एका राजकीय हत्येची गोष्ट

>> Monday, November 10, 2008


"डेथ ऑफ ए प्रेसिडेंट' ही मॉक्युमेंटरी आहे. यालाच बनावट माहितीपट असं म्हटलं तरी चालेल. अमेरिकेच्या एका राष्ट्राध्यक्षाची हत्या हा त्याचा विषय. अर्थातच माहितीपटाचा विषय संवेदनशील आहे हे उघडच आहे. वादग्रस्त कारकीर्द असलेले जॉर्ज डब्ल्यू बुश हे या माहितीपटाच्या केंद्रस्थानी आहेत. म्हणजेच ज्यांची हत्या अजून झालेली नाही, अशा राष्ट्राध्यक्षाच्या हत्येविषयीचा हा माहितीपट आहे.

"डेथ ऑफ ए प्रेसिडेंट'सारख्या चित्रपटाची गुणवत्ता क्षणभर बाजूला ठेवून प्रश्न विचारावासा वाटतो, की आपल्याकडे असा चित्रपट बनू शकतो का? आणि बनला तर तो प्रेक्षकांपर्यंत पोचेल का? यातल्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर बहुधा नाही असं आहे, मात्र दुसऱ्याचं एकशेएक टक्के नाही असेल, याबद्दल शंका नको. आपल्याकडे आविष्कार स्वातंत्र्य असं काही अस्तित्वात असल्याच्या भ्रमात मला वाटतं कोणीच नाही. कोणताही कलाविष्कार- मग ती चित्रं असोत, लेखन किंवा चित्रपट- हा वाद उत्पन्न करणार, अशी शंका जरी आली तरी त्यावर तत्काळ बंदी घातली जाते. ही कलाकृती जर वाईट असेल तर रसिकच तिला नाकारतील आणि जर ती दर्जेदार असेल, तर ती रसिकांपर्यंत पोचू न देण्याचा अधिकार आपल्याला कोणी दिला, असा विचार आपल्या तथाकथित संस्कृतिरक्षकांच्या मनाला शिवत नाहीत. मग हे रक्षक सेन्सॉरबोर्डाचे सदस्य असोत, एखाद्या राजकीय पक्षाचे नेते असोत किंवा सरकारी बंदे.
"डेथ ऑफ ए प्रेसिडेंट' ही मॉक्युमेंटरी आहे किंवा बनावट माहितीपट म्हटलं तरी चालेल. अमेरिकेच्या एका राष्ट्राध्यक्षांची हत्या हा त्याचा विषय आहे. राष्ट्रपुरुषांच्या हत्या हा आपल्यासारखाच अमेरिकेच्याही जिव्हारी लागणारा विषय आहे. लिंकन, गारफील्ड, मॅकिन्ली आणि केनेडी या चार राष्ट्राध्यक्षांची हत्या झालेली आहे. इतर अनेकांच्या हत्येचे प्रयत्न झाले आहेत. जॉन केनेडीच्या रॉबर्ट या भावाची हत्या तो राष्ट्राध्यक्षपदाच्या स्पर्धेत असतानाच झालेली आहे. त्यामुळे चित्रपटाचा विषय संवेदनशील आहे, हे उघडच आहे. त्यातून दिग्दर्शक गॅब्रिएल रेंज ज्या राष्ट्राध्यक्षाच्या हत्येविषयी बोलताहेत त्याची हत्या अजून झालेलीच नाही. या चित्रपटाच्या केंद्रस्थानी असलेल्या जॉर्ज डब्ल्यू बुश यांची कारकीर्द अजून तरी सुरळीतपणे चालू (आता काही दिवसांसाठी) आहे... वादग्रस्त आणि असंतोष पसरवत असूनही.
संवेदनशील विषयाचं अस्सल चित्रण
2007 च्या ऑक्टोबरमधला एक दिवस या माहितीपटातला प्रमुख घटनाक्रम घडवतो. या दिवशी बुश शिकागोमध्ये एका फंड रेझरला उपस्थित राहण्यासाठी जातात आणि हा दिवस त्यांच्यासाठी अखेरचा ठरतो. "डेथ ऑफ ए प्रेसिडेंट' सादर होतो तो नॅशनल जॉग्रफिक, डिस्कवरी वगैरे चॅनेलवर पाहायला मिळणाऱ्या या प्रकारातल्या माहितीपटांच्या शैलीत. यातला अर्धा भाग बुश यांच्या आयुष्यातला तो दिवस आपल्यापुढे आर्कायवल फुटेजमधून मांडतो. उरलेला अर्धा भाग लक्ष केंद्रित करतो तो या हत्येच्या तपासावर. ती कशा प्रकारे करण्यात आली त्याची माहिती, घटना क्रमवार लावण्याचा प्रयत्न, संबंधित लोकांच्या मुलाखती, बुशच्या राजकीय विचारसरणीचा घटनेशी लागू शकत असणारा संबंध, हा भाग इथे दिसतो.
एक गोष्ट इथे स्पष्ट आहे, की माहितीपट खरा वाटण्यात दिग्दर्शकाने कोणतीही कसर सोडलेली नाही. बुशच्या शिकागोतल्या हालचाली दाखवणारा भाग याचं अस्सल उदाहरण आहे. या प्रकारे व्यक्तीच्या हालचाली दाखवायच्या तर माहितीपट बनवणाऱ्यांना अनेक प्रकारचं चित्रण नजरेखालून घालावं लागतं. न्यूज चॅनेल्सचे वृत्त छायाचित्रकार रस्त्यावर फिरायला येणारे हौशी पर्यटक यांच्यापासून ते सुरक्षेसाठी जागोजाग लावलेल्या सर्वेलन्स कॅमेऱ्यापर्यंत सर्वांनी केलेलं. यांचा दर्जा, स्पष्टपणा आणि नेमकेपणा यात नेहमीच मोठा फरक असतो. हा फरक इथं ध्यानात घेतला आहे. समोर दिसणारी नोंद ही खरोखरच अनेक ठिकाणांहून आलेली असावी, असं इथं वाटून जातं. काही वेळा व्हिडिओ चित्रण मिळत नाही तेव्हा फोटो दाखवले जातात, तेही खरंच वाटतं.
प्रत्यक्ष हत्येचा प्रसंगही असाच. हा पाहताना मला "ब्लेअर विच प्रोजेक्ट' या गाजलेल्या भयपटाची आठवण झाली. तिथे कल्पना अशी होती, की पुढं बेपत्ता झालेल्या काही विद्यार्थ्यांनी आपल्याला आलेल्या अतींद्रिय अनुभवाचं केलेलं चित्रण आहे. हे चित्रण खरंखुरं असल्याचा आभास आहे, सिनेमासाठी इफेक्ट्स वापरून केल्यासारखं नाही, त्यामुळे प्रत्यक्षात मुलं जीव वाचवून पळत असताना पडद्यावर फार काही दिसेलशी अपेक्षा नाही. भीती तयार होते, ती हे खरं असल्याच्या आभासाने आणि कॅमेरा, त्याचबरोबर घटनेच्या गतीने. डेथ ऑफ ए प्रेसिडेंटमध्येही महत्त्व आहे ते हत्या प्रत्यक्ष दिसण्याला नाही, तर दिसणाऱ्या तुकड्यांमधून जे घडतंय ते खरं वाटण्याला. कारण प्रत्यक्षात हा प्रयत्न अनपेक्षित असल्याचंच चित्रपट दाखवतो. त्यामुळे चित्रीकरण असेल ते तपशिलातलं नाही, तर घटनेचं गांभीर्य आणि घबराटीमधून तयार होणाऱ्या गोंधळाच्या वातावरणाचं. या संपूर्ण भागात जेव्हा बुश दाखवला जातो तेव्हा ते फुटेज कोणा अभिनेत्याचं नसून खऱ्या राष्ट्राध्यक्षांचंच असल्याने अस्सलपणा अधिकच वाढतो.
यापुढच्या भागातही मुलाखतींमध्ये दिसणारी पात्रं ही खरी वाटणारी आहेत आणि लेखक दिग्दर्शकाने या मुलाखती कोणाच्या असाव्यात, यावरही विचार केलेला जाणवतो. मात्र एकदा प्रयत्न गंभीरपणे केलेले असल्याचं लक्षात घेतलं की काही प्रश्न संभवतात.
एक म्हणजे हा केवळ स्टंट आहे का? आणि स्टंट असला तरी तो दुर्लक्ष करण्याइतक्žया खालच्या दर्जाचा आहे का? दुसरं, चित्रपटाचा मूळ हेतू केवळ धक्का देण्याचा आहे, की त्यापलीकडे जाणारा? आणि या हेतूत तो सफल होतो का? शिवाय चित्रपट बुशला कोणत्या दृष्टीने चित्रित करतो हेदेखील महत्त्वाचं आहे.
पहिल्या प्रश्नाचं उत्तर सोपं आहे. कारण जेव्हा इतक्या मोठ्या व्यक्तीचं नाव या प्रकारे वापरलं जातं आणि विषय हाच चित्रपटाला वादग्रस्त करण्याची शक्यता बाळगतो तेव्हा तो एका पातळीवर स्टंट असतो, हे उघड आहे. या नावाचा वापर आणि त्याला खऱ्या घटनेसारखं पडद्यावर मरायला लावणं हे कुठेतरी लोकांचं लक्ष वेधण्यासाठी कारणीभूत होणारं आहे- जे चित्रकर्त्यांना अपेक्षित आहे. त्यामुळे प्रयत्न हे शंभर टक्के प्रामाणिक म्हणता येणार नाहीत. मात्र ते जितके काळजीपूर्वक केले आहेत, त्याने त्यांच्याकडे दुर्लक्ष करणंही शक्य नाही. मायकेल मूर ज्या प्रकारे फॅरेनाईट 9/11 मध्ये बुशच्या धोरणांची टिंगल करतो, तसे प्रयत्न इथे दिसत नाहीत. उलट संबंधित लोकांकडून अनेकदा बुशविषयी चांगलंच बोललं जातं. त्याची स्थितप्रज्ञता, त्याला जनतेबद्दल असणारा कळवळा, त्याच्या मतांना असणाऱ्या विरोधालाही स्वीकारण्याची त्याची तयारी, आपल्या योजनांचं महत्त्व लोकांना काही दिवसांनी कळेल, असा विश्žवास यासारख्या मुलाखतींमध्ये उल्लेखलेल्या गोष्टी बुशला एक कणखर व्यक्तिमत्त्व म्हणूनच उभं करतात. याउलट विरोधकांचं चित्र थोडं डाव्या हातानं रंगवलं जातं. मात्र ही दिग्दर्शकाची खेळी आहे काहीशी फसवी. वरवर तो असं दाखवतो, की आपण बुशला सकारात्मक अन् विरोधकांना नकारात्मक असल्याचं दाखवतोय. प्रत्यक्षात तो बुशला एक व्यक्ती म्हणून उभा करतो आणि मग त्याच्या विचारातल्या, धोरणातल्या त्रुटी अभ्यासतो. याउलट आंदोलकांना अपरिपक्व म्हणून दाखवताना तो अखेर बुशच्या मारेकऱ्याला समजून घेण्याचा प्रयत्न करतो. शेवटी बाजू बदलतात, मात्र त्या सहजपणे आणि कुठेही भडक, अतिरंजित किंवा ढोबळ बनण्याचा प्रयत्न न करता.
डेथ ऑफ ए प्रेसिडेंटची जात माहितीपटाची असली तरी रचना ही रहस्यपटाची आहे. त्यामुळे प्रेक्षक नुसता वैचारिक वादात अडकत नाही. बुशचा खुनी कोण, हे पहिल्या झटक्यात उघड होत नाही. नवनवे संशयित समोर येतात, नवे पुरावे उलगडतात आणि प्रेक्षक बांधलेला राहतो. मात्र हे संशयित कोण आहेत आणि त्यांच्यावरचं संशयाचं पारडं कसं बदलत राहतं हेदेखील चित्रपटामागे दडलेल्या राजकीय युक्तिवादाचाच एक भाग आहे. या युक्तिवादाचा संबंध आहे तो बुशच्या राजकीय विचारशैलीशी- जी चित्रकर्त्यांना मंजूर नाही. बुशच्या धोरणांचे होणारे विपरीत परिणाम उघड करण्याचा हा चित्रकर्त्यांचा प्रयत्न आहे... उघड टीका टाळून, पण प्रेक्षकांना हव्या त्या दिशेकडे हलकेच वळवून.
एक प्रयत्न म्हणून डेथ ऑफ ए प्रेसिडेंट उल्लेखनीय आहेच, शिवाय एक प्रयोग म्हणूनदेखील.
- गणेश मतकरी

0 comments:

Post a Comment

  © Blogger template Werd by Ourblogtemplates.com 2009

Back to TOP