उल्लेखनीय, पण गोंधळलेला

>> Thursday, May 1, 2008

यू कॅन नेव्हर रूईन ऍन आर्किटेक्ट बाय प्रूव्हिंग दॅट ही इज ए बॅड आर्किटेक्ट. बट यू कॅन रूईन हिम बिकॉज ही इज ऍन एथेइस्ट, ऑर बिकॉज समवन सूड हिम, ऑर बिकॉज ही स्लेप्ट विथ सम वुमन, ऑर बिकॉज ही पुल्स विंग्ज ऑफ बॉटलप्राईज. यू विल से इट डझन्ट मेक सेन्स? ऑफ कोर्स इट डझन्ट. दॅटस व्हाय इट वर्क्स. एल्सवर्थ टू ही, फाउंटनहेड

ऍन रॅन्डच्या फाऊन्टईड मधल्या वास्तुकला समीक्षकाचे उद् गार, ते वाचल्यापासून माझ्या डोक्यात ठाण मांडून बसले आहेत. त्यामागचं कारण हे केवळ त्यांच्या चमत्कृतीत नसून, त्यांना असणाऱ्या वास्तवाच्या पक्क्या बैठकीत आहे. एखाद्या कलाकाराच्या किंवा कलाकृतीच्या दर्जाची शहानिशा करताना आपण त्या कलाकृतीचा (किंवा कलाकाराचा) वस्तुनिष्ठपणे केवळ दर्जाचाच विचार करू शकतो का? मला वाटतं अनेकदा आपण चिकटवलेले गुणदोष हे आपल्या मनातले, अनुभवातले किंवा इतरत्र भेटलेलेही असू शकतात. सामान्यतः लोकप्रिय होणाऱ्या चित्रपटांमध्ये अशी अनेक उदाहरणे सापडतील. ज्यांच्या कौतुकाला चित्रपटबाह्य कारणं जबाबदार आहेत. जे. पी. दत्ताचा बॉर्डर चालला तो उत्तम चित्रपट म्हणून नव्हे, तर त्या वेळच्या युद्धजन्य परिस्थितीने निर्माण केलेल्या देशभक्तीच्या लाटेमुळे. आशुतोष गोवारीकरचा "स्वदेस' चालला तो त्यात उठणाऱ्या ब्रेनड्रेनच्या विरोधातल्या आवाजामुळे, आणि पुन्हा देशप्रेमाच्या आलेल्या उमाळ्याने. या दोन्ही चित्रपटांमध्ये गुण होता तो ते मनापासून केले होते आणि लोकांना पटणारा संदेश देत होते हा. मात्र दर्जात्मक उणिवा या दोन्ही चित्रपटांत वारेमाप होत्या. सध्या याच प्रकारे अचूक संदेशाच्या लाटेवर बसून लोकप्रिय झालेली एक निर्मिती चित्रपटगृहामध्ये दिसून येते. ती म्हणजे "खुदा के लिये.' गेल्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवापासूनच तिची जोरदार हवा आहे. मात्र या प्रसिद्धीमागची सत्यासत्यता पडताळून पाहण्याची संधी मात्र आताच मिळते आहे. लेखन, दिग्दर्शन आणि निर्मिती या तिन्ही जबाबदाऱ्या पार पाडणाऱ्या शोएब मन्सूरला दोन गोष्टींत पैकीच्या पैकी मार्क द्यावे लागतील. पहिली म्हणजे त्याचा प्रामाणिकपणा, अन् दुसरी त्याचं धैर्य. पाकिस्तानात वास्तव्य करणाऱ्या, अन् मुस्लिम समाजाचाच घटक असणाऱ्या मन्सूरने या प्रकारे धर्मव्यवस्थेला आव्हान देणारा चित्रपट बनवणं, याला खरोखरच धाडस म्हणावं लागेल. मात्र इथं एक गोष्ट अध्याहृत आहे, की आपण पाकिस्तानचा चित्रपट हा मुळातच मागासलेला समजतो. तंत्रानं अन् आशयानं. त्यामुळे त्यांनी काही अर्थपूर्ण आशय असणारा चित्रपट बनवण्याचा प्रयत्न करणं, हाच आपल्यासाठी सुखद धक्का. मग मुख्य कौतुक, ते या धक्क्याचंच. इथलं कथानक आहे ते दोन भावांवर येणाऱ्या संकटाचं. (किंवा धर्मसंकटाचं म्हटलं तरी चालेल.) हे भाऊ म्हणजे आधुनिक मुसलमान समाजाचे प्रतिनिधी. मूलतत्त्ववाद्यांच्या विरोधात टिकून राहिलेल्या कुटुंबातले. काळाबरोबर राहू पाहणाऱ्या, आधुनिक पेहरावातल्या देवधर्माकडे पाहण्याचा आधुनिक दृष्टिकोन जवळ करणाऱ्या मुसलमानांचा प्रश्न हा इथे दोन परस्परविरोधी नजरांमधून मांडला जातो. सांकेतिक अन् पारंपरिक पद्धतीनं धर्माचा अर्थ लावू पाहणारे इतर पाकिस्तानी त्यांना धर्माची विटंबना करणारे मानतात, तर दुसऱ्या बाजूने मुसलमानांकडे दहशतवादी म्हणून पाहणारा पाश्चिमात्य समाजही त्यांच्या या रूपाकडे संशयानं पाहतो. लाहरोमधल्या मन्सूर (शान) आणि सरमद (फुआदखान) या भावांच्या जवळजवळ स्वतंत्र गोष्टी इथं सरमिसळ करून सांगितल्या जातात. सरमद एका अतिशय ओव्हरऍक्टिंग करणाऱ्या मौलवीच्या नावानं भरकटतो, अन् गोऱ्या मडमेबरोबर लग्नाशिवाय राहणाऱ्या, पण मुलीनं गोरा जावई शोधताच उपरती झालेल्या आपल्या काकाच्या हाकेला धावून त्या मुलीशी, म्हणजे मेरीशी फसवून लग्न करतो. इकडे सरमद अन मेरी अफगाण बॉर्डरवरच्या एका छोट्या गावात जबरदस्तीचा संसार करत असताना मन्सूर शिकागोमध्ये एक गोरी (या पाकिस्तान्यांना गोऱ्याचं काय एवढं आकर्षण बुवा?) मुलगी मिळवतो, मात्र त्याच्या दुर्दैवानं अकरा सप्टेंबर 2001 च्या हलकल्लोळानंतर तो पोलिस किंवा तत्सम सरकारी संघटनेच्या कचाट्यात सापडतो. मग छळ, छळ आणि थोडा अधिक छळ. "खुदा के लिए' माझ्या मते सगळ्यात कमी पडतो तो व्यक्तिचित्रणात. ज्या मन्सूर आणि सरमदची ही गोष्ट आहे, त्यांना एक टाईप म्हणून रंगवल्यावर पुढे त्यांना कोणत्याही प्रकारची खोली तो देऊ शकत नाही. त्याचबरोबर त्यांच्या आयुष्यात घडणाऱ्या घटनांना अपरिहार्यतेपेक्षा फटकळ योगायोगांचाच वास येतो. आता सरमद मौलवीच्या सांगण्याने बदलतो अन् स्वतः संगीतकार असताना संगीताला निषिद्ध मानण्यापासून ते आईने बुरखा घालण्याचा हट्ट करण्यापर्यंत अनेक गोष्टी करतो. कथेच्या पातळीवर हे असं घडणं मी मान्य करतो; मात्र प्रसंगातून, संवादातून आणि मुख्य म्हणजे युक्तिवादातून हे बदलणं स्पष्ट आणि पटण्यासारखं व्हायला नको का? इथं मौलवी जे सल्ले देतो, त्यांना या अमुक गोष्टी धर्मबाह्य आहेत अन् अमुक नाहीत या पलीकडे जाऊन कारणमीमांसा दिली जात नाही. मग त्या सरमदला पटतात कशा? कारण जरी तो स्वतंत्र विचाराच्या कुटुंबातून आला असला, तरी त्यानं त्याच्याच म्हणण्याप्रमाणे धर्मग्रंथ वाचलेले आहेत. तो पाकिस्तानातच राहत असल्यानं इतर लोक काय प्रकारे अन् का वागतात, तेही तो जाणून आहे. मग अचानक हे हृदयपरिवर्तन होण्यामागे कारण काय? तेही इतक्या टोकाचा, की मौलवीची आज्ञा राखून मेरीशी विवाह करताना तो साधा माणुसकीचा विचारही करत नाही. व्यक्तिरेखेच्या वागण्यामागचा कार्यकारणभाव अगदी महत्त्वाचा असतो, कारण नाहीतर या घटना केवळ पटकथेच्या सोयीसाठी घडल्यासारख्या वाटतात. इथेही तेच होतं. काही प्रमाणात हीच गोष्ट मन्सूरची. एक तर तो लो बजेट बॉलिवूड शैलीतलं प्रेमप्रकरण करून शिकागोत विवाहबद्ध होतो. या दरम्यान त्याला आपल्या भावाचं, अन् मेरीचं काय चाललंय याची फार पर्वा नसावी, कारण तो कधी ही माहिती काढण्याच्या प्रयत्नातही दिसत नाही, किंवा ही माहिती नसल्याने अस्वस्थ होत नाही. तो संगीत शिक्षण (पुन्हा धर्मांधांना टोला) आणि प्रेमप्रकरण यात मश्गूल दिसतो. अन एकदा का तो दहशतवादी म्हणून पकडला गेल्यावर तर पंचाईतच होते, कारण मग मन्सूरच्याही हातात फार काही राहत नाही. पहिल्या गोष्टीतल्या मौलवीशी स्पर्धा करणारा ओव्हरऍक्टिंग करणारा एक गोरा अधिकारी इथे मन्सूरला टॉर्चर करण्यासाठी आणला जातो. (खरं तर वेगळ्या टॉर्चरची गरज नाही, त्याचा अभिनय हाच पुरेसा टॉर्चर आहे.) अन् पुढे येणारा प्रत्येक प्रसंग हा एकाच प्रसंगाच्या अनेक आवृत्त्यांमधला एक बनून जातो. मौलवी अन् गोरा अधिकारी या व्यक्तिरेखा जर इथे हाडामांसाच्या बनू शकल्या असत्या, तर चित्रपटाला काही निश्चित परिमाण येऊ शकलं असतं. मात्र ते होत नाही ते संहिता अन कलाकार या दोघांना असणाऱ्या मर्यादांमुळे. अखेरच्या प्रसंगामधला नासीरउद्दीन शाहचा मौलवी ते देऊ शकतो; कारण त्याच्याकडे करण्यासारखा काही युक्तिवाद आहे, शिवाय तो उत्तम अभिनेता आहे. मात्र ही भूमिका दुर्दैवाने फारच छोटी आहे. शोएब मन्सूरच्या पटकथेला ज्याप्रमाणे मर्यादा आहेत, त्याचप्रमाणे त्या इतर अनेक गोष्टींनाही आहेत. दिग्दर्शक म्हणून वेगळ्या भूमिकेत शिरून तो पटकथा सुधारून तर घेऊ शकतच नाही. वर त्याचं दिग्दर्शनही ठिकठाकच्या पलीकडे जात नाही. तो टीव्हीमधून आला असल्यानं असेल कदाचित; पण क्लोजअपस् वर त्याचा अधिक ताबा आहे. जेव्हा प्रसंग मोठ्या जागांमध्ये किंवा ऍक्शनला वाव देणारे असतात तेव्हा त्याचा ताबा सुटतो. उदाहरणादाखल चित्रपटाच्या सुरवातीचा नववर्ष कार्यक्रमाच्या तयारीवेळी होणाऱ्या हल्ल्याचा प्रसंग किंवा मेरीच्या पलायनप्रयत्नाचा प्रसंग घेता येईल. इथे घेतलेले शॉट्स हे यांत्रिकपणे, अमुक अमुक गोष्टी आवश्यक असल्याने घेतल्यासारखे वाटतात. त्यांना एक प्रकारचा प्रवाहीपणा असायला हवा, जो इथे गायब आहे. स्वतंत्र शॉट्सची संख्याही प्रसंगाच्या गरजेपेक्षा कमी आहे, अन् संकलनात ते वाचवण्याचा प्रयत्नही करण्यात आलेला दिसत नाही. हा सराईतपणाचा (चांगला सराईतपणा; बनचुकेपणा असा अर्थ इथे अभिप्रेत नाही.) अभाव इथं इतरही ठिकाणी दिसतो. अभिनयात, छायाचित्रणात आणि एकूणच. मग चित्रपट जर एवढ्या मूलभूत अंगामध्ये कमी पडत असेल तर त्याचं कौतुक केलं जाण्यामागे काय कारण असावं? मला वाटतं, हा प्रयत्न मनापासून केलेला आहे, हे कुठंतरी आपल्यापर्यंत पोचतं अन् मग आपण त्याचंच कौतुक करतो. प्रत्यक्ष चित्रपटाचं नाही, तर या प्रकारचा चित्रपट निघू शकला याचंच. ही कल्पना आपल्याला आवडते अन् तिच्याविषयी आपण बोलतो, प्रत्यक्ष चित्रपट राहतो बाजूला. "खुदा के लिए' मध्ये एक वाक्य आहे, "सगळे मुसलमान हे दहशतवादी नसतात; मात्र सगळे दहशतवादी मुसलमान असतात.' त्याच सुरात बोलायचं तर सगळे चांगले चित्रपट मनापासून केलेले असतात; पण सगळेच मनापासून केलेले चित्रपट चांगले नसतात. "खुदा के लिए' बद्दल तरी माझं हेच मत आहे.
- गणेश मतकरी

0 comments:

Post a Comment

  © Blogger template Werd by Ourblogtemplates.com 2009

Back to TOP