तरल कविता

>> Thursday, February 7, 2008


सिनेमाच्या सुरुवातीलाच दृष्ट लागण्यासारख्या देखण्या फ्रेम्स दिसल्या, की नजर सुखावते; पण जीव धसकतो. सिनेमा "सुंदर' करण्याच्या हव्यासापोटी आशयाची गळचेपी तर होणार नाही ना, अशी पूर्वानुभवावर आधारित भीती वाटते. "ब्रोकबॅक माऊंटन'च्या सुरुवातीला तसंच होतं. निळसर डोंगररांगा, हिरवीगार कुरणं, त्यात वाहणारे नितळ ओढे, मेंढ्यांचे दुडदुडणारे कळप आणि या सगळ्या हळुवार निसर्गाशी नातं सांगणारा एखादाच काऊबॉय... पार्श्वभूमीला तितकंच हळुवार तरल संगीत; पण गोष्ट उलगडत जाते आणि दिग्दर्शक अँग ली आपली भीती निराधार ठरवत जातो. आपल्यासमोर असते ती एक तरल कविता; तिला साजेशा, पूरक दृश्यभाषेतून मांडलेली. जॅक ट् विस्ट (जॅक गेलेनहॉल) व एनिस डेल मार (हीथ लीजर) हे दोघे काऊबॉईज. आयुष्याच्या सुरुवातीला अस्थिर काळात योगायोगानं एकत्र आलेले. ब्रोकबॅक माऊंटनवर एकत्र धनगरकी करीत असताना त्यांची मैत्री होते. मैत्रीच्याही पुढे जाणारं शरीर नातं त्यांच्यात नकळत जडून जातं. सुरुवातीला त्याची त्यांना लाजही वाटते; पण त्यातली सहज नैसर्गिकता ते स्वीकारतात. पुढे दोघांचेही रस्ते बदलतात. मैत्रिणी भेटतात. लग्नंही होतात. जॅकला एक गोड छोकरा; तर एनिसला दोन मुली होतात. पण, त्यांना एकमेकांची ओढ स्वस्थ बसू देत नाही. चार वर्षांच्या दीर्घ काळानंतर ते एकमेकांना भेटतात आणि मग भेटतच राहतात, आपल्या अपरिहार्य नात्याची खात्री पटून, ब्रोकबॅक माऊंटनच्या साक्षीनं. जॅक आणि एनिसचं नातं दिग्दर्शकानं फारच लोभस रंगवलं आहे. ते फक्त मित्र नाहीत; ते परस्परांचे जोडीदार आहेत. त्यामुळे स्त्री-पुरुष नात्यात येणारे सारेच ताणतणाव त्यांना चुकले नाहीत. तशीच त्यासोबत येणारं परस्परांचं मधुर आकर्षणही. त्यांच्या भांडणातून, एकत्र येण्यातून, एकमेकांबद्दलच्या काळजीतून, मारामारीतून आणि शारीर भाषेतून हा नात्याचा गोफ अलगद विणत जातो; शिवाय जगाच्या नजरेतून हे नातं नॉर्मल नसल्याचाही ताण त्यांना आहेच. कायमचं एकत्र येण्याच्या त्यांच्या गरजेवर ती समाजाची भीती कायम छाया धरून असते. ते सिनेमाभर जाणवत राहतं. जॅक आणि त्याच्या बायकोचं नातं, एनिस आणि त्याच्या बायकोचं नातं, एनिसचे त्याच्या दोन पोरींवर असलेलं जीवापाड प्रेम, हे सारं त्या दोघांच्या प्रेमकथेच्या पार्श्वभूमीला असतं. त्यामुळेच त्यांचं माणूसपण गहिरं होत जातं. अखेरीस जॅक मरतो आणि एनिस खऱ्या अर्थानं एकाकी होतो. बायकोशी घटस्फोट झाल्यानंतरही प्रयत्नानं सावरलेला एनिस या धक्क्यानं मात्र खरा खचतो. वाकलेले खांदे - रोडावत गेलेली अंगलट आणि उतरलेला चेहरा अशा देहबोलीतून हीथ लीजरनं ते नेमकं पोचवलं आहे. तो जॅकच्या मरणानंतर जॅकच्या आई-वडिलांना भेटायला जातो, तो प्रसंग या उत्कट प्रेमकथेला उंची देणारा. फारसं न बोलताच त्याचे आई-वडील जॅकच्या आयुष्यातलं एनिसचं स्थान समजून घेतात. एनिस जॅकची खोली पाहायला जातो. तिथे त्याला जॅकचा जुना शर्ट मिळतो. रक्ताचा लहानसा डाग असलेला. त्यांच्यातल्याच एका मारामारीची आणि नंतरच्या मिलनाची आठवण सांगणारा. न राहवून तो शर्ट घेऊन एनिस खाली येतो. जॅकच्या आईची नजर चुकवतच तो शर्ट दाखवतो आणि ती काहीच न बोलता, समजून त्याला तो शर्ट पिशवीत भरून देते... आयुष्यभर बायका-मुलांचा रोष पत्करून, जगाच्या तुच्छतापूर्ण नजरा झेलत जॅक आणि एनिसनं जपलेलं त्यांचं नातं, जॅकच्या आईनं स्वीकारल्याचा हा क्षण. हलवून जाणारा. दोन पुरुषांची असली तरी ती जगावेगळ्या नात्याची गोष्ट नाही; ती एक प्रेमकथा आहे. एकमेकांसाठी झुरणाऱ्या प्रेमिकांची, जगाचा विरोध झुगारून एकमेकांसाठी असणाऱ्या प्रेमिकांची. या नात्यात शरीर तर असतं; पण त्याचा वाटा फक्त एका पायरीपुरता हे दाखवून देणारी ही प्रेमकथा. ई. प्रॉलक्सच्या लघुकथेवर आधारित असलेल्या या तरल गोष्टीला तशीच शैली आवश्žयक होती. कुठेच भडक न होणारी. सुरुवातीपासून शेवटपर्यंत एक लय देत जाणारी. "ब्रोकबॅक माऊंटन' ती लय सांभाळतो आणि म्हणूनच त्यांच्या छायांकनाला "ऑस्कर' पुरस्कार मिळतो. कारण- त्यातल्या फ्रेम्स कथेचा वा आशयाचा संदर्भ सोडून देत नाहीत; तर जॅक-एनिसच्या उत्कट प्रेमकथेला अधिकच गहिरं करतात आणि खऱ्या अर्थानं "देखण्या' ठरतात.
- मेघना भुस्कुटे (सकाळमधून)

0 comments:

Post a Comment

  © Blogger template Werd by Ourblogtemplates.com 2009

Back to TOP