विसंवादाचं अस्वस्थ रूप

>> Thursday, May 22, 2008

एका गोष्टीनुसार कोणे एकेकाळी संपूर्ण मानवजातीची भाषा एकच होती. त्यामुळे अर्थातच सर्व मानवजात एकत्र येऊन सर्वशक्तीनिशी कोणतंही काम करून दाखवू शके. अशातच एकदा मेसोपोटेमियात मानवानं आव्हान दिलं ते थेट स्वर्गाला. त्यांनी स्वर्गापर्यंत पोचेलसा मनोरा बांधायला घेतला. हा मनोरा म्हणजे टॉवर ऑफ बेबल पुरा होण्याआधीच देवानं हालचाल केली आणि अनेक भाषा उत्पन्न केल्या. त्यामुळे या मनोऱ्यावर काम करणाऱ्यांना एकमेकांमध्ये संवाद साधणंच शक्य होईना. मानवजात जगभरात विखुरली गेली आणि मनोरा अर्धवटच राहिला. हा विसंवाद पुढं मानवजातीत कायमच राहिला. मात्र, त्याची मुळं खोलवर पसरत गेली. विविध देशांमध्ये त्यांच्या राजकीय धोरणांमुळे, सामाजिक परिस्थितींमुळे तो वाढत तर गेलाच आहे, वर एका समाजाच्या, एका कुटुंबाच्या लोकांपर्यंत, समाजाच्या छोट्यात छोट्या घटकांपर्यंत पोचला आहे.
कम्युनिकेशन ब्रेकडाऊन किंवा सर्व स्तरांमधला वाढता विसंवाद हे प्रमुख कथासूत्र असणाऱ्या बेबलचं नाव महत्त्वाचं आहे. कारण ते यातल्या कथाभागाकडे कोणत्या दृष्टिकोनातून पाहायचं हे सांगतं. विसंवादातून उत्पन्न होणारा गोंधळ म्हणजे "बेबल.'
दिग्दर्शक आलिआन्द्रो गोन्जालेस इनारित् आणि पटकथाकार गिलेर्मो आरिआगा यांचा एकत्रितपणे केलेला हा तिसरा चित्रपट. याआधीचे त्यांचे चित्रपट म्हणजे "आमोरस पेरोस' ज्यावरून मणीरत्नमचा युवा प्रेरित होता आणि "ट् वेन्टीवन ग्रॅम्स' हे दोन चित्रपट आणि बेबल यांच्यामध्ये एक महत्त्वाचं साम्य आहे, ते रचनेचं. तीनही चित्रपटांची कथानकं ही अधिक छोट्या गोष्टींमध्ये विभागण्यात आली आहेत आणि या गोष्टींचं आणखी विभाजन करून त्यांना कालक्रमात पुढेमागे फिरवण्यात आलं आहे. त्यामुळे प्रत्यक्ष चित्रपटांचे परिणाम हे एखाद्या जिग सॉ पझलप्रमाणे आहेत, जिथं सुरवातीचे काही तुकडे आपल्याला केवळ गोंधळून टाकण्यापलीकडे काहीच करत नाहीत. मात्र, यथावकाश अधिक तुकडे समोर आल्यावर आपली नजर स्पष्ट व्हायला लागते आणि चित्र आकार घ्यायला लागतं. तीन चित्रपटांतला सर्वांत गुंतागुंतीचा होता ट् वेन्टीवन ग्रॅम्स, तर आशयाच्या दृष्टीनं अधिक प्रभावी आहे बेबल. या तिघांना रचनात्मक चित्रत्रयी म्हणणं वावगं ठरणार नाही.
बेबल उलगडतो चार संबंधित गोष्टींमधून. पहिली आहे ती मोरोक्कोमधल्या गरीब शेतकऱ्याच्या मुलांची. या शेतकऱ्याने आपल्या शेळ्यांच्या कळपाला लांडग्यांपासून वाचवण्यासाठी एक बंदूक विकत घेतली आहे. मुलं ही बंदूक वापरतात ती चुकीच्या टारगेटवर, ज्याचा परिणाम हा शोकांत होतो. दुसरी गोष्ट आहे रिचर्ड (ब्रॅड पिट) आणि सुझन (केट ब्लॅंन्चेट) या पती-पत्नीची. ही दोघं जात असणाऱ्या बसमध्ये शिरलेली गोळी सुझनच्या मानेजवळ जखम करते आणि आधीच एका दुःखातून बाहेर पडलेल्या या दोघांवर जीवावरचं संकट येतं. तिसरी गोष्ट आहे अमेलिया (एड्रिआना बाराझा) सांभाळत असलेल्या रिचर्ड आणि सुझनच्या दोन मुलांची (एली फॅनिंग आणि नेथन गॅम्बल). रिचर्ड/सुझन मोरोक्कोत अडकल्यानं अमेलियाला स्वतःच्या मुलाच्या लग्नाला मेक्सिकोत जाता येत नाही. कारण मुलांकडे पाहणारे कोणी नाही. मग ती आणि तिचा भाचा सान्तिआगो मुलांना घेऊन निघतात; पण परत येताना मेक्žसिकोच्या सीमेवरल्या पोलिसांना संशय येतो आणि परिस्थिती बिघडते.
या तीन गोष्टी ढोबळपणे एकमेकांना जोडलेल्या असल्या तरी चौथी त्यामानानं खूपच वेगळी आहे. तिचा संबंध या घटनांशी आहे, पण दूरचा. ही गोष्ट आहे जपानमध्ये राहणाऱ्या चिएकोची (रिंको किकोची). चिएको ऐकू आणि बोलू शकत नाही. आवाजात बुडून गेलेलं जग तिच्यासाठी परकं आहे. तिच्या आईनं आत्महत्या केली आहे, तर वडिलांशी तिचा संवाद उरलेला नाही. खरं तर कोणाशीच.
चिएकोची व्यक्तिरेखा ही यातल्या कथासूत्राला संपूर्णपणे व्यक्त करणारी प्रमुख व्यक्तिरेखा आहे, किमान आशयदृष्ट्या. संवादाचा अंत हा तिच्याबाबतीत पूर्णपणे झालेला आहे. ती जगाला समजून घेऊ शकत नाही, ना जग तिला. दिग्दर्शक भोवतालचं ध्वनिप्रदूषित जग तिच्या नजरेतून आणि त्रयस्थपणे दाखवताना आवाज घालवतो आणि पुन्हा आणतो. हे प्रसंग अतिशय परिणामकारक आहेत आणि त्यातली क्लृप्ती साधी वाटली तरी विचार थेटपणे पोचवणारी आहे. या प्रसंगामधली बदलत्या दृष्टिकोनाबरोबर होणारी आवाजाची ये-जा चिएकोच्या जगाची अंशतः कल्पना देऊन जाते.
बेबलमध्ये अमेरिका, मेक्सिको, मोरोक्को आणि जपान या चार ठिकाणांमध्ये विभागलेल्या एकाच घटनेच्या तुकड्यांमधले गोंधळ तर संपर्क नसल्याने, असून वापरता न आल्याने, सरकारी धोरणांमुळे आणि अपसमजांमुळे- गैरसमजांमुळे होतात, पण त्याखेरीज चित्रपटात महत्त्वाचा ठरतो तो व्यक्तिगत पातळीवर वाढत जाणारा विसंवाद. रिचर्ड आणि सुझन हे दोघे त्यांच्या लहान मुलाच्या अपमृत्यूने हळवे झाले आहेत, पण ते एकमेकांशी बोलत नाहीत. नुसतेच कुढत राहतात. मोरोक्कोमधल्या शेतकऱ्याला त्याची मुलं काय करू शकतात हे ठाऊक नाही आणि मुलंही घडलेल्या घटनेनंतर त्याला विश्žवासात घेत नाहीत. अमेलिया आपल्या अडचणी ना रिचर्डपर्यंत धडपणे पोचवू शकत, ना आपल्या भाच्यापर्यंत आणि चिएकोचं तर आईच्या मृत्यूनंतर सगळं जगच हरवलेलं आहे. तिचे वडील तिला समजू शकत नाहीत आणि इतर जगावरचा तिचा राग आणि संपर्काची नड दाखवून देण्यासाठी तिला चुकीचे मार्ग अवलंबावे लागतात. बेबलमधलं हे जवळच्या माणसांचं अनोळखी होणं ही आजच्या आधुनिक समाजवास्तवाची सर्वांत मोठी शोकांतिका आहे.
अनपेक्षित परिणाम
विसंवादाखेरीज आणखी काही सूत्रांनाही इनारित् नं जवळ आणलं आहे. पहिलं म्हणजे आपल्या वागण्याचे अनपेक्षित परिणाम. इथं मोरोक्कोमधल्या शेतकऱ्यानं आपल्या कळपाच्या सुरक्षिततेसाठी पावलं उचलल्याचा परिणाम हा मेक्सिकोच्या उजाड प्रदेशात दोन अमेरिकन मुलांच्या मृत्यूची शक्यता तयार करतो. यातली कोणतीच गोष्ट जाणूनबुजून केली जात नाही. प्रत्येकानं घेतलेले निर्णय हे त्याच्यापुरते असतात. मात्र, त्याचा परिणाम दिसतो वेगळ्याच ठिकाणी. छोट्याशा हालचालीचे हे दूरगामी अकल्पित परिणाम अपघाती जरूर वाटतात, पण रचलेले नाहीत. ही शक्यता आपल्याला आपल्या वागण्याचा विचार एका वेगळ्या पातळीवर करायला लावते. या दोन प्रमुख कल्पनांबरोबरच आधुनिकतेमधून येणारा एकटेपणा, कायद्यानेच सामान्यांना गुन्हेगार ठरवणं, माणसं ओळखण्यात होणारी चूक, दुःखाची विविध रूपं आणि ती व्यक्त होण्याच्या पद्धती यासारखी अनेक छोटी सूत्रं दिग्दर्शक पुढे आणतो.
बेबलचं दृश्य रूप हे त्यातल्या बदलत्या पार्श्वभूमीने, वास्तववादी चित्रणानं आणि देशोदेशीच्या कलावंतांनी एकत्र येण्याने बनलं आहे, जे हल्लीच्या दोन चित्रपटांची आठवण करून देतं. स्टीफन गगान यांचा सिरीआना (2005) आणि शोडरबर्गचा "ट्रॅफिक' (2000). आर्थिक राजकारण, दहशतवाद, राजकीय धोरण आणि सामान्यांचं आयुष्य एकदुसऱ्याशी संबंधित असल्याचा दावा करणारा सिरीआना आणि ड्रग ट्रेडच्या विविध बाजू दाखवणारा ट्रॅफिक हे दोन्ही चित्रपट त्या-त्या वर्षीच्या उत्तम चित्रपटात होते. ऑस्कर नामांकनातही होते आणि ट्रॅफिक तर पारितोषिकप्राप्तही ठरला.
हॉलिवुडचा नवा चित्रपट एकेकाळच्या स्टुडिओ चित्रपटांहून किती पुढं गेला आहे, हे बेबल पाहून लक्षात येईल. आपल्याकडे आजही असा मोठा प्रेक्षकवर्ग आहे जो हॉलिवुडच्या गुजऱ्या जमान्यातच रमतो आणि स्टुडिओच्या कारकिर्दीलाच सुवर्णकाळ मानतो. आखीवरेखीव आणि हमखास करमणुकीपेक्षा अधिक देण्याचा आजच्या हॉलिवुडचा प्रयत्न हा स्टुडिओ कारकिर्दीहून नक्कीच वरचढ आहे आणि हे सर्व थरांवर मान्य होण्याची गरज आहे. भूतकाळात रमण्यापेक्षा हा प्रगतिशील वर्तमानकाळच चित्रपटसृष्टीला पुढं नेणारा ठरेल.
-गणेश मतकरी

1 comments:

आनंद पत्रे September 17, 2011 at 11:55 PM  

सुंदर सिनेमा, अतिशय सुंदर विश्लेषण...

Post a Comment

  © Blogger template Werd by Ourblogtemplates.com 2009

Back to TOP