आगळं धर्मयुद्ध

>> Saturday, February 2, 2008


एक धर्मस्थळ. अतिशय महत्त्वाचं, पण दोन भिन्न धर्मीयांसाठी.या धर्मस्थळावर ताबा कुणाचा असेल यासाठी खेळलं जाणारं राजकारण, आणि त्यातून होणारी प्रत्यक्ष आणि संभाव्य अपरिमित मनुष्यहानी. रिडली स्कॉट या दिग्दर्शकाच्या `किंगडम ऑफ हेवन` चा विषय प्रत्यक्ष धर्मस्थळाचं, किंवा संबंधित धर्माचं नाव न घेता सांगितला तर मला वाटतं कोणालाही अयोध्येत घडलेल्या, घडवलेल्या दंगलींची आणि देशभर पेटलेल्या आगडोंबाची आठवण झाल्याशिवाय राहणार नाही. यात आश्चर्य नाही, कारण शेवटी धर्माचं राजकारण हे त्यातला तपशिलाचा भाग सोडला तर सारखंच असतं. मग ते आज घडणारं असो, वा हजार वर्षांपूर्वी, आणि रामाच्या जन्मभूमीत असो वा ख्रिस्ताच्या वधभूमीत. `किंगडम ऑफ हेवन` घडतो 1184 च्या सुमारास जेरुसलेमच्या पार्श्वभूमीवर. जेरुसलेम या मुस्लिम आणि ख्रिश्चन धर्मीयांना सारख्याच महत्त्वाच्या असलेल्या धर्मस्थळी शंभर वर्षांपासून ताबा आहे तो ख्रिश्चनांचा. मुस्लिम सत्ताधाऱ्यांना ते परत मिळवायचं आहे आणि त्यासाठी त्यांची जमवाजमव सुरू आहे.फ्रान्समधल्या एका गावातला लोहार बेलिअन (ऑर्लांडो ब्लूम) हा त्याच्या मुलाच्या मृत्यूने आणि पत्नीच्या आत्महत्येने शोकमग्न आहे. त्याच वेळी इबेलिनचा बॅरन गॉडफ्रे (लिआम नीसन) त्याच्या दारात येतो, आणि बेलिअन हा त्याचाच अनौरस मुलगा असल्याचं सांगून त्याला आपल्याबरोबर जेरुसलेमला चलण्याची विनंती करतो. आधी नकार देऊनही नंतर बेलिअन गॉडफ्रेला सामील होतो. जेरुसलेमच्या रस्त्यावर झालेल्या एका चकमकीत गॉडफ्रे जखमी होतो आणि त्यातच पुढे त्याचा मृत्यू ओढवतो. मरणापूर्वी तो आपली सरदारकी बेलिअनला बहाल करायला मात्र विसरत नाही. नवा बॅरन ऑफ इबेलिन बेलिअन, मजल दरमजल करत येऊन पोचतो तो जेरुसलेममध्ये आणि लवकरच तिथल्या कुष्ठरोगी राजाच्या (एडवर्ड नॉर्टन) आणि मार्शल टायबेरिअसचया (जेरेमी आयर्नस) मर्जीतला होऊन जातो. सिबिला (इव्हा ग्रीन) या राजाच्या बहिणीच्या प्रेमातही तो पडतो. मात्र तिच्या नवऱ्याचा शत्रू होऊन बसतो.युद्ध व राजाचा मृत्यूजेरुसलेमवर चढाई करण्यासाठी सलाउदीन (घासन मसूद) हा अरब नेता, आपल्या फौजेनिशी येऊन पोचतो आणि युद्धाला तोंड फुटतं. राजाचा मृत्यू ओढवतो, आणि जेरुसलेमच्या रक्षणाची जबाबदारी बेलिअनवर येऊन पडते.रिडली स्कॉटचा हा चित्रपट बहुतांशी ऐतिहासिक घटनांवर आधारित असला तरी वर्तमानातल्या ख्रिश्चन / मुस्लीम झगड्याची त्याला अजिबात आठवण नसणं संभवत नाही. चित्रपटाची जुळवाजुळव ही बुशच्या कथित `वॉर ऑन टेरर` च्या आधी झालेली असली, तरी वर्ल्ड ट्रेड सेंटरफचा आघात त्यापूर्वीच होऊन गेलेला होता. त्यामुळे चित्रपटाच्या शेवटी येणारा मानवतेचा संदेश हा केवळ ऐतिहासिक संदर्भाशी संबंधित आहे, असं म्हणणं योग्य होणार नाही.स्कॉट आणि पटकथाकार विलिअम मोनाहान यांनी रचलेली किंगडम ऑफ हेवनची पटकथा, ही या प्रकारच्या पटकथा कशा रचाव्यात याचा उत्तम वस्तुपाठ आहे. ती शंभर टक्के इतिहासाशी प्रामाणिक नाही, पण त्यात बदलण्यात आलेले तपशील हे कथेचा आशय अधिक टोकदार करतात. उदाहरणार्थ बेलिअन आणि राजकन्या सिबीला यांच्या प्रेमसंबंधाविषयी इतिहास काहीच म्हणत नाही. प्रत्यक्षात ती आपल्या संसारात सुखी होती आणि बेलिअनचाही संसार शाबूत होता. मात्र चित्रपटात हे प्रेम दाखवण्यात दुहेरी फायदा आहे. एक म्हणजे अशा भव्य पटामध्ये आवश्žयक समजल्या जाणाऱ्या रोमान्सची जागा भरून काढली जाते. आणि दुसरं म्हणजे बेलिअनची एक सद् सद्विवेकबुद्धी शाबूत असणारा माणूस अशी प्रतिमा तयार होते. राजाला आपला मृत्यू दिसायला लागल्यावर तो आणि टायबेरीअस एक योजना आखतात. बेलिअनचं सिबिलाबरोबर लग्न लावून द्यायचं आणि तिच्या नवऱ्याला मारून टाकायचं. मात्र बेलिअन या योजनेलातयार होत नाही. त्याची तत्त्वनिष्ठा अधिक अधोरेखित होते, ती प्रेक्षकांना त्याचं सिबिलावर प्रेम असल्याचं माहीत असल्यामुळेच.पटकथेत असलेली आणखी एक ऐतिहासिक चूक म्हणजे बॅल्डविनकडून सिबिलाकडे होणारं सत्तेचं हस्तांतर. हे ताबडतोब झालं नाही. कारण मध्ये काही काळ सत्ता गेली ती सिबिलाच्या मुलाकडे, जो लवकरच मरण पावला. पण हा तपशील घालून पटकथा रेंगाळवण्यापेक्षा चित्रकर्ते हा भाग वगळणं योग्य समजतात. आणि पटकथेला बंदिस्तपणा येण्याच्या दृष्टीनं ते योग्यदेखील आहे.स्कॉटचा ग्ल्रॅडिएटर मला फारसा आवडला नव्हता. त्यातली संगणकीय रोममधली दृश्यं, रसेल क्रोची कामगिरी वगैरे उत्तम होतं. पण या चित्रपटाचा मुद्दा काय, हे कळत नव्हतं. एक साहसकथा किवा सूडकथा यापलीकडे त्याला अस्तित्व नव्हतं. किंगडममध्येही ग्लॅडीएटरची आठवण करून देणाऱ्या अनेक गोष्टी आहेत. इथलं जेरुसलेम पूर्णतः संगणकनिर्मित नाही. शहराच्या मोठ्या सेटवर चित्रीकरण करून इथे संगणकीय दुरुस्त्या करण्यात आल्या आहेत. पण परिणाम हा तितकाच भव्य आहे. युद्धाची काही दृश्य फारच जमलेली आहेत. खास करून शेवटच्या मोठ्या लढाईत थोडक्या सैन्याचा बेलिअन करत असलेला प्रभावी वापर पाहण्यासारखा. मात्र ग्लॅडीएटर आणि किंगडममध्ये एक महत्त्वाचा फरक आहे. आणि तो म्हणजे किंगडमकडे सांगण्यासारखं काही आहे. इथला संदेश आहे तो विवेक शिकवणारा, धर्मांधतेला विरोध करणारा. बेलिअन जेरुसलेमसाठी लढायला तयार होतो, तेव्हा एक गोष्ट त्याच्यासमोर स्पष्ट आहे. तो इथल्या धार्मिक अवशेषांसाठी लढणार आहे. ही जनता कोणत्या धर्माची आहे हे, तो पाहत नाही. केवळ प्राण वाचवणंच त्याला मंजूर आहे. त्यामुळेच जेरुसलेम पडणार असं लक्षण दिसताच, तो सलाउदीनला सामोरा जातो आणि लोकांच्या सुरक्षिततेच्या हमीवर शहर त्यांच्या हवाली करतो. या चित्रपटातल्या बेलिअननं उचललेलं पाऊल हे सामान्यतः असले लार्जर दॅन लाईफ नायक उचलताना दिसत नाहीत. त्यामुळेच मारू किंवा मरू हे वचन असणाऱ्या बुद्धिहीन नायकापेक्षा बेलिअन अधिक प्रभावी वाटतो.श्रद्धेचा सखोल आविष्कार किंगडम कोणाचा कैवार घेत नाही. साहजिकच दोन्ही समाजांतल्या कट्टर मंडळींना तो दुखावतो. अशाही परिस्थितीत त्याची बाजू घेणारे काही खंदे शिलेदार मात्र दिसतात. हमीद दबाशी या मुस्लिम विचारवंताने साईट अँड साऊंडच्या अंकात म्हटलंय, की तसंच पाहिलं, तर हा चित्रपट इस्लामच्या बाजूचा किंवा विरोधातला नाही. ख्रिश्चॅनिटीच्याही बाजूचा- विरोधातला नाही. खरं तर तो धर्मयुद्धाविषयीही नाही. आणि तरीदेखील तो श्रद्धेचाच सखोल आविष्कार आहे.या चित्रपटाची श्रद्धा आहे मानवतेवर. बेलिअनचा विश्वास देवाधर्मावर नाही, पण माणसाचा जीव वाचवण्यावर आहे. माणूस कोणत्या धर्माचा आहे याच्याशी त्याला कर्तव्य नाही. त्याचं माणूस असणंच त्याला पुरे आहे. यातल्या धर्माच्या रखवाल्यांचाही विश्वास हा स्वतःची सत्ता वाढवण्यावरच अधिक आहे, हे तो जाणतो. त्याची जिंकण्याची व्याख्या केवळ अमुक लढाई जिंकण्याइतकी मर्यादित नाही. आपल्या मनाला पटणारा विजय हा लौकिकदृष्ट्या हार समजला गेला तरी त्याला मंजूर आहे. किंगडमचं वैशिष्ट्य हेच, की तो या नायकाचा दृष्टिकोन समजून घेतो आणि एक पराभूत सरदार न समजता त्याच्या निर्णयाचा मोठेपणा सहजपणे प्रेक्षकांपर्यंत पोचवतो. किंगडम ऑफ हेवनला मी भव्यपटामध्ये येऊ पाहणाऱ्या नव्या विचाराची सुरवात समजेन. आजवर केवळ दिखाऊपणासाठी गाजल्या जाणाऱ्या या चित्रप्रकारालाही काळाचं, समाजाचं आणि परिस्थितीचं भान आल्याचं हे लक्षण आहे. त्या दृष्टीनं पडलेलं हे पहिलं पाऊल आहे म्हणा ना!
-गणेश मतकरी (साप्ताहिक स‌काळमधून)

Post a Comment

  © Blogger template Werd by Ourblogtemplates.com 2009

Back to TOP