नात्यांची रहस्यकथा

>> Tuesday, May 6, 2008

ज्यांनी कुरोसावाचा राशोमान पाहिला असेल, त्यांना एकच घटना भिन्न दृष्टिकोनातून कशी बदलते हे लक्षात आलं असेल. राशोमानमधली घटना होती, ती एका संभाव्य बलात्कार आणि खूनाची. इथे प्रत्येक स‌हभागी व्यक्तिरेखेच्या नजरेप्रमाणे घटनेचा रोख बदलत जातो. स‌त्याचं ते पाहणा-याच्या नजरेप्रमाणे बदलणं दाखविणा-या राशोमानची खास बाब होती, की त्यात घटनांना त्रयस्थपणे कधीच दाखवण्यात येत नाही. त्या कायम कोणाच्या निवेदनातून येतात. याचं कारण म्हणजे दिग्दर्शकाला खरं काय घडलं यात रस नसून केवळ ती घटना पाहणा-यास आहे.
दिग्दर्शिका लेटीरिआ कोलोम्बानीच्या ही लव्हज मी, ही लव्हज मी नॉट चित्रपटाचाही व्यक्तिरेखांच्या दृष्टिकोनाशीच खेळ चालतो. मात्र इथे घटना प्रत्यक्ष निवेदनातून येत नाहीत. घडलेल्या घटनांचं दोन वेगळ्या पद्धतीने संकलन करून इथे एक कथा रचली जाते. कदाचित प्रेमाने आलेल्या नैराश्याची.कदाचित आणखी कस‌ली तरी.
इथली प्रमुख पात्र दोन. अँजेलिक (औड्री टोटो) ही चित्रकलेची तरुण विद्यार्थिनी आणि लुईक (सँम्युएल -ल- बिहान) हा एक यशस्वी कार्डीओलॉजिस्ट. अँजेलिकचं लुईकवर प्रेम आहे. लुईकचं लग्न झालंय. पण तो घटस्फोट घेणार असल्याचं त्याने अँजेलिकला सांगितलंय.अँजेलिकवर एका स‌मवयस्क डॉक्टरचं एकतर्फी प्रेम आहे. पण ती त्याला प्रतिसाद देत नाही. ती लुईक आपल्या एकटीचा कधी होईल याचीच वाट पाहण्यात मग्न आहे.
ही लव्हज मी, ही लव्हज मी नॉट संपूर्ण पाहिला तर लक्षात येईल की त्याचा विषय फारसा नवा नाही. तो आधी अनेक चित्रपटांमध्ये यशस्वीपणे मांडला गेला आहे. इथली गंमत आहे तो ज्या पद्धतीने मांडण्यात आला आहे त्यात. चित्रपट सुरू होतो, तो अँजेलिकने फुलांच्या दुकानातून एक सुंदर गुलाब निवडण्यापासून. जो ती आपल्या प्रियकराला पाठवून देते. तो गुलाब घेतल्यावर आणि बरोबरची चिठ्ठी वाचल्यावर लुईकच्या चेह-यावर उमटणारी स्मितरेषा ही प्रेक्षकांना या दोघांच्या नात्याबद्दल बरंच काही सांगून जाते. तेही संवादाशिवाय. या प्रसंगाला आपण दिग्दर्शिकेने निवडलेल्या शैलीचा प्रतिनिधी म्हणू शकू. इथे काय घडतंय, आणि त्याचा अर्थ कसा लावायचा, हे ब-याच अंशी प्रेक्षकांवर सोडलेले दिस‌ते. जो अर्थ अभिप्रेत आहे, तो स‌र्ववेळी बरोबर असेल याची मात्र काहीच शाश्वती नाही.
चित्रपटाच्या अर्ध्यावर त्याची गोष्ट जवळजवळ संपते आणि तो पुन्हा पहिल्या, म्हणजे गुलाबाचं फुल निवडण्याच्या प्रसंगावरून सुरू होतो. या खेपेला आपल्याला थोडी अधिक किंवा थोड़ी वेगळी माहिती दिली जाते. जी आपण पाहिलेल्या गोष्टींचे आतापर्यंतचे स्पष्ट न झालेले काही पैलू उलगडून दाखवेल. या प्रकारची कथनशैली केवळ चित्रपटातच शक्य होणारी म्हणावी लागेल. कारण प्रत्यक्षात एका क्रमाने जाणा-या गोष्टीचा स‌र्व भाग चित्रित करून दिग्दर्शिकेने त्यातलं काय कधी प्रेक्षकांना दाखवायचं आणि काय लपवून ठेवायचं यामध्ये निवड केलेली आहे. विशिष्ट प्रसंगांचा संदर्भ आल्याने इथे प्रसंगांचा पूर्ण अर्थच बदलून गेलेला आपल्याला दिसतो. तो त्यामुळेच.
ही लव्हज मी, ही लव्हज मी नॉट त्यातल्या वेगळेपणासाठी आणि रचनेतल्या प्रयोगासाठी उल्लेखनीय असला तरी तो कथेच्या पातळीवर पूर्ण स‌माधानकारक नाही. याचं प्रमुख कारण म्हणजे त्याचा दुसरा भाग हा जवळजवळ आधी घातलेल्या कोड्याचं स्पष्टीकरण असल्यासारखा येतो. आणि ते स्पष्टीकरण कोणत्या प्रकारचं अस‌णार ते कळल्यावर मग दर प्रसंगाला पूर्ण करण्याची तेवढी गरज वाटत नाही, कारण एक दोन प्रसंगांमधूनच अँजेलिक आणि लुईक यांच्या संबंधाचा अर्थ आपल्याला लागतो. जो पुढे बदलत नाही, केवळ अधिक माहिती दिल्यासारखा उलगडतो.
चित्रपटाची वर्गवारी करायची झाल्यास रोमान्स किंवा थ्रिलर या दोन्ही चित्रप्रकारात करावी लागेल. पण अंतिमतः ही वर्गवारी अपुरी ठरेल. कारण रोमान्स‌चा भास होऊनही तो रोमँटिक नाही, हे त्यातला आशय सांगतो, तर थ्रिलर हे त्याच्या एकूण कथेशी प्रामाणिक वर्गीकरण असलं, तरी ते रचनेच्या बाबतीत चपखल न बसणारं आहे. हा चित्रपट ही नात्यांची रहस्यकथा आहे. त्यातलं रहस्य कोणाला किती आवडेल, ते ज्याच्या त्याच्या प्रवृत्तीवर आहे. मात्र ते आवडलं, न आवडलं तरी त्याचा चित्रभाषेशी संबंधित वेगळेपण मात्र लपणारा नाही. संकलन ही चित्रपटातील किती महत्त्वाची गोष्ट आहे, हे हा चित्रपट पाहून आपल्याला लक्षात आल्याशिवाय राहणार नाही.
-गणेश मतकरी

2 comments:

Yogesh May 11, 2008 at 9:12 PM  

टिंग्याबद्दल लिहिलेला लेख काढून टाकला का? टिंग्या ऑस्करला जायला पाहिजेल याच्याशी सहमत आहे. बॉलीवूडी चित्रपटांसाठी मोठी फिल्डिंग लावून टिंग्याला चेपले गेले नाही तर ते शक्य आहे.

ganesh May 16, 2008 at 10:43 AM  

kadhla karan to nuktach publish zalay. will put it back soon

Post a Comment

  © Blogger template Werd by Ourblogtemplates.com 2009

Back to TOP