अपसमजांचे बळी
>> Wednesday, November 5, 2008
चित्रपटसृष्टीत काही समज असतात ज्यांना आंधळेपणानं गृहीत धरलं जातं. एकदा त्या विशिष्ट गटात एखादी व्यक्ती वा चित्रपट बसला, की चौकटीबाहेर पडणं त्याला दुरापास्त होतं. म्हणजे पहा, दिसायला देखण्या नट्यांपेक्षा, मध्यमरूपाच्या नट्या या अधिक अभिनयकुशल असतात, असा एक समज आहे. मग खरोखरीच्या सुंदर नट्या किती का उत्तम अभिनय करेनात, त्याचं सगळं श्रेय त्यांच्या रूपाला मिळून जातं आणि ग्लॅमरस भूमिका मिळाल्या तरी आव्हानात्मक भूमिकांपासून त्यांना दूर ठेवलं जातं. मधुबालाचंच पहा. आपल्या जवळपास सर्व चित्रपटांतून तिनं अप्रतिम काम केलं; पण केवळ अभिनयासाठी नाव घ्यावं, अशा भूमिका तिला कितीशा मिळाल्या? आजही तिची आठवण निघते, ती सौंदर्यासाठीच.
दुसरा एक लोकप्रिय अपसमज म्हणजे सर्व रहस्यपट हे थिल्लर असतात आणि केवळ मनोरंजनापलीकडे त्यांना स्थान नसतं. रहस्यपटांचा प्रमुख हेतू हा करमणूक असतो; पण हिचकॉकसारखे काही दिग्दर्शक या रहस्यपटांना आशयघन आणि रहस्यभेदापलीकडे जाणारे बनवू शकतात. तंत्राबरोबरच आशयावरही पकड असणारे हे दिग्दर्शक दुर्लक्षिले जातात, ते या प्रचलित समजुतींपायी. हिचकॉकचं ऋण मान्य करून त्याला मानाची जागा घ्यायलाही त्रुफासारखा मोठा दिग्दर्शकच पुढं यायला लागतो, तो त्यामुळेच.
अर्थात हे समज काही पूर्णतः चुकीचे नसतात, तर ते कलागुणांच्या सरासरीवर आधारित असतात. दहांतल्या नऊ जणांना लागू पडणारा न्याय दहाव्यालाही लागू पडतो आणि मग खरोखरच काही कसबी कलावंतांकडे किंवा कलाकृतींकडे दुर्लक्ष होतं. अपवाद हे प्रत्येक वेळी लक्षात येतात, असं नाही आणि अशा परिस्थितीत अन्यायाची शक्यता तयार होते.
या प्रकारचा अन्याय घडण्याची एक नवी श्रेणी तयार होत असल्याची चिन्हं गेले काही दिवस दिसताहेत. अजून या श्रेणीची उदाहरणं फार नाहीत; पण प्रेक्षक अन् काही प्रमाणांत समीक्षकांचाही या चित्रपटांकडे पाहण्याचा दृष्टिकोन बघता ती लवकरच अस्तित्वात येईल. "स्पेशल इफेक्ट्सचा भरपूर वापर असणारे चित्रपट' ही ती श्रेणी. गेल्या काही वर्षांत (खास करून "ज्युरासिक पार्क'पासून) संगणकीय ऍनिमेशनच्या तंत्रात झालेली क्रांती, दिवसागणिक स्वस्त (डॉलरमध्ये स्वस्त, रुपयांत नव्हे, हे आपल्याकडली स्पेशल इफेक्ट्सची उदाहरणं पाहता स्पष्ट व्हावे) आणि अधिक उपलब्ध होणारं तंत्रज्ञान हे आजकाल कमी बजेटमध्ये सफाईदार चित्रपट काढण्याची इच्छा असणाऱ्यांना वरदान ठरलेलं दिसतं. त्यातच सध्या आलेली कॉमिक बुक्सवर आधारित चित्रपटांची साथ पाहता दिवसागणिक या चित्रपटांची संख्या वाढत जाईल, यात संदेह नाही.
या विभागात मोडणारे चित्रपट प्रामुख्याने भयपट, विज्ञानपट आणि सुपरहिरोंच्या गोष्टी या उपविभागात येतात. एकाच चित्रपटात यातले तीनही उपविभाग एकत्र येऊ शकतात, हे विशेष. बाल प्रेक्षक, टीनेजर्स आणि केवळ रंजनमूल्यांसाठी मल्टीप्लेक्सला हजेरी लावणारा प्रेक्षकवर्ग (प्रामुख्याने अमेरिकेतला, आपल्याकडे या फिल्म्स अजूनही उपऱ्या वाटतात) यांचा या चित्रपटांना चांगला प्रतिसाद असतो. त्याशिवाय बराच भाग तंत्रज्ञांकडे सोपवला तर मध्यम कुवतीचा दिग्दर्शकही व्हिजुअल्सवर भर देऊन कलागुणांमधल्या उणिवा लपवू शकतो. या सर्वांचा परिणाम आज असा आहे, की तिकीट खिडकीवर बऱ्यापैकी कमाई करूनही, या चित्रपटांना आज आपला दर्जा सांभाळणं मुश्कील झालं आहे. संकल्पनेचा अभाव किंवा विसर दिवसेंदिवस वाढत चालला आहे. साहजिकच या चित्रपटांना दर्दी प्रेक्षक गंभीरपणे घेईनासे झाले आहेत आणि "सब घोडे बारा टक्के' याच नियमाने अल्पावधीत या चित्रपटांकडे दुर्लक्ष करायला लागले आहेत.
बहुसंख्य चित्रपटांच्या बाबतीत ही प्रतिक्रिया बरोबर असली तरी सर्वांनाच या नियमाचे बळी करणं, हा अन्याय ठरेल. हे पहिल्याप्रथम लक्षात येण्याचं कारण होतं वाचोस्की बंधूंचा मेट्रिक्स. मेट्रिक्सचं रूप विज्ञानपटाचं आणि भाषा संगणकाची असली तरी तत्त्वज्ञान हा त्याचा आत्मा होता. देकार्त, प्लेटोपासून अनेक तत्त्वज्ञांना सतावत आलेल्या प्रश्नांना आजच्या काळाशी आणून बांधण्याचा हा एक स्तुत्य प्रयत्न होता. तसं असूनही बहुतेक प्रेक्षकांनी यालाही इतर चार चित्रपटांच्या रांगेत नेऊन बसवला अन् केवळ नेत्रसुखासाठी गर्दी केली. मेट्रिक्समध्ये तंत्रज्ञानाची मोठी झेप निश्चित होती; पण त्यासाठी त्यातल्या कल्पना मोडीत निघणं आवश्यक नव्हतं. स्वप्नं आणि वस्तुस्थिती यामधली गल्लत, मानव आणि यंत्रामधली परस्परावलंबी नाती अशा अनेक सूत्रांना एकत्र बांधत हा चित्रपट अनेक प्रश्न उपस्थित करता झाला. दुर्दैवाने वाचोस्कींना स्वतःलाच या चित्रपटाची महती लक्षात आली नाही आणि पुढल्या दोन भागांमधून त्यांनी केवळ इफेक्टसनाच महत्त्व दिलं. खासकरून तिसऱ्या भागाने तर कहरच केला आणि पहिल्या भागाचे चहातेही ही मालिका विसरून जाण्याच्या तयारीला लागले. मात्र आजही ज्यांना बौद्धिक खाद्य हवं आहे, त्यांनी मूळ मेट्रिक्स जरूर पहावा, त्यातलं तंत्रज्ञान दुय्यम आहे हे ध्यानात ठेवून, केवळ वैचारिक बाजूसाठी.
मेट्रिक्सनंतर अनेक वर्षांनी याच प्रकारचा प्रथमदर्शनी चार चित्रपटांसारखा वाटणारा; पण दुर्लक्ष न करण्याजोगा चित्रपट प्रदर्शित झाला.मेट्रिक्सप्रमाणेच रिलक्टंट नायकाच्या भूमिकेत पुन्हा किआन् रिव्हज असलेला "कॉन्स्टंटिन' या विभागातल्या तीनही उपप्रकारांना एकत्रित करणारा भय-विज्ञान-सुपरहिरोपट आहे. "हेलब्लेझर' या ग्राफिक नॉव्हेल्सच्या (म्हणजे थोडक्यात थोडी मोठ्या आकाराची कॉमिक बुक्स) मालिकेवर आधारित हा चित्रपट मेट्रिक्सइतका वेगळा नाही, कारण तो तत्त्वज्ञानासारख्या जड विषयाला हात घालत नाही. त्याचा मूळ हेतू करमणूक हाच आहे. देव आणि सैतानाच्या लढाईला तो आधुनिक रूप देतो. इथं दृश्यरूपालाही महत्त्व आहे; पण ते मेट्रिक्ससारखं नाही. त्या चित्रपटातले इफेक्ट्स हे अद्ययावत आणि त्यातल्या यंत्रसंस्कृतीच्या कल्पनेला अनुसरून होते. इथे इफेक्ट्स, छायाचित्रण आणि चित्रपटाचं एकूण स्वरूप हे त्यातल्या प्रमुख पात्रांच्या जाणिवांना पूरक आहे. भव्य तरीही भ्रष्ट, मूल्य हरवलेल्या देवदूतांचं आणि अंतिम खेळी जिंकण्यासाठी वेळप्रसंगी तडजोड करणाऱ्या सैतानाचं हे नजर बांधून ठेवणारं जग आहे. म्युझिक व्हिडिओ दिग्दर्शक फ्रान्सिस लॉरेन्स, यांनी आपल्या चित्रपट दिग्दर्शनाच्या पहिल्याच प्रयत्नात हे स्पष्ट केलंय, की केवळ तंत्रज्ञांच्या मर्जीवर हा उद्योग चालू नाही. इथल्या प्रत्येक प्रसंगात लक्षात येतं, की दिग्दर्शकाची दृष्टी या योजनेमागे कार्यरत आहे. नरकाचं दृश्य रूप म्हणून आगीच्या विळख्यात सापडलेलं, हायवेवर अडकलेल्या जुन्या बंद गाड्यांनी वेढलेलं लॉस एंजेलिस पाहिलं तरी या दृष्टीची खात्री आपल्याला पटेल.
चित्रपटाच्या मध्यवर्ती कल्पनेनुसार, पुरातन काळापासून चालत आलेली भल्या-बुऱ्याची लढाई, म्हणजे देव आणि सैतानाच्या हस्तकांकडून एकमेकांवर केली जाणारी मात, ही इतरत्र घडत नसून पृथ्वीवरच चाललेली आहे. एकमेकांवर कुरघोडी करण्याची ही यंत्रणा एखाद्या व्यापारासारखी आहे, अन् त्यात चलन म्हणून वापर होतो आहे, तो मानवी आत्म्यांचा. कॉन्स्टंटिनपासून हे काही लपत नाही. त्याच्यात अशी काही विकृती आहे, की मानवी आकारातले हे देव-दानव त्याला प्रत्यक्ष दिसतात. मात्र तो सध्या मोठ्या संकटात आहे. त्याच्या मृत्यूची घटका सततच्या धूम्रपानाच्या कृपेने भरत आली आहे आणि मृत्यूनंतर तो स्वर्गात जाणं शक्य नाही. अनेक वर्षांपूर्वी आपल्याला दिसणाऱ्या जगापलीकडल्या जगाला घाबरून त्याने आत्महत्येचा प्रयत्न केला होता आणि कॅथलिक पंथानुसार याची शिक्षा म्हणजे हमखास नरकवास हीच आहे. सध्या तरी देवाला मस्का लावण्याच्या प्रयत्नात तो सैतानाचे सैनिकांवर सैनिक मारतोय जे त्याला मरणानंतर निश्चितच मरणयातना भोगायला लावतील.
कॉन्स्टंटिन हा स्वर्ग नरकाच्या सांकेतिक काळ्या-पांढऱ्या रंगांना वगळून सर्वांनाच ग्रे शेड् स देतो. त्याचं वातावरण, त्याची प्रवृत्ती ही त्याची खासीयत आहे. असं असूनही त्याच्या भरधाव वेगाने अन् एकामागून एक येणाऱ्या दृश्य चमत्कारांनी, त्याच्या ऍटिट्यूडमधला हा विशेष थोडा अस्पष्ट केला आहे. शक्यता अशीही आहे, की मुळात या दिग्दर्शकाचा असा प्रयत्न असेल, की चित्रपटाचा वेगळेपणा जर प्रेक्षकांच्या पसंतीला उतरला नाही, तर निदान इफेक्ट्सनी त्यांना आकर्षित करावं. अन् त्यामुळे गरजेहून थोडे अधिकच इफेक्ट्स त्याने पटकथेत गुंफले असावेत. अशा अनावश्यक जागा लक्षात येण्याजोग्या आहेत. या जागा मनोरंजनमूल्य वाढवतात; पण आशयाची जागा खाऊन वैचारिक मूल्यं कमी करतात.
मुळात वेगळ्या चित्रपटाला इतर सामान्य चित्रपटाच्या रांगेत येऊन बसावंसं वाटणं, हे काही फार बरं लक्षण नाही. याचा दुसरा अर्थ असा, की काही नवं देण्याची भीती चित्रकर्त्यांनादेखील वाटू लागली आहे. अन् प्रयोग आणि पैसा यात पैशाचीच निवड करणं त्यांना अधिक मंजूर आहे. अशा परिस्थितीत अधिक काळजी वाटण्यासारखं काय आहे? चांगल्या चित्रपटांकडे अनवधानानं दुर्लक्ष होणं, की आर्थिक हिशेब मांडून चांगल्या चित्रपटांनीही आपला चांगलेपणा लपवणं? आणि हा दोष कोणाचा? चित्रपटाचा वेगळेपणा न ओळखणाऱ्या प्रेक्षकांचा, की त्यांना तो न ओळखू देणाऱ्या चित्रकर्त्यांचा?
-गणेश मतकरी
0 comments:
Post a Comment