बुद्धिनिष्ठ सूडकथा
>> Wednesday, November 12, 2008
सूडकथांवरचे चित्रपट आपल्या प्रेक्षकांसाठी नवे नाहीत. या चित्रपटांची एक ढोबळ रचना ठरलेली असते. अशा साचेबद्ध सूडकथेत ऍक्शन थ्रिलरवर भर असतो. "द ब्रेव्ह वन' या चित्रपटाने मात्र सूडकथांना एक वेगळी दिशा दाखवली आहे. व्यक्तिरेखेतील अस्वस्थ मानसिकता, संदिग्धता दर्शवत एक बुद्धिवादी दृष्टिकोन या चित्रपटाने समोर ठेवला आहे.
नुकता मी स्कोर्सेसीचा टॅक्सी ड्रायव्हर (1976) पुन्हा बघितला. न्यू यॉर्कच्या रस्त्यावर टॅक्सी चालवणाऱ्या ट्रॅविस बिकलच (रॉबर्ट डी निरो) हळूहळू भ्रमिष्ट होत जाणं त्यात पहायला मिळतं. न्यू यॉर्कच्या रस्त्यावरल्या गुन्हेगारीला निपटून काढण्यासाठी, हे रस्ते "स्वच्छ करण्यासाठी ट्रॅविस शस्त्र उचलतो. अखेर त्याच्या हातून पुण्यकर्म घडतं तेही जवळजवळ अपघातानेच. एका बारा-चौदा वर्षांच्या मुलीला वेश्या व्यवसायातून ट्रॅविस सोडवतो. मात्र, तो स्वतः आपल्या दुःस्वप्नातून पूर्ण जागा होतो का, ते मात्र स्पष्ट होत नाही.
टॅक्सी ड्रायव्हर आठवण्याचं कारण म्हणजे "द ब्रेव्ह वन'. टॅक्सी ड्रायव्हरमधल्या शाळकरी वेश्येचं काम करणारी जोडी फॉस्टर इथे नायिकेच्या भूमिकेत आहे आणि ट्रॅविसप्रमाणे तीदेखील इथे सशस्त्र "स्वच्छता' मोहीम सुरू करताना दिसते, पण आठवण होण्याचं आणखी एक कारण आहे. स्कोर्सेसीचा टॅक्सी ड्रायव्हर मांडत असलेलं कथानक हिंसाचाराला पडद्यावर आणत असलं तरी त्याच्यात महत्त्व आहे ते मानसिकतेला. व्यक्तिरेखेच्या मनात खोलवर शिरून त्याच्या वागणुकीचा अर्थ लावता येतो का, हे टॅक्सी ड्रायव्हर पाहतो. "द ब्रेव्ह वन' चा प्रयत्नही काहीसा तसाच आहे.
ब्रेव्ह वन ही मुळात सूडकथा म्हणता येईल. या प्रकारात मोडणारे चित्रपट बऱ्याच प्रमाणात पहायला मिळतात. बॉलिवूड / हॉलिवूड दोन्हीकडे याची मुबलक उदाहरण पाहता येतील. दोन्हींमध्ये फरक इतकाच, की हॉलिवूडमध्ये नायक - नायिकांवर होणारे अन्याय हे तरुण वयातच झालेले असतात, ज्यानंतर बदला घेण्याची प्रक्रिया लगेच सुरू होते. आपल्याकडे मात्र असं काही वयाचं बंधन नाही. अन्याय समजत्या वयात, बालपणी, कधीकधी अगदी गेल्याजन्मी झालेलाही असू शकतो, सूडासाठी निमित्त महत्त्वाचं. वेळ काळाशी कोणाला देणंघेणं आहे?
सूडपट हा एक ढोबळ चित्रप्रकार मानला, तर या चित्रपटाला सामावणारा त्यातला एक उपविभाग म्हणता येईल. प्रमुख व्यक्तिरेखेच्या प्रियजनांवर झालेला अन्याय, नाइलाजाने उचललेलं अस्त्रं, विशिष्ट व्यक्तीपेक्षा प्रवृत्तीवर उगवलेला सूड आणि कायद्याच्या पुरेशा लांब हाताचं शेवटच्या आसपास नायका (किंवा नायिके) पर्यंत पोचणं, हे या उपविभागाचे प्रमुख टप्पे. या उपविभागातला सर्वांत नावाजला गेलेला चित्रपट म्हणजे चार्ल्स बॉन्सनचा डेथ विश (1974). आपल्याकडेही सिनीयर बच्चनना घेऊन इंद्रजित (किंवा अशाच काहीशा) नावाने याची देशी आवृत्ती निघाली होती; पण ती त्यांच्या पडत्या काळात आल्याने अन् त्याच्या अँग्री ओल्ड भूमिकांना लोक कंटाळल्याने फार कोणी पाहिली नाही, असो.
रचनेच्या बाबतीत ब्रेव्ह वन या टप्प्यांचाच आधार घेतो. मात्र, "डेथ विश'सारखे चित्रपट जिथे प्रत्यक्ष ऍक्शनकडे महत्त्व देतात, तिथे हा चित्रपट त्यातल्या वैचारिक बाजूला समोर आणण्याचा प्रयत्न करतो. यातलं प्रमुख पात्र आपल्या वागण्याने अस्वस्थ होतं. आपण निवडलेला मार्ग बरोबर आहे का? असा न्याय करण्याचा अधिकार आपल्याला कोणी दिला?
आपण कायद्याच्या कोणत्या बाजूला आहोत यावर आपल्या हातून घडणाऱ्या कृत्याची भयानकता अवलंबून असते का? आज आपल्यात आलेलं हे बळ आजवर कुठ होतं, असे अनेक प्रश्न या चित्रपटाच्या नायिकेला पडतात आणि ती प्रेक्षकालाही ते वेळोवेळी विचारत राहते. यातला एक प्रश्न चित्रपट आपल्या पोस्टर्सवरदेखील मिरवतो. "हाऊ मेनी राँग्ज टू मेक इट राईट'?
इथली एरिका (जोडी फॉस्टर) ही रेडिओवर एक स्ट्रीटवॉक नावाचा कार्यक्रम करते, शहराच्या बदलत्या स्वरूपाबद्दलच्या टिपणीसारखा. तिचं डेव्हिडशी लग्न ठरलेलं आहे. कार्यक्रम लोकप्रिय आहे, थोडक्यात ती अगदी आनंदी आहे. पण एका संध्याकाळी दोघं फिरायला गेले असताना काही गुंड दोघांना बेदम मारतात. डेव्हिड मरतो आणि एरिका बराच काळ बेशुद्धावस्थेत जाते.
शुद्धीवर आल्यावर या धक्क्यातून सावरायचा प्रयत्न करताना, स्वसंरक्षणासाठी ती काळ्या बाजारातून एक पिस्तूल मिळवते आणि खरोखरच एका प्रसंगी ते वापरण्याची पाळी येते. हातून पहिली हत्या घडल्यावर आणि हे कृत्यं उघडकीला न आल्यावरही ती जाणूनबुजून कायदा हातात घेत नाही. पुन्हा असाच प्रसंग आल्यावरच ती शस्त्र उगारते.
एरिका आणि या हत्यांचा तपास करणारा पोलिस अधिकारी मर्सर (टेरेन्स हॉवर्ड) यांच्यात हळूहळू तयार होणारं नातंदेखील या चित्रपटाला एका वेगळ्या वळणावर नेतं. दिग्दर्शक नील जॉर्डन (द क्रामिंग गेम, मायकेल कॉलिन्स, मोनालिसा) यांनी ते रोमान्सच्या जवळ न जाता, एक विश्वासाचं आणि आदराचं नातं होईल याची काळजी घेतली आहे. त्यांच्यातली प्रत्येक भेट हे अत्यंत काळजीपूर्वक आणि विचार करून केलेल्या संवादलेखनाचं उदाहरण म्हणता येईल. मर्सरची मुलाखत घेताना एरिकाला कळतं, की त्याच्याही हातून पूर्वी हत्या झालेली आहे. यावर उघडपणे संभवणारे भावनेला आवाहन करणारे प्रश्नं न विचारता एरिका त्याला पिस्तूल चालवताना तुझे हात व्यापले होते का? असं विचारते. हा प्रश्न तिच्या स्वतःच्या अनुभवाशी जोडलेला तर आहेच; वर तो गुन्हेगाराच्या मानसिकतेशीही संबंधित आहे. शिवाय वास्तवाशी घट्ट बांधलेला.
ब्रेव्ह शेवटाकडे मात्र थोडा हळवा होतो आणि किंचित सुखात शेवटाकडे येतो. अर्थात हे सुखान्त असणं म्हणजे "आणि ते सुखाने राहू लागले' छापाचं नाही, मात्र उत्तरच नसलेल्या प्रश्नावर सावध उपाय सुचवण्यासारखं आहे. दिग्दर्शक शेवट खोटा न वाटण्यासाठी मर्सरच्या भूमिकेचा चांगला वापर करतो. शेवटाकडे येणाऱ्या मर्सर आणि एरिकामधल्या कॅफेतल्या प्रसंगातलं मर्सरच वक्तव्य हे एरिकापेक्षा प्रेक्षकांच्या मनाची तयारी करण्यासाठी आहे. मात्र, एव्हाना आपल्याला चित्रपटाच्या बुद्धिवादी दृष्टिकोनाची इतकी सवय झालेली असते, की त्याने अचानक सोपा मार्ग निवडणं आपल्याला पचत नाही.
असं असूनही चित्रपट एरिका पूर्णपणे माणसात आल्याचं मात्र सुचवू पाहत नाही. ट्रॅविस बिकल प्रमाणेच तिच्यासाठीही पुढलं पाउल संदिग्ध आहे. तिच्या मनातला गोंधळही पूर्णपणे शमलेला नाही. मानसिक स्थित्यंतर हा मूळ आधार असेल्या चित्रपटाच्या दृष्टीने हे योग्यच आहे; किंबहुना हे निश्चितपणे दर्शवल्याने आपण त्यातल्या एका तडजोडीकडे दुर्लक्ष करू शकतो.
ऍक्शन थ्रिलर या छापात सराईत होऊन गेलेल्या सूडाच्या प्रवासामधला हा प्रवास पाहण्यासारखा आहे आणि खरं तर अनुकरण करण्यासारखादेखील. याचा अर्थ मला नेहमीसारखी नक्कल अपेक्षित नाही, मात्र ज्याप्रकारे ब्रेव्ह वन त्याच्या तथाकथित फॉर्मेटच्या पलीकडे जाण्याचा प्रयत्न करतो आणि दृष्टिकोनात प्रगल्भता ठेवतो, त्या वृत्तीचं अनुकरण मात्र आपल्या सूडपटांना नवी दिशा देणारं ठरू शकेल. सध्याच्या कॉमेडी लाटेला कदाचित थोपवणारंदेखील.
-गणेश मतकरी
2 comments:
मलाही ब्रेव्ह वन आवडतो पण राहून राहून वाटते ज्युडी फॉस्टर नसती तर अजून चांगला वाटला असता हा चित्रपट, कधी कधी तिच्या अभिनयात तोच तोच पणा येतो आणि मग चित्रपटपण एकसुरी वाटायला लागतो.
thats an interesting observation. i would have thought it actually helps that she is there. lets see if anyone else has an opinion.
Post a Comment