अशक्य कल्पनांचा आविष्कार
>> Monday, February 25, 2008
खऱया-खोट्याचं,वास्तव-कल्पिताचं,विनोद आणि वैचारिकतेच्या काठाकाठावरून चालणारं बेमालूम मिश्रण पाहायचं असेल तर चार्ली कॉफमन या पटकथाकाराचे चित्रपट जरूर पाहावेत. अत्यंत विक्षिप्त आणि चमत्कृतीपूर्ण कल्पनांना लीलया हाताळण्याची ताकद या विलक्षण हुशार माणसात आहे. `इटर्नल सनशाईन आँफ द स्पॉटलेस माईन्ड`,अँडेप्शन, आणि कॉफमनला पहिल्याप्रथम लोक ओळखायला लागले तो `बीइंग जॉन मालकोविच` हे त्याने लिहिलेले चित्रपट म्हणजे अनपेक्षित घटना आणि चमत्कारिक व्यक्तिरेखा यांचे मोठे भांडारच आहेत.
जॉन मालकोविच` हा हॉलीवूडमधला एक दर्जेदार आणि तऱहेवाईक नट आहे. डेन्जरस लिएजांस, कॉन एअर, आँफ माईन्स अँड मेन`सारख्या चित्रपटातून त्याला भरपूर लोकप्रियता मिळाली आहे. `बीइंग जॉन मालकोविच` या नावावरून वाटतं की हा चित्रपट या नटाच्या वैयक्तिक आयुष्याशी संबंधित, काहीसा चरित्रात्मक वैगैरे असावा. तर त्याचं उत्तर म्हटलं तर होकारार्थी आहे, म्हटलं तर नकारार्थी. म्हणजे यात मालकोविच आहे, त्याचं आयुष्यही आहे. पण बाकी सगळं कॉफमनच्या डोक्यातून आलेलं अफलातून रसायन आहे.
इथला नायक क्रेग (जॉन कुझँक ) आहे एक कठपुतळ्यांचा खेळ करणारा. पण त्याच्या कार्यक्रमांच्या वादग्रस्त विषयांमुळे त्याला कुणीच उभं करीत नाही. त्याची बायको लाटी (कँमरून डीयाझ) एक पेट शॉप चालवते आणि घरीही असंख्य प्राण्यांबरोबर राहते. क्रेग शेवटी नोकरी शोधायचं ठरवतो आणि एका इमारतीच्या साडेसातव्या मजल्यावरच्या आँफिसात नोकरी मिळवतो.
हे साडेसातव्या मजल्याचं आँफिस हा स्वतंत्रपणे एक खूपच विनोदी प्रकार आहे. या मजल्यावर उतरायला सातव्या आणि आठव्या मजल्याच्या मध्ये लिफ्ट बंद करायला लागते आणि लोखंडी पाईप दारातून घुसवून ते उघडायला लागतं. याची उंचीही अर्ध्या मजल्याची आहे आणि सर्वांना वाकून चालायला लागतं. `ओव्हरहेड्स लो` असण्याबद्दलचा विनोदही सर्वांकडून ऎकून घ्यावा लागतो.
तर क्रेग या आँफिसमध्ये मँक्सिन (कँथरिन किनर) या मुलीच्या प्रेमात पडतो, पण ती या बावळट कठपुतळीवाल्याच्या नादाला लागणार नसते. या आँफिसातच एका कपाटामागे त्याला माणूस जेमतेम शिरेल एवढ्या आकाराचं एक बीळ मिळतं. यातनं आत शिरलेला क्रेग पोचतो थेट नट जॉन मालकोविचच्या डोक्यात. म्हणजे आता क्रेग हा मालकोविचच्या डोळ्यातनं जग पाहायला लागतो. पण हे टिकतं केवळ पंधरा मिनिटं. त्यानंतर क्रेग फेकला जातो तो हमरस्त्याजवळच्या एका टेकाडावर.
आता या अविश्वसनिय घटनेचा क्रेग आणि मँक्सिन फायदा घ्यायचं ठरवतात.स्वतःच्या आयुष्याला विटलेल्या लोकांसाठी पंधरा मिनिटं जॉन मालकोविच बनण्याची तिकीटविक्रीच चालू करतात. अशातच मँक्सिन मालकोविचच्या संपर्कात येते आणि लाटी मालकोविचच्या डोक्यात असताना तिच्या प्रेमातही पडते. लवकरच क्रेग, लाटी, मँक्सिन, मालकोविच असा प्रेमाचा अशक्य स्क्वेअर तयार होतो.
`बीइंग जॉन मालकोविच` चा विशेष असा की तो यातल्या कल्पनांच्या सततच्या कोलांटउड्यांनी बिथरत नाही आणि या उड्या शक्य तितक्या साधेपणाने दाखवतो. म्हणजे माणूस मालकोविचच्या डोक्यात शिरला, तर फार काही स्पेशल इफेक्टस वैगैरे दिसत नाहीत. कँमेरा केवळ एका एका चाैकटीतून मालकोवचला जे दिसतं. ते दाखवतो. वेळ संपल्यावर माणसं डोक्यातून हायवेवर फेकली जातात. तिथेही फडद्यावरचा चकचकाट नाही. केवळ हायवेचं दृश्य आणि माणसं आकाशातून पडल्यासारखी पडतात.
चित्रपट अनेक कळीच्या मुद्यांना स्पर्श करतो. माणसाचं स्वत्व म्हणजे काय? माणूस स्वतःला कितपत ओळखतो? प्रेम नक्की शारीरिक असतं की मानसिक? आपल्या हालचालींवर आपला ताबा असतो का? अशा अनेक प्रश्नांची सरळ आणि तिरकस उत्तर तो शोधतो. यात एकमेकांत मिसऴणाऱया विविध विचारांची सरमिसळ आहे. मात्र चित्रपट आपल्या रचनेत कुठेही गोंधळून जात नाही. कमालीच्या चिकाटीने तो यातल्या वळणांचा भाग ठेवतो अन् पाहणाऱयाला संभ्रमात पाडत नाही. हसवतो मात्र भरपूर.
आणखी एक लक्षवेधी गोष्ट म्हणजे यात जॉन मालकोविचने साकारलेली जॉन मालकोविचची भूमिका. स्वतःचंच विडंबन करण्याचा हा उत्कृष्ट प्रयत्न आहे. पडद्यावरचा मालकोविच हा अर्थात खरा मालकोविच नाही. पण त्याची लोकांमधली जी प्रतिमा आहे, त्याचीच ही टिंगल आहे. शांत, गूढ, स्वतःला हुशार समजणारा, लोक आपल्याला विक्षिप्त समजतात, हे माहीत असलेला मालकोविच उभा करणारा हा असामान्य नट, एवढं एक कारणदेखील हा चित्रपट पाहायला पुरेसं आहे.
-गणेश मतकरी ( महानगरमधून)
4 comments:
jabara...
सुरेख परीक्षण. ह्या चित्रपटाची डीव्हीडी अनेकदा दिसली पण पाहिली नाही. आता बघावा लागणार.
अनुदिनी छान आहे.
पंकज, तू लिहिणे बंद केले आहे काय? तुझेही लेख आम्हाला वाचायचे आहेत.
आपला सिद्धार्थही आता हॉलिवूडमध्ये घुसलाय... त्याच्या लेखांचे काय करणार आहात तुम्ही?
फारच चांगले लेख आहेत . आता फक्त वरच्यावर वाचले निंवात मागील सगळ्या पोस्ट बघणार आहे. काही जुन्या हॉलिवुड पटाबद्दल लिहा. तसेच हिंदी चे परिक्षण असलेला ब्लोग सांगा...शुभेच्छा.
अविनाश पाटील
Post a Comment