अप्रतिम गाणी आणि रसरशीत अनुभव

>> Tuesday, May 27, 2008

वास्तव आयुष्यातल्या व्यक्तींवर आधारित असणारे चरित्रपट अधिक आव्हानात्मक असतात. कारण नाट्यमयतेसाठी पदरचे प्रसंग घालणं धोक्याचं असतं. प्रेक्षकाला अखेरपर्यंत धरून तर ठेवायचं असतं, पण त्यासाठी "सिनेमॅटिक लिबर्टी' तर घेता येत नाही! अशा परिस्थितीतही "वॉक दी लाईन' एक चांगला सिनेमा आहे. त्याला कारणीभूत आहे, जोकिन फिनिक्स आणि रीज विदरस्पून या दोघांचा खणखणीत अभिनय आणि गोष्टीत वापरलेली अर्थवाही गाणी. प्रसिद्ध अमेरिकन गायक जॉन कॅश आणि त्याच्यासोबत कार्यक्रम करणारी, अखेरीस त्याच्या प्रेमात पडलेली गायिका जून कार्टर-कॅश यांच्या आयुष्यावर आधारित असलेला हा सिनेमा. जॉन (जोकिन फिनिक्स) एका गरीब शेतकरी कुटुंबातला मुलगा. कामधंद्याच्या शोधात तो गाव सोडून शहराकडे निघतो. तेव्हा त्याच्यापाशी संगीतावरचं अफाट प्रेम असतं आणि मोठ्या भावाच्या अपघाती मरणाला कारणीभूत ठरल्याचा अपराधी गंडही. हा गंड आणि वडिलांच्या कडक स्वभावाचा, तिरस्काराचा एक धाक जन्मभर जॉनची पाठ सोडत नाहीत. त्यात प्रेमात पडून घाईघाईनं केलेलं लग्न. बायको विवियन (जिनिफर गुडविन) आणि मुलांची जबाबदारी. जॉनची अनेक बाजूंनी होत असलेली घुसमट. त्याला वाट मिळते, ती संगीतातूनच. धीर गोळा करून केलेलं त्याचं पहिलंवहिलं रेकॉर्डिंग गाजतं आणि जॉन रातोरात स्टार होतो. प्रसिद्धी, पैसा, यश... आणि पाठोपाठ आलेली ड्रग्स-दारू अशी व्यसनंही. त्याच सुमारास त्याच्या आयुष्यात जून कार्टर (रीज विदरस्पून) ही गायिका येते. तिचा मनमोकळा खेळकर स्वभाव, जॉनचं संगीत समजून घेण्याची क्षमता, त्याला ठराविक अंतरावर थांबवण्याची-आवरण्याची तिची ताकद, खंबीरपणा... यातून तो तिच्यात गुंतत जातो. त्या दोघांच्या एकत्र येण्यापर्यंतचा त्यांचा प्रवास म्हणजे "वॉक दी लाईन'ची गोष्ट. खुद्द जून कार्टर-कॅश यांनीच रीज विदरस्पूनची या भूमिकेसाठी निवड केली होती. रीजनं ती सार्थ ठरवली आहे. तिचा खंबीर स्वभाव, जॉनवरचं प्रेम, त्याची आणि त्याच्या कुटुंबीयांचीही वाटणारी काळजी. त्यातून त्याला सावरण्याची धडपड... सगळंच अप्रतिम. तसंच जॉनचं काम करणाऱ्या जोकिन फिनिक्सचंही. त्याच्या स्वभावातला उत्कटपणा, जूनसाठी वेडावून जाणं, तिच्या आधारासाठी तडफडणं आणि एकीकडे संसाराच्या जबाबदारीनं दुभंग होत जाणं.... जोकिननं मूर्तिमंत साकारलं आहे. मात्र जूनची व्यक्तिरेखा जशी आतून ताकद घेऊन येणारी वाटते, तसं जॉनचं होत नाही. त्याच्या कलावंतपणाला न्याय देताना, माणूस म्हणून तो काहीसा खलत्वाकडे झुकला आहे. त्याचा हट्ट, आकांत, बेफिकिरी यांना निव्वळ स्वार्थाची छटा आली आहे. अर्थात हे जोकिनचं अपयश नव्हे, हे मान्य करायलाच हवं.
जोकिन आणि रीज यांनी स्वतःच गायलेली गाणी नुसतीच गाणी नाहीत. त्यांच्या सहज अर्थवाही शब्दातून त्या दोघांची मनं व्यक्त होत राहतात. त्यांची उत्कट नाती विणली जातात. गोष्ट पुढे जात राहते. तुरुंगातल्या आपल्या चाहत्यांसाठी जॉनने फल्कन तुरुंगात सादर केलेला कार्यक्रम म्हणजे या गायक-दांपत्याच्या आयुष्यातला फार महत्त्वाचा भाग. तिथल्या कैद्यांच्या उत्कट प्रतिसादातून जॉनचा सच्चा सूर आणि त्याचं जूनवरचं प्रेम आपल्यापर्यंत पोचत राहतं. हा सच्चा सूर असलेली गाणी आणि त्या दोघांचाही रसरशीत अभिनय यासाठी तरी " वॉक द लाईन' पाहायलाच हवा.
-मेघना भुस्कुटे

3 comments:

Abhijit Bathe May 27, 2008 at 11:00 PM  

मेघना - अगदीच छोटुकलं परिक्षण लिहिलयस पण चांगलं लिहिलयस. बाय द वे - इकडे तरी जोऍक्विन असा उच्चार करतात. माझ्या माहितीप्रमाणे - तो रिव्हर फिनिक्सचा भाऊ (offhand आठवताहेत ते - stand by me, indiana jones and the last crusade). रिव्हर एक अप्रतिम ऍक्टर बनेल असं भल्याभल्यांचं भाकित होतं, पण ते त्याने स्वत:च गर्दच्या आहारी जाऊन खोटं पाडलं.

अमेरिकेत जॉनी कॅश ही एक कल्ट फिगर म्हणुन ओळखली जाते. मी स्वत: western music फारसं ऐकत नाही, पण हा पिक्चर यायच्या आधीच मी जॉनी कॅशचा भक्त झालो होतो, आणि म्हणुनच हा पिक्चर मी बरेच दिवस टाळला.
यातली गाणी जॉनी कॅशची आधीच प्रसिद्ध झालेली गाणी आहेत - ती जोऍक्विनने गाऊनही त्यांची गोडी टिकवुन आहेत.

But you are right - biographical movie बनवुनही तो इंटरेस्टिंग ठेवणं अवघड असतं आणि ते इथे या पिक्चरच्या बाबतीत जमलंय.

तुझी परिक्षणं चांगली आहेत - मागचं कुठलंतरी एक आवडलं होतं, पण कमेंट लिहायची राहुन गेली....

Meghana Bhuskute June 6, 2008 at 12:40 AM  

धन्यवाद. सध्या जरा गडबडीत आहे...

Ashintosh June 17, 2008 at 3:08 AM  

या चित्रपटातील गाणी चित्रपटातील अभिनेत्यांनीच गायली आहेत हा अनेक चित्रपट-परीक्षकांबरोबरच 'त्याच्या' साठी देखील आश्चर्याचा सुखद धक्का होता. चित्रपटाची आठवण करून दिल्याबद्दल धन्यवाद.

Post a Comment

  © Blogger template Werd by Ourblogtemplates.com 2009

Back to TOP