एक फोटोग्राफर आणि मुलं
>> Friday, February 15, 2008
शिकागोच्या नॅशनल पब्लिक रेडिओने 1993 मध्ये एक योजना राबविली होती. आयदा बी वेल्स पब्लिक हाऊसिंग प्रोजेक्ट या गरीब वस्तीत राहणाऱ्या लिलन जोन्स आणि लॉईड न्यूमन या दोन मुलांना त्यांनी एका कामासाठी टेपरेकॉर्डर पुरवले. काम होतं ते या वस्तीतल्या लोकांच्या जीवनावर, जिथं काही दिवसांपूर्वीच खाऊवरून झालेल्या भांडणातून एका मुलाला उंचावरल्या खिडकीतून खाली फेकण्यात आलं होतं, एक ऑडिओ डॉक्युमेन्टरी करण्याचं. त्यांनी हे आजूबाजूचं जग इतक्या प्रभावीपणे ध्वनिमुद्रित केलं, की या कामासाठी त्यांना पीबॉडी ऍवॉर्ड देण्यात आलं.
हे आठवलं ते दुसरा एक माहितीपट पाहिल्यावर. ऑस्कर मिळविलेल्या, कलकत्त्याच्या वेश्यावस्तीत वाढणाऱ्या मुलांवर आधारित माहितीपटात याच प्रकारचा एक प्रयोग आपल्याला दिसतो. अमेरिकन फोटोग्राफर झाना ब्रिस्की आणि तिचा सहकारी रॉस कॉफमन यांनी बनविलेल्या या माहितीपटातल्या मुलांना दिले जातात, ते स्टील फोटोग्राफीचे कॅमेरे. त्यांच्या भोवतालच्या जगाला चौकटीत बांधण्यासाठी, त्यांचा दृष्टिकोन कागदावर उमटवण्यासाठी. या फिल्ममध्ये आपल्याला दिसणारी वेश्यावस्ती ही बकाल आहे. इथल्या मुलांची परिस्थिती, समाजात या मंडळींना मिळणारी वागणूक, त्यांचं या पिढीजात वेश्या व्यवसायाच्या चक्रात अडकून राहणं, हे आपल्याला अस्वस्थ करणारं निश्चित आहे; पण परदेशी प्रेक्षकांना बसेल तेवढा धक्का देणारं नाही. कारण हे वास्तव आपल्याला तितंक उपरं नाही. आपल्या समाज व्यवस्थेचा हा एक कीड लागलेला भाग आहे आणि आपण आपल्या सुरक्षित जीवनाच्या चौकटीत सांभाळून राहत असलो तरी त्यांच्या अडचणी आपण जाणून आहोत, निदान काही प्रमाणांत. असं असूनही आपण कधीही या सामाजिक प्रश्नाचा विचार करत नाही. आपण स्वतः सोशल वर्कर नाही, त्यामुळे आपल्याला प्रत्यक्षात या भानगडीत पडण्याचं काही कारणच नाही, अशी एक सोपी सबब पुढे करून आपण आपली या प्रकरणातून सुटका करून घेतो. "बॉर्न इनटू ब्रॉथेल्स'चा विशेष हाच, की झाना ब्रिन्स्कीदेखील कोणी सोशल वर्कर नाही. ती आहे फोटोग्राफर, त्यामुळे प्रत्यक्षात इथल्या प्रश्नांच्या मुळाशी जाण्याची तिला गरज नाही. ती त्रयस्थपणे आपलं काम करून बाहेर पडू शकते; पण ती तसं करत नाही. ती हे जाणून आहे, की आपण सामाजिक बदल घडवून आणू शकत नाही. आपली मदतही फार तर मूठभर मुलांना होईल, हेही तिला माहीत आहे. तरीही आपल्या हातून होईल ते करण्याची तिची इच्छा या माहितीपटात दिसून येते.
फोटोग्राफी क्लास
मुलांसाठी झानाने केलेली सर्वांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे तिने मुलांसाठी काढलेला फोटोग्राफीचा क्लास.दुभाष्याच्या मदतीने तिने या मुलांना आपल्या आजूबाजूला अधिक जाणीवपूर्वक बघायला शिकवलं. तिचा हा प्रयत्न या माहितीपटातून आपल्यापर्यंत चांगल्या रीतीने पोचतो. आपल्याला प्रत्यक्ष मुलं फोटो काढताना दिसतात. आत्मविश्वासाने सर्वत्र फिरण्याचीही त्यांना सवय होताना दिसते. रस्त्यावर, बसमध्ये, प्राणिसंग्रहालयात, कोणत्याही प्रहरी ही मुलं कॅमेरा डोळ्याला लावून असतात. कोणाला प्रत्यक्ष फोटो काढणं आवडतं, तर कोणाला त्यांची हा चांगला, हा वाईट, अशी निवड करणं आवडतं. अनेक जण आपल्या छायाचित्रांविषयी बोलतात. दुसऱ्या कोणाची चित्रं आवडली, का आवडली, हेदेखील बोलतात. गौरला आपल्या वस्तीचा बकालपणा, अस्वच्छता खटकते. आपल्या राहण्याच्या पद्धतीतला गलिच्छपणा तो चौकटीत पकडण्याचा प्रयत्न करतो. या मुलांमध्ये सर्वांत हुशार असणाऱ्या अविजितच्या छायाचित्रात तपशील भरलेले दिसतात. मूळ विषयाबरोबरच आजूबाजूच्या अनेक वस्तू, माणसं, यातून अविजित अधिक व्यक्त होतो. अविजित, कोची, सुचित्रा आणि इतरही मुलांची चित्रं आपल्याला पाहायला मिळतात आणि ती थक्क करणारी असतात. या मुलांची वयं आणि पार्श्वभूमी पाहता त्यांनी दाखविलेली समज, ही कौतुकास्पद असते. बहुधा झानालाही या मुलांच्या नजरेचं कौतुक वाटलं असावं. शिवाय इतके दिवस त्यांच्याबरोबर घालवल्याने वाटणारी आपुलकी होतीच. तिने ठरवलं, की यातल्या शक्य त्या मुलांना या वस्तीतून बाहेर काढायचं. त्यासाठी करण्यात आलेली गोष्ट दुपदरी होती. एक म्हणजे तिने या मुलांसाठी बोर्डिंग स्कूल्स शोधायला सुरवात केली जेणेकरून या मुलांना आपल्या वस्तीत राहावं लागणार नाही आणि सुधारणेला वाव मिळेल. दुसरी गोष्ट म्हणजे या कामाला लागणारी आर्थिक मदत मिळविताना तिने या मुलांच्या कलेचाच आधार घेण्याचा ठरवलं. हा निर्णय योग्य आणि हुशारीचा होता. कारण मुलांच्या आत्मविश्वासात त्याने वाढ झाली असती. त्यांचं नाव आणि कौतुकही काही प्रमाणांत झालं असतं आणि प्रत्यक्ष अर्थसाह्य उभं राहण्याची आशाही होतीच. झानाने ऍम्नेस्टी इंटरनॅशनल या संस्थेच्या मदतीने ठिकठिकाणी या मुलांच्या छायाचित्रांची प्रदर्शनं घडवली. "सोदबीज'सारख्या मातब्बर संस्थेमार्फत या छायाचित्रांचा लिलाव करवला. यादरम्यान अविजितकडे इतक्या मंडळींचं लक्ष वेधलं गेलं, की त्याला एका जागतिक छायाचित्र प्रदर्शनासाठी ऍमस्टरडॅमला जाण्याची संधी चालून आली. अर्थात खऱ्या आयुष्यातले प्रश्न चित्रपटासारखे पटकन सुटत नाहीत. त्याप्रमाणे इथेही ते पटकन सुटले नाहीत. बोर्डिंग स्कूल प्रवेशात अनंत अडचणी आल्या. वेश्यावस्तीत राहतो म्हणून अविजितला पासपोर्ट मिळेना. त्यातून त्याच्या घरी काही कौटुंबिक प्रश्न तयार झाले आणि त्याची फोटोग्राफी मागे पडलेशी लक्षणं दिसायला लागली. "बॉर्न इनटू ब्रॉथेल्स' आपल्या मनाला भिडतो तो वेगवेगळ्या कारणांसाठी. तो आपल्यासमोर जी सत्यकथा उलगडतो, ती माहितीपटाच्या रूक्षपणाने, केवळ माहितीचे तुकडे आणि आकडेवारी देऊन नाही, तर प्रेक्षकाला बरोबर घेऊन, त्यात गुंतवून. या व्यक्तिरेखांचा प्रवास जितका त्यांना स्वतःला अनपेक्षित आहे, तितकाच आपल्यालाही. त्यामुळे आपणही या प्रवासात कधी सामील होतो, ते आपल्याला कळत नाही. त्याच्या या प्रकृतीमुळे तो सांकेतिक माहितीपटाहून अधिक पाहण्यासारखा होतो. त्याच्यातली प्रेक्षकांची भावनिक गुंतवणूकही वाढते अन् त्यातला संदेश एरवीच्या माहितीपटापेक्षा अधिक लोकांपर्यंत पोचण्याची शक्यता तयार होते. त्याचबरोबर यातल्या मुलांच्या प्रश्नावर झानाने काढलेला तोडगा इतका वेगळ्या प्रकारचा आहे, की तोही आपल्याला विचार करायला लावतो. समाजाच्या दुर्दैवी घटकांना मदत करण्यासाठी अमुक एकच मार्ग आहे, असं नाही, हे यातून दिसतं. आपल्या अडचणी सोडवताना, असं काही वेगळ्या प्रकारचं उत्तर काढणं शक्य आहे का, हे पडताळून पाहायला आपण प्रेरित होतो. पण "बॉर्न इनटू ब्रॉथेल्स'चा सर्वांत मोठा गुण हा, की तो आपल्या सर्वांना आपल्या कर्तव्याची जाणीव करून देतो. समाज बदलण्यासाठी आपण स्वतः समाजसेवक असण्याची गरज नाही. संपूर्ण समाजही आपल्या मर्जीप्रमाणे बदलेल, असं नाही. तरीही प्रत्येकाने आपल्याकडून जेवढं होईल ते करण्याची गरज आहे. त्यातून पडलेला फरक हा कितीही सूक्ष्म असला तरी अखेरीस तो सर्वांच्या फायद्याचाच असेल. झाना ब्रिस्कीकडून निदान एवढा धडा तरी आपण घ्यायलाच हवा.
-गणेश मतकरी ( साप्ताहिक सकाळ)
0 comments:
Post a Comment