गुलाबी टॉकीज
>> Sunday, November 9, 2008
प्रसिद्ध कन्नड लेखिका वैदेही हिच्या एका लघुकथेवर बेतलेला "गुलाबी टॉकीज' हा चित्रपट गुलाबीच्या व्यक्तिमत्त्वाबरोबरच समाजमनाचेही पापुद्रे उलगडत नेतो. कुशल सुईण असणाऱ्या गुलाबीला जेव्हा धार्मिक अहंकार गावाबाहेर घालवतो तेव्हा पौगंडावस्थेतल्या, पुढच्या पिढीच्या मनापासून दुःखी होणाऱ्या एका मुलाला हसऱ्या चेहऱ्यानं गुलाबी सांगते, "मी जिवंत राहणार आहे, जोपर्यंत बायका बाळंत होताहेत, तोपर्यंत मीही असणारच!'
आटपाटनगरच्या राजाची, त्याच्या त्या आवडत्या आणि नावडत्या राण्यांची आणि "मग सारे सुखाने नांदू लागले' या भरतवाक्याने शेवट होणारी साठा उत्तरांची कहाणी ऐकण्याचे दिवस आता राहिले नाहीत. ती आटपाट नगरं लयाला गेलीत, राजेराण्यांची राज्यं खालसा झालीत आणि शेवटचं नांदण्यातलं सुखही हरवल्यासारखं झालंय. अवचित त्या कहाण्यांमधलं एखादं पात्र कुठेतरी भेटतं आणि उरावर जखम करून जातं. मग लक्षात येतं की झाली ती जखम नाहीये, जखम होतीच; आत्ता फक्त खपली तेवढी पुन्हा निघाली आहे. अशाच जुन्या- जाणत्या जखमांची जाणीव वारंवार करून देणाऱ्या गिरीश कासारवल्ली नावाच्या दिग्दर्शकाचा "गुलाबी टॉकीज' हा ताजा चित्रपट.
आटपाट नगराचा थाट गुलाबीच्या गावात नाही. किंबहुना ते नगरही नव्हेच. आहे ते एक छोटंसं बेट. आणि मासेमारी हा तिथल्या लोकांचा रोजगाराचा विषय. गुलाबी ही मूसाची नावडती राणी आहे. आवडती आणि आवडतीचा मुलगा हे मूसाबरोबर दुसऱ्या घरात राहतात. गुलाबी एकटीच राहते. तिची आठवण सगळ्यांना होते ती म्हणजे एखादी बाई अडली तरच. हाताला गुण असणारी ती सुईण आहे; पण दिवसाच. एकदा का संध्याकाळ झाली की गुलाबी कुणाचीच नाही. दुसऱ्या गावातल्या टॉकीजमध्ये सिनेमा बघणे हा तिचा एकमेव षौक. मग त्या वेळी एखादी बाई अडली तरी ही हलायची नाही, पण एकदा तीही वेळ येते आणि कल्याणी ही श्रीमंताघरची मालकीण स्वतःच्या सुनेसाठी तिला प्रत्यक्ष सिनेमा बघत असताना उचलून आणते. गुलाबीची नाराजी दूर करण्यासाठी आपला एक जुना कलर टीव्ही आणि डीश अँटेना चक्क तिच्या घरी बसवून देते!
गुलाबीच्या घरातला रंगीत टीव्ही हा गावातला एकमेव. आपल्या गावात रंगीत टीव्ही दिसू शकतच नाही, असा गावकऱ्यांचा दावा होता. "आपल्या गावात रंग फार उडतात' एक बुजुर्ग सांगू लागतो, "आता हा माझा शर्टच घ्या. घेतला तेव्हा रंगीत होता, आज पांढरट झालाय!' पण गुलाबीच्या घरातला टीव्ही रंगीत दिसतो आणि सिनेमाप्रेमी गुलाबी, घराच्या भिंतीवर एक सिनेमाचं पोस्टरही आणून चिकटवते आणि घराची "गुलाबी टॉकीज' करून टाकते!
गुलाबीचं घर गावातला केंद्रबिंदू होतो. पण त्याचं कारण आणखी वेगळंय. कारगीलचं युद्ध सुरू झालंय आणि देशभरातच मुस्लिम व्यक्तींकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलतोय. त्याची झळ गावापर्यंत येते. आजपर्यंत प्रत्येका घरी जाणारी गुलाबी "मुस्लिम' असल्याची जाणीव एक जण तिला तिच्या गुलाबनबी या मूळ नावानं हाक मारून करून देतो आणि गुलाबीबरोबरच आपणही हादरतो. "तिच्या'कडे टीव्ही बघायला कसं जायचं?' या सोवळ्या भीतीच्या दोन म्हाताऱ्याही शेजारी आहेतच. इतर बायका मात्र दुपारची करमणूक गुलाबी टॉकीजमध्येच करतात. सिनेमा, सासू-सुनेच्या मालिका यांचं झकास मिश्रण गावातल्या स्त्रियांच्या जीवनामध्ये दिग्दर्शक करतो आणि गुलाबीला तिची जिवाची सखी नेत्र भेटते. सासूच्या जाचाला कंटाळलेली नेत्रूही एकटीच आहे. तिचा नवरा बाहेरगावी आहे आणि गुलाबीचा नवराही असून बसल्यासारखा. सिनेमातल्या "एक ऐसे गगन के तले'चं स्वप्न गुलाबी नेत्रूला सांगते आणि नेत्रू घर सोडून पळून जाते!
इकडे मासेमारीच्या लायसन्सचे प्रश्न, रोजगार, कारगील या सगळ्यांचा परिणाम गावावर होतोय. नाही म्हणायला गुलाबीचा नवरा टीव्ही बघायला म्हणून तिच्याकडे येतो आणि नावडती राणी आवडती होऊ लागते. एवढ्यानं नावडतीच्या मागचं लचांड संपायला आयुष्य म्हणजे कथेकऱ्याची पोथी नव्हे हे कळतं, तेव्हा गावकऱ्यांचा गुलाबीवरचा मुस्लिम असण्याचा रोष मोठा झालेला असतो. इतर मुस्लिम गाव सोडून जातात तेव्हा हे "माझं' गाव असल्याचं ठासून सांगणाऱ्या गुलाबीचं घर गावगुंड उद्ध्वस्त करतात आणि तिला बोटीत बसवून स्थलांतरित करतात. अर्थातच तिचा टीव्ही मात्र तसाच असतो. गुंड त्याची तोडफोडही करत नाहीत आणि गुलाबीजवळ देतही नाहीत. "तुमच्यासाठी ठेवलाय- बघा, मजा करा' म्हणून ते गावकऱ्यांना सांगतात आणि प्रथमच शेजारच्या दोन सोवळ्या म्हाताऱ्या गुलाबीच्या झोपडीत प्रवेश करतात. दोन आनंदी चेहऱ्याच्या ग्लोज शॉटहून कॅमेरा पुलआऊट होतो आणि जणू काही प्रेक्षकांना त्या आनंदापासून दूर उंचावर नेऊन ठेवतो. तिथून दिसतो तो समुद्र, किनाऱ्यावरची डिश आणि गुलाबी नसलेली "गुलाबी टॉकीज!'
चित्रपट संपतो तरीही या नावडत्या राणीचा विचार संपू शकत नाही. गुलाबी हे त्या अर्थानं एक प्रतीक आहे. इथे "नावडतीचं मीठ अळणी' असला काही प्रकार नाही. किंबहुना नावडतीचं मीठच सगळ्यांना मिळालं तर हवंय; पण नावडती नकोय. मुसलमानाच्या घरी टीव्ही बघायला कसं जायचं? या प्रश्नाचं सोईचं उत्तर लोकांनी कधीच शोधलं होतं. "टीव्ही गुलाबीकडे असला तरी तो दिलाय कल्याणीनं!'' म्हणजे टीव्ही हा हिंदू जातीचा झाला! अंगावर सावली जरी पडली तरी विटाळ मानणारी आमच्या पूर्वजांची ढोंगी मनं सावलीच्या त्या मालकिणीला अंगाखाली घ्यायला कचरली नाहीत याची आठवण गुलाबीनं करून दिली आणि हसऱ्या चेहऱ्याची गुलाबी मनात घर करून बसली. धर्म, देश, जाती, प्रांत, भाषा असल्या संकुचित विचारांनी जगभरात कितीतरी गुलाबीचं आयुष्य उद्ध्वस्त केलं असेल. करणारे करतात, त्यातून लाभ मिळालेले हसतात आणि उरलेले मुर्दाड गप्प बसतात. गुलाबीचा टीव्ही आपल्या सगळ्यांनाच बघायचा असतो; पण अडल्याला धावणारी हसऱ्या चेहऱ्याची गुलाबी मात्र बसली तरी चालते- आणि वर या षंढपणाला "धोरणीपणा' म्हणून लेबल लावून आम्ही मोकळे होतो.
चित्रपटात एक सुंदर शॉट आहे. भविष्याची चाहूल लागून खिन्न झालेली गुलाबी घरी येते. टीव्ही बघणाऱ्यांना बाहेर काढते. टीव्ही बंद होताच टीव्हीच्या काचेत कोपऱ्यात उदासपणे बसलेली गुलाबी दिसते. आपल्या आवडत्या मालिकेचा एपिसोड त्रयस्थपणे बघणाऱ्या गुलाबीच्या आयुष्याचे पुढचे एपिसोड आता गावकरी टीव्हीतल्या मालिकेप्रमाणेच त्रयस्थपणे बघणार आहेत ही जाणीव होते आणि आपण खिन्न होतो. कारण गुलाबीच्या आयुष्याची मालिका टीआरपीअभावी बंद होणार नाही याची आपल्याला खात्री असते. कारण मालिका काय, चित्रपट काय, जोपर्यंत आपल्याला दुसऱ्यांचं दुःख मिटक्या मारत बघायला आवडत राहणार आहे तोपर्यंत त्यांना अंत नाही. मग ती मालिका टीव्हीवरची असो किंवा कुणाच्या आयुष्याची.
-प्रसाद नामजोशी
(point of view या सदरामधून.)
1 comments:
must see
Post a Comment