कथेपलीकडे जाऊ पाहणारा "वळू'

>> Sunday, May 11, 2008

काही वर्षांपूर्वी "श्वास' नामक चित्रपटाने "मराठी चित्रपटसृष्टी' असा काहीसा प्रकार अस्तित्वात असल्याची जाणीव लोकांना करून दिली आणि आपल्या चित्रोद्योगात एक नवीन चैतन्य आणून दिलं. तथाकथित बॉलिवूडलासुद्धा याची दखल घ्यायला लागली आणि "श्वास'पासून मराठी चित्रपटसृष्टीनं कात टाकली, असा प्रवाद प्रचलित झाला. खरं तर ही अतिशयोक्ती. कारण दर्जाच्या दृष्टीनं पाहायचं तर आपल्याकडं फार मोठा फरक पडला नाही. डोंबिवली फास्ट, आम्ही असू लाडके, रेस्टॉरंट यांसारखे हाताच्या बोटांवर मोजण्याइतके खरेखुरे चांगले चित्रपट सोडले तर अधिक करून आनंदच होता. हे चित्रपट बनवणाऱ्या निशिकांत, अभिराम, सचिनसारख्या तरुण दिग्दर्शकांबरोबरच सुमित्रा भावे, अमोल पालेकर यांच्यासारखे काही ज्येष्ठ दिग्दर्शकही कार्यरत होते, आहेत. मात्र या काही मंडळींच्या प्रामाणिक कामगिरीबरोबर इतरांच्या मध्यम वा दर्जाहीन कामाचं प्रमाण खूप जास्त आहे. "श्वास'मुळे अनेक निर्माते-दिग्दर्शक पुढे झाले ही गोष्ट खरी, पण पुढे होणं हे पुरेसं नाही. अखेर महत्त्व आहे ते पडद्यावर काय येतं त्याला. जे चित्र आजही फार आशादायक नाही. अशा परिस्थितीत पुण्याच्या फिल्म्स अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूटमधून चित्रपट प्रशिक्षण घेतलेल्या उमेश कुलकर्णीच्या "वळू'मुळे पुन्हा एकदा धामधूम होऊन मराठी चित्रपटांचं कौतुक होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. रॉटरडॅमच्या चित्रपटमहोत्सवासाठी झालेली वळूची निवड, मुक्ता आर्टस् नं वितरणासाठी घेतलेली पहिली मराठी निर्मिती, वेगळा विषय, तांत्रिक हुशारी आणि उत्तम अभिनय, अशा अनेक बाबतींत वळूनं आगमनातच लक्ष वेधून घेतलं आहे. शहरी प्रेक्षकांपर्यंत तो सहज पोचेलशा मोक्याच्या जागा काबीज करून वितरकांनी तो पाहिला जाईल, हीदेखील काळजी घेतली आहे. एकूण वातावरण उत्साहाचं आहे. प्रीमिअरच्या वेळी मी तो पाहिला तोही अशाच उत्साहाच्या वातावरणात. वळूचं कथानक घडतं ते कुसावडे या महाराष्ट्रातल्या छोट्याशा गावात. या गावात वळू मोकाट सुटलेला आहे. देवाच्या नावानं सोडलेल्या या बैलाला आवर घालणं कोणालाच जमलेलं नाही. अखेर ही जबाबदारी येऊन पडते ती स्वानंद गड्डमवार (अतुल कुलकर्णी) या फॉरेस्ट ऑफिसरवर. वरच्यांच्या दबावामुळे हातातलं महत्त्वाचं काम सोडून त्याला कुसावड्याला निघावं लागतं अन् जंगली जनावरं पकडणाऱ्याला बैल पकडण्याची जोखीम स्वीकारावी लागते. गावात त्याला सामोऱ्या येतात त्या अनेक इरसाल व्यक्तिरेखा. जीवन्या (गिरीश कुलकर्णी) तर आल्याआल्याच त्याचा ताबा घेतो. गड्डमवारच्या भावाच्या हाती असलेल्या कॅमेऱ्यानं अन् त्याच्या डॉक्युमेंटरी बनवण्याच्या विचारानं भारून गावचे सगळेच लोक कॅमेऱ्यासमोर चमकण्यासाठी वळूची काहीबाही माहिती देतात; मात्र ती परिस्थिती स्पष्ट न करता अधिकच गोंधळायला लावणारी असते. दरम्यान, सरपंच (मोहन आगाशे) आणि गावचं तरुण नेतृत्व आबा (नंदू माधव) यांच्यातला वाद अधिकच पेटतो आणि आबाच आपल्या साथीदारांसह वळूला पकडण्याची तयारी करतो. दरम्यान, लक्षात येतं, की वळूला प्रत्यक्ष पकडणंही गड्डमवारला आधी वाटलं तेवढं सोपं नाही. मात्र तो हे आव्हान स्वीकारायचं ठरवतो. वळूमध्ये (केवळ मराठी चित्रपटातच नव्हे, तर एकूणच) स्वागतार्ह वाटण्याजोग्या अनेक गोष्टी आहेत. वातावरणनिर्मिती आणि व्यक्तिचित्रण यांचा सर्वांत आधी खास उल्लेख हवा. गावाची पार्श्वभूमी, त्यातल्या अनेक छोट्या-मोठ्या व्यक्तिरेखा यांचं थोडक्यात पण स्पष्ट केलेलं चित्रण ही पटकथेची जमेची बाजू आहे. भटजी (दिलीप प्रभावळकर) आणि त्याची पत्नी (निर्मिती सावंत), सांगी (अमृता सुभाष), सखूबाई (ज्योती सुभाष) यांसारख्या पडद्यावर फार काळ नसणाऱ्या व्यक्तिरेखाही या ठळक रेखाटनामुळे लक्षात राहण्याजोग्या झाल्या आहेत. या व्यक्तिरेखांसाठी घेतलेली मंडळीही त्याला निश्चितच जबाबदार आहेत. छोट्यात छोट्या भूमिकांसाठीही दिग्दर्शकानं निवडलेली माणसं ही अभिनयासाठी नावाजलेली आणि इतरत्र मोठ्या भूमिका करणारी प्रथितयश मंडळी आहेत. त्यांनी या भूमिका स्वीकारण्यातही त्यांची नवीन करून पाहण्याची आवड अन् दिग्दर्शकावरला (पर्यायानं फिल्म इन्स्टिट्यूटवरला?) विश्वास दिसतो. गावचं चित्रणही तपशिलात अन् अस्सल झालेलं आहे. देऊळ, माळ, गावकरी भेटण्याच्या जागा, हागणदारी अशी अनेक ठिकाणं इथे बेमालूम उतरली आहेत. एकूणच वातावरण त्यातल्या गावकऱ्यांसह एखाद्या मिरासदारांच्या गोष्टीप्रमाणे मिस्कील पण खरंखुरं वाटणारं आहे. दिग्दर्शक उमेश कुलकर्णी आणि छायाचित्रकार सुधीर पळसणे यांनी तांत्रिक बाजूही उत्तम सांभाळल्या आहेत. दृश्यांची रचना, छायाप्रकाशाचा, अवकाशाचा प्रसंगानुरूप करण्यात आलेला वापरदेखील लक्षात राहण्याजोगा आहे. किंबहुना एकूण दृश्यरूपाबाबतच हे म्हणता येईल. मात्र या सर्व चांगल्या गोष्टी असूनही काही खटकणाऱ्या गोष्टींचा उल्लेख हा आवश्यक वाटतो. ज्यांचा संबंध हा प्रामुख्याने संहितेशी आहे, जिचा व्यक्तिचित्रणाचा भाग उत्तम असला तरी कथानकाचा आलेख हा फसवा वाटतो. इथं पडणारा सर्वांत महत्त्वाचा प्रश्न म्हणजे गावात सुटलेला बैल हा खरा की रूपक? खरं तर रूपकाचा वापर असलेल्या पटकथा या वास्तव आणि रूपकात्मक अशा दोन्ही पातळ्यांवर पोचायला हव्यात. मात्र ते क्षणभर बाजूला ठेवू. प्रश्न पडण्याचं एक कारण म्हणजे बैलाचा प्रचंड त्रास असल्याचा अन् सहा महिन्यांपासून अधिक काळ तो सुरू असल्याचा इथं उल्लेख आहे. हे रूपक असेल तर आपण ही गोष्ट समजून घेऊ; पण वास्तव असेल तर बैलानं इतका काळ पसरवलेली दहशत ही पटण्यासारखी नाही. त्यातून इथं गावकऱ्यांच्या कथांमधून दहशत पसरवणारा बैल हा प्रत्यक्षात फारच शांत दिसतो, इतका की जो उपद्रव करेलशी शंकाही येऊ नये. इथं पटकथा आणखी एक गोष्ट सुचवते, ती म्हणजे बैल खरा शांतच असावा अन् आख्यायिका गावकऱ्यांच्या डोक्यातून आल्या असाव्यात. यासाठी एका प्रसंगी आपल्याला बैलाचा निरुपद्रवीपणा दाखवलाही जातो आणि त्याच्या बाजूनं बोलणारी सखूबाई, आजा आणि वेडी ही तीन पात्रंही उभी केली जातात. मात्र पुढे एकदा सखूबाईच म्हणते, की गावकऱ्यांनी त्रास दिल्यानंच बैल बिथरला. मग जर तो बिथरला, तर त्याचा बिथरलेपणा हा दृश्यांमध्ये दिसून का येत नाही? नाही म्हणायला एकदा त्यानं सायकल तोडल्याचं किंवा आज्याला मारल्याचं वा आणखी काहीबाही सांगितलं जातं, मात्र जेव्हा हे प्रत्यक्ष दाखवलं जात नाही तेव्हा हीदेखील कोणा उचापत्या गावकऱ्याची खोडी असेलसं वाटायला लागतं. थोडक्यात म्हणजे, बैल निरुपद्रवी आहे आणि गावचे गोष्टी रचतायत, बैल गावकऱ्यांमुळे खरोखरचा पिसाळलाय, का गावकरी प्रामाणिक आहेत आणि बैल हा नैसर्गिकपणेच बिथरलाय, याविषयी पटकथा ठाम निर्णय देत नाहीत. बरं, असं मानलं, की वळू हे विचारस्वातंत्र्याचं रूपक आहे आणि समाज त्याच्यावर दडपण आणू पाहतोय, तर समाजानं केलेला अन्याय हा संदिग्ध असता कामा नये. स्पष्ट हवा. फॉरेस्ट ऑफिसर हा वास्तवात हतबल होऊ शकेल; पण जेव्हा तो विचारस्वातंत्र्यावर घाला घालणाऱ्यांचं प्रतीक म्हणून उभा राहतो तेव्हा तो गोंधळात पडलेला दिसणं हे रूपकात्मकतेलाच मारक ठरणारं आहे. इथं तो प्रवृत्ती म्हणून उभा राहणं गरजेचं आहे. बरं, पटकथेतलं राजकारणही फार ढोबळ आहे. सरपंच आणि आबा यांच्यामध्ये सुरवातीला दिसून येणारा तिढा हा शेवटपर्यंत तसाच राहतो. चाली-प्रतिचाली सोडा, याच्या स्वरूपातही बदल होत नाही. त्यातून एक बाजू तर पूर्ण वगळल्यासारखी वाटते. ती म्हणजे धर्माची. वळू हा देवाच्या नावानं सोडलेला बैल असल्याचं चित्रपट सांगतो. गावातल्या एकुलत्या एका देवळाचा एकुलता एक भटजी इथल्या व्यक्तिरेखांमधला एक आहे. मग त्याला वळूबद्दल काहीच म्हणायचं नाही का? गावकऱ्यांच्या धोरणातला महत्त्वाचा भाग भटजीच्या भूमिकेवर अवलंबून नाही का? मात्र इथं भटजीला दिलेली भूमिका नगण्य आणि हास्यास्पद आहे. का, ते कळायला मार्ग नाही. मध्यंतरापर्यंतचा भाग हा गावकऱ्यांच्या गोष्टींनाच दिलेला असल्यानं कथा इथं पुढं सरकत नाही अन् चित्रपट स्टॅटिक होतो आणि तो खेळता ठेवायची जबाबदारी येते ती नट मंडळींवर. मात्र अभिनयाची बाजू अन् उत्तम लिहिलेले संवाद हा भाग सुसह्य करतात. पटकथेमुळे चित्रपटात शिरलेल्या दोषांसकटही "वळू' हा दुर्लक्ष करण्याजोगा चित्रपट नाही. त्याच्यामागं असणारा विचार, त्यातून काही सांगण्याचा केलेला प्रयत्न, हा अपघाती नाही, तर जाणीवपूर्वक केलेला आहे. त्याला रंजनमूल्य तर आहेच, मात्र तेदेखील केवळ हसवण्याचा एक कलमी कार्यक्रम राबवणाऱ्या हास्यठेकेदाराच्या पलीकडं जाणारं आहे. त्याचा हेतू अधिक संमत, अधिक प्रामाणिक आहे. उमेश कुलकर्णीचा गाजलेला लघुपट "गिरणी' आणि आता वळू पाहिल्यावर हे सहजपणे लक्षात येतं, की हा दिग्दर्शक केवळ कथा सांगण्यावर समाधानी नाही, तर आपल्या चित्रपटामधून अधिक काही देण्यावर त्याचा कटाक्ष आहे. वळूला जर प्रसिद्धी/ वितरणाला शोभेसा प्रतिसाद मिळाला तर कदाचित अशा लक्षवेधी प्रयत्नांकडे ओढा सुरू होईल. (अर्थात, हा केवळ ग्रामीण चित्रपट आहे असं समजून ग्रामीण विनोदी चित्रपटांची लाट येण्याचा धोकाही समोर आहेच.) निदान या वेळी तरी वळूपासून प्रेरणा घेऊन मराठी चित्रपट खरोखरच कात टाकतील, ही सदिच्छा.
-गणेश मतकरी

3 comments:

Yogesh May 12, 2008 at 5:10 AM  

जबरी लिहिलंय. ’आम्ही असू लाडके’ बद्दल अवश्य लिहा. वाचायला खूप आवडेल. तो एक आणि टिंग्या एक बघून डोळ्यात खरं पाणी आलं होतं. नंतर आलेले तसले तथाकथित संवेदनशील बॉलीवूडी चित्रपट फार नाटकी वाटले.

ganesh May 12, 2008 at 12:57 PM  

thanks. tingya will be posted soon

खेड्यान येडं November 10, 2011 at 4:29 AM  

dialogues, their style to deliver is far from the reality. anyone who saw surya/chandrakant madhre's films can understand wat exactly i want to say. its an average film made by an average director/writer who have never been to village except their holidays.
its imaginary village they want us to see and believe. bad JOKE if they say its a good film.

Post a Comment

  © Blogger template Werd by Ourblogtemplates.com 2009

Back to TOP