे हा उद्देश. गेल्या पिढीतल्या मोठ्या दिग्दर्शकांच्या कामात कायम आढळणारा माणसांबद्दलचा कळवळा अपडेट करून यशस्वीपणे पडद्यावर आणणारा दिग्दर्शक म्हणून लिन्कलेटरचे नाव घेता येईल. तीच त्याची खरी ओळख ठरेल.
-गणेश मतकरी

6 comments:

Punekar November 1, 2008 at 8:43 AM  

ya I like your blog very much. Sorry I provided a link to your blog from my blog. I have to took permission b4 providing link.

rajnikant.
http://friday-movies.blogspot.com

Deepak Salunke November 3, 2008 at 8:33 AM  

Before Sunrise and Before Sunset ! I have watched these movies over n over again .. I just love these two ! They teach a lot about relations!!

Strongly recommended movies people !!!

I feel like watching them NOW !

Vivek Kulkarni March 23, 2013 at 7:55 AM  

हा लेख पूर्वी साप्ताहिक सकाळमध्ये आला आहे. त्यात फक्त सनराईज अन सनसेटबद्दलच होतं. इथे लिंकलेटरबद्दल. चित्रपट अजूनही बघितलेले नाहीत. एफबी ग्रुपमध्ये चर्चेसाठी येणार आहे पण मला सध्या शक्य नाही त्यामुळे यावर बोलता येणार नाही.

ganesh March 23, 2013 at 9:13 AM  

Its a modification . I was doing a series for Rupvani where I was writing about one director and his one important film . I had used it there.

Post a Comment

  © Blogger template Werd by Ourblogtemplates.com 2009

Back to TOP