शब्दांच्या पलीकडले....

>> Thursday, February 7, 2008

जगातल्या एकूण संवादांपैकी फक्त सात टक्के संवाद हा शब्दांच्या माध्यमातून होतो. उरलेला सारा संवाद होण्याची माध्यमं- स्पर्श, सूर, नजरा... अशी अबोल असतात. मग भाषा या घटकाला तसा अर्थ काय उरला? बॉब हॅरिस हा जगप्रसिद्ध मॉडेल एका जाहिरातीच्या निमित्तानं जपानमध्ये येऊन पडलाय. पत्नीशी तुटलेला संवाद आणि सभोवताली पसरलेलं परक्या-अपरिचित भाषेचं जग. आजूबाजूला दिसणारे लोकही त्याच्यामधल्या माणसाला ओळखणारे नव्हेतच. ते ओळखतात मॉडेल असणाऱ्या बॉब हॅरिसच्या प्रतिमेला. त्यांच्या आश्चर्य-आनंदाच्या, आदराच्या प्रतिक्रिया बॉबला अधिकच एकटं करून टाकणाऱ्या. त्याचं वयही असं सीमारेषेवरचं. तारुण्य उलटलंय आणि संध्याकाळच्या सावल्याही तशा लांबच. अशाच एका उदास-कंटाळवाण्या संध्याकाळी बारमधल्या गायिकेचं एकसुरी गाणं ऐकत असताना त्याची नजरानजर शार्लेटशी होते. गंमत म्हणजे शार्लेट त्याची दखल "मॉडेल बॉब हॅरिस' म्हणून घेत नाही. नवरा आणि त्याची मित्रमंडळी अशा गराड्यात असूनही तिला जाणवणारं कंटाळवाणं एकटेपण तिला बॉबच्याही नजरेत भेटतं आणि मग एकमेकांच्या कंटाळ्याची अचूक नोंद घेत एक मित्रत्वाचं हसू दोघेही जण हसतात. इथून एका वेगळ्याच नात्याची सुरुवात होते. नुकतीच ग्रॅज्युएट झालेली आणि लग्नाच्या नव्हाळीतून बाहेर पडणारी शार्लेट आणि परिपक्व बॉब यांच्यातली मैत्री फुलत जाते. कसलेच शरीर संदर्भ आणि कसल्याही अपेक्षा नसलेलं हे निरपेक्ष नातं. काही दिवसांपुरतं. तरीही अतिशय जवळीकीचं. खरंखुरं. बॉबचं काम संपून त्याची घरी परतायची वेळ होते, तेव्हाही ते दोघे जण अगदी सहजपणे एकमेकांचा निरोप घेतात; पण परतताना बॉबला रस्त्यावरून एकटीच फिरणारी शार्लेट दिसते आणि त्याला राहवत नाही. निरोपाची एक घट्ट मिठी मारताना तो तिच्या कानात आपल्याला न कळेलसं काहीतरी कुजबुजतो आणि तिच्या उदास चेहऱ्यावर गोड हसू उमटतं. तो हुरहुरता क्षण पार करून दोघं हसऱ्या चेहऱ्यानं एकमेकांचा निरोप घेतात. आपापलं आयुष्य जगायला... आगळ्यावेगळ्या तरल शैलीत "लॉस्ट इन ट्रान्सलेशन'ची गोष्ट आपल्यापुढे उलगडत जाते. तेव्हा आपणही शब्दांच्या पलीकडल्या प्रदेशात सफर करून येतो. जपानमध्ये येतानाही बॉब आपल्या गाडीच्या खिडकीतून मोठमोठ्या इमारती आणि अनोळखी चित्रलिपीमधल्या निऑन साइन्स न्याहाळतो आहे. पण तेव्हा रस्त्यावर रात्र उतरलेली आणि शार्लेटचा निरोप घेऊन परततानाही तो त्याच परक्žया वाटणाऱ्या इमारती बघतो आहे; पण आता आभाळात उजेड फुटलाय. एका सुरेख नात्यामुळे सुखद आणि सुसह्य झालेला त्याचा हा परतीचा प्रवास! चित्रपटाच्या सुरुवातीचं आणि शेवटचं अशा या दोन विरोधाभासी दृश्यांतून दिग्दर्शिका खूप काही सांगून जाते. काहीशा रोमॅंटिक अशा या गोष्टीला नर्मविनोदाची झालर आहे. जपानी दिग्दर्शकांच्या भारंभार बोलण्यातलं अवाक्षरही न कळल्यामुळे हैराण झालेला बॉब, आपल्या चाहत्यांच्या आक्रमक प्रेमापासून हलकेच पळू बघणारा बॉब, त्याच्या पुरुषी प्रतिमेच्या प्रेमात पडून त्याच्या गळ्यात पडणारी तिथली जपानी स्त्री, तिच्यापासून पळता भुई थोडी झालेला बॉब... अशी बॉबची रूपं आपल्याला हसवून जातात. बॉबची मैत्रीण झालेली शार्लेट लेखिका आहे, हाही एक नजाकतदार तपशील. तिच्या हळवेपणाला, संवादासाठी तडफडणाऱ्या तिच्या मनाला, तिच्या संवेदनशीलतेला त्यामुळे एक वेगळीच किनार मिळते. बॉबला एका परक्žया स्त्रीबरोबर हॉटेलच्या खोलीत बघितल्यावर तिला तिच्या इच्छेविरुद्ध आलेला फणकारा आणि खिन्नपणाही लाजवाब. त्यामुळे तिच्या कोवळ्या वयाला साजेसे रंग तिच्या व्यक्तिरेखेला मिळतात. आपलं हे अनवधानानं घडलेलं प्रकरण तिच्यापासून होता होईतो लपवणारा बॉबही सुरेखच. आपल्या नात्याचा नितळपणा जपण्याची त्याची धडपड त्यातून जाणवते. आणि त्या गोष्टीचा निरर्थकपणाही... या सुंदर प्रवासाचा कळस होतो तो शार्लेटच्या कानातली बॉबची कुजबुज आपल्याला कळत नाही तेव्हा. कान देऊन ऐकण्याचा प्रयत्न करूनही आपल्याला बॉबचे शब्द अजिबात कळत नाहीत. लक्षात येतो तो फक्त तिचा उजळत जाणारा चेहरा. इतक्या अस्फुट गोष्टीवर निरोपाचा प्रसंग बेतणाऱ्या सोफिया कपोलाला सलाम, असं म्हटल्याखेरीज राहवतच नाही.
-मेघना भुस्कुटे (सकाळमधून)

2 comments:

ganesh February 7, 2008 at 5:37 AM  

good job. pankaj mentioned u dont write on cinema anymore. is that a fact?why?

Meghana Bhuskute February 20, 2008 at 2:01 AM  

yeah... just don't have fun any more. It was being mechanical.. And since there are people like you, all I need to express, is already said! Please keep on writing...

Post a Comment

  © Blogger template Werd by Ourblogtemplates.com 2009

Back to TOP