गोष्टीपलीकडे...

>> Monday, May 19, 2008

रोड मुव्ही हा चित्रप्रकार महत्त्वाचा असला तरी अलीकडे बराच बदनाम झाला आहे. 1969 च्या इझी रायडरपासून मोटारसायकल डायरीजपर्यंत काही चांगले सिनेमे या चित्रप्रकाराने जरूर दिले असले तरी एकूण हा प्रकार फारच उथळ व्हायला लागला आहे. हे खरंच. खासकरून हॉलीवूडमध्ये तारुण्याच्या उंबरठ्याचे प्रवास, सेक्शुअल स‌जेशन्स, प्रवासाशी स‌मांतर रेखाटलेलं व्यक्तिरेखांचे ढोबळ आलेख आणि अपेक्षित शेवट यामुळे या जॉनरपासून अपेक्षा न ठेवण्याचीच वृत्ती प्रेक्षकांमध्ये वाढायला लागली आहे. या प्रकारची चौकट वापरून त्यात स्वतःचे वेगळ रंग भरणारा सिनेमा म्हणून नाव घ्यावं लागेल ते अँड युअर मदर टू ( y mama tambien) या सिनेमाचं.
2001मध्ये हा सिनेमा बनवला. तेव्हा दिग्दर्शक आल्फान्सो क्वारोन यांचे दोन अमेरिकन सिनेमे बनवून झाले होते, मात्र ही निर्मिती अमेरिकेत न करता त्यांनी मेक्सिकोची वाट धरली. कारण अनेक. एकतर त्यांचा चित्रपट हा जितका त्यातल्या प्रमुख व्यक्तिरेखांविषयी होता, तेवढाच मेक्सीकोविषयी होता. दुसरं म्हणजे त्यांना ज्या प्रमाणात लैंगिकतेचा वापर करायचा होता. तेवढा अमेरिकन रेटिंग सिस्टिमच्या तावडीतून सुटण्यासाठी नव्हता. आणि तिसरं म्हणजे त्यांना स्टुडियोचा वरचष्मा नको होता.


हा सिनेमा ब-याच प्रमाणात दोन स्तरांवर उलगडतो. पहिला स्तर आहे तो सांकेतिक वळणांचा. पण तोही पूर्णपणे नाही. इथे दिसते ती हुलियो (गायेल गार्शिया बर्नाल) आणि टेनोच (दिएगो लूना)
यांनी लुईजा (मॅरेबिल वर्दो) या त्यांच्याहून वयाने मोठ्या ,पण बिनधास्त मुलीबरोबर केलेल्या प्रवासाची कथा. हुलियो आणि टेनोच ही श्रीमंत, वाया गेलेली मुलं आहेत. अमली पदार्थांचा नाद आणि सेक्स या गोष्टींपलिकडे त्यांना काही दिसत नाही. त्यांचं आयुष्य केवळ या दोन विषयांभोवती फिरतं. त्यांच्या मैत्रिणींबरोबर त्यांचे शरीरसंबंध आहेतच. पण शरीराचा केवळ एका मुलीइतका संकुचित वापर करणं त्यांना मंजूर नाही. स‌बब ते स‌तत नव्या संधीच्या शोधात असतात. लुईजाशी एका लग्नात त्यांची गाठ पडते. टेनोचच्या एका लांबच्या भावाची ती पत्नी असते. मुलांच्या लाळघोटेपणाला ती दाद देत नाही. त्यांनी दूरवरच्या एका रम्य स‌मूद्रकिना-यावर नेण्याचं दिलेलं आमंत्रणही ती हसून ऎकून घेते. पण विसरून जाते. तर तिला आठवतं ते नव-याचा बाहेरख्यालीपणा स‌मोर आल्यावर ही मुलं, नव-याच्या दुष्कर्माला तिने दिलेलं उत्तर ठरणार असतात. ती लगेचच टेनोचला फोन करून येण्याचं मान्य करते आणि प्रवास सुरु होतो.सिनेमात सेक्सला भरपूर वाव आहे. आणि त्याचं पुरेसं स्पष्ट चित्रण हे कारणाशिवाय नुसतं आंबटशाैकिनांना डोळ्यासमोर ठेवून केलेलं नाही. दोन बायकांचं संकुचित जग दाखविण्यासाठी नात्यानात्यातला फरक दाखविण्यासाठी, शरीरसंबंधांकड़े पाहण्याचे विविध दृष्टिकोन चित्रित करण्यासाठी, असा वेगवेगळ्या कारणांनी योजलेला हा वापर आहे. कुणाला हा मोकळेपणा खटकू शकेल, पण त्या प्रसंगातून दिग्दर्शकाला काय सुचवायचं आहे,याचा विचार केल्यास तसं होण्याची शक्यता कमी.
सिनेमाचा दुसरा स्तर आहे, तो मेक्सिकोमागचं मेक्सिको दाखविणारा. एक आर्थिकदृष्ट्या संपन्न असणा-या उन्मत्त स‌माजामागे अनेकदा दुर्लक्षित अर्थदुर्बल घटक असतात, ज्यांचं अस्तित्त्व श्रीमंत स‌माज मान्य करीत नाही. किंवा त्याच्या लेखी ते अस्तित्त्वातच नसतं. असं सुचविणारा हा स्तर आहे. हा सिनेमात येतो, तो प्रसंगांचं जोडकाम करणा-या निवेदकामार्फत किंवा स‌मोर चाललेल्या दृश्यांच्या पार्श्वभूमीला घडणा-या , पण प्रमुख पात्रांच्या नजरेस न पडणा-या दृश्यांमधून. इथला निवेदक पूर्णपणे त्रयस्थ आहे. त्याला जशी प्रमुख पात्रांची माहिती आहे. तशीच आजूबाजूला इतरांचीही असावी. कधी ती त्याच्या बोलण्यात येते तर कधी नाही. पण त्याला ती जाणवत असल्याचं दिसून येतं. उदाहरणार्थ मंडळी स‌मुद्रकिना-यावर पोहोचल्यावर तिथे जवळ राहणा-या कोळी कुटुंबांकडून त्यांचं आदरातिथ्य केलं जातं. थोड्या पैशांच्या मोबदल्यात त्यांच्या राहण्या जेवण्याचा प्रश्न सोडवला जातो. इथे निवेदक आपल्याला कळवतो, की लवकरच हा रम्य किनारा एक मोठी हॉटेल कंपनी विकत घेईल. या कोळी कुटुंबाचा रोजगार जाईल. कुटुंबप्रमुख नोकरी शोधायला शहराची वाट धरेल. आणि अखेर परत येऊन या जागी उभारलेल्या हॉटेलात एक सामान्य नोकरी पत्करेल. ही छोटी चार वाक्यांत येणारी गोष्ट आपल्याला एका आर्थिक स्थित्यंतराची चाहुल देऊन अनेकांची प्रातिनिधिक परिस्थिती मांडते.
या प्रकाराची माहिती किंवा बड्या बापांच्या बेट्यांच्या हाैशी प्रवासादरम्यान मागे दिसत राहणारी लष्कर, अपघात, मोर्चे,रोडब्लॉक्स यांची दृश्यही एका वेगळ्या जगाला आपल्यापुढे आणतात. या दोन जगातली वाढती दरी तर आपल्यापुढे येतेच, वर आपल्या क्षुल्लक लहरींना नको इतकं महत्त्व देणारी तरुण पिढी किती उथळ आहे. हेदेखील स‌मोर येतं.
केवळ गोष्टीपलीक़डे पाहणा-यांना अँड युअर मदर टू हा इंग्रजीतर भाषेतील सिनेमांसाठी आँस्कर नामांकनात (लगान होता त्याच वर्षी) का होता, हे कळलंच नाही. त्यासाठी त्यांनी गोष्टीपलीकडे पाहण्याची आवश्यकता आहे. हा सिनेमा जे सांगतोय असं वाटतं, त्यापलीकडे जाऊन काहीतरी सांगणारा आहे. आपण किती ऎकू शकतो, हे आपल्यावर आहे.
-गणेश मतकरी

0 comments:

Post a Comment

  © Blogger template Werd by Ourblogtemplates.com 2009

Back to TOP