दुःखाची लाखबंद मोहर...

>> Saturday, February 23, 2008


अपंग व्यक्तीला सर्वसामान्य आयुष्य जगणं हेही एक आव्हानच असतं. अशा वेळी त्या अपंग माणसापाशी कलावंतांचं स्पंदणारं मन असेल तर? तर हा संघर्ष अधिकाधिक तीव्र, उत्कट आणि जिवंत होत जातो. दुःखाची धार जितकी अधिक, तितका त्यातून उमटणारा सूर उत्फुल्ल-रसरशीत-दाणेदार. रे चार्ल्सनं आपल्या वादळी आयुष्यातून हे सिद्ध केलं. ऍफ्रो-अमेरिकन कुटुंबातला त्याचा जन्म. त्यामुळे वंशभेद करणाऱ्या अमेरिकन समाजाची हेटाळणीची नजर. वडील नाहीत, त्यात घरची गरिबी. हे सगळं न समजण्याच्या वयातच धाकट्या भावाशी खेळत असताना, एका दुर्दैवी अपघातात त्याचा धाकटा भाऊ पाण्यात बुडून गेला. ही नियतीनं रेच्या कोवळ्या मनावर उमटवलेली पहिली लाखबंद मोहर. त्यातून आलेलं अनामिक दुःख आणि स्वतःच्याही नकळत मनात वस्तीला आलेला अपराधीपणाचा डंख. हे पुरेसं नाही म्हणूनच की काय, वयाच्या सातव्या वर्षीच डोळ्यांना कसलासा आजार होऊन रेची दृष्टी गेली. आता त्याच्या विश्‍वात होती फक्त निश्‍चयी-खंबीर आई आणि संगीताबद्दल वाटणारी ओढ. आईही पावला-पावलाला आधार देऊ करणारी नव्हे, तर रेला आपल्या स्वतःच्या पायांवर आत्मविश्‍वासानं उभं करू पाहणारी. काहीशी डॉमिनेटिंग. तारुण्याच्या उंबरठ्यावर असताना आंधळा रे न्यूयॉर्कमध्ये आला तेव्हा त्याच्या गाठीशी फक्त त्याचं संगीत होतं. सुरवातीच्या संघर्षानंतर जाणकारांनी त्याच्या संगीतामधली जान ओळखलीही. "बी'सारख्या समंजस सहचारिणीचं प्रेम, यश, प्रसिद्धी, समृद्धी हे सगळं त्याच्याकडे चालून आलं. पण रेला सुखाचा घास इतक्‍या सहजासहजी मिळायचा नव्हता. त्याच्या भावाच्या मरणातून आलेल्या गंडानं त्याच्या मनात आपली पाळंमुळं रोवली होती. त्याच्या मनावर कायमचा उमटलेला त्याच्या आईचा ठसाही त्याच्या नकळत त्याला गुदमरून सोडणारा. त्यातूनच मग बीखेरीज इतर स्त्रियांशी संबंध ठेवणं आणि हेरॉईनसारख्या ड्रग्समध्ये अडकणं सुरू झालं. रेचं बंडखोर-जिवंत संगीत जितकं खरं होतं, तितकीच त्याच्या व्यक्तिमत्त्वाची ही अंधारी बाजूही खरी होती. किंबहुना दोन्हीही एकमेकांना पूरकच होत्या. तुरुंग, मानसोपचारतज्ज्ञ, पुनर्वसन केंद्र अशा भयानक वर्तुळातून रेला जावं लागलं. पण त्यातून तो बाहेर आला तो मात्र लखलखीत शुद्ध सोन्यासारखा. त्यानंतरही तो संगीत देत राहिला. अमेरिकाभर पसरलेल्या आपल्या चाहत्यांना तृप्त करीत राहिला. पण ड्रग्जला मात्र तो शिवलाही नाही. त्याचं संगीत अमेरिकेत आजही मानानं विराजमान आहे. जॉर्जियात वंशभेदाला त्याने केलेला विरोध, त्यामुळे तिथल्या प्रेक्षकांनी त्याच्यावर घातलेला बहिष्कार आणि नंतर जाहीर माफी मागून केलेला त्याचा सन्मान हा त्याच्या आयुष्यातला अभिमानास्पद घटनाक्रम. अशा वादळी आयुष्याला चित्रबद्ध करणं हे खायचं काम नाही. रे ला कुरतडत असणारा अपराधीपणा आणि त्याच्या आईची त्याच्या मनावरची गडद सावली हे दोन तपशील दिग्दर्शकानं त्याच्या अंधाऱ्या बाजूसाठी निवडले आहेत. रे ला होणारे विचित्र गूढ भास आणि बालपणाबद्दलच्या त्याच्या रंगीत-उजळ आठवणी यांच्या मदतीनं त्यांनी रे चं व्यक्तिमत्त्व साकारलं आहे. काळ्याशार ओल्या अंधारात अवचित कशावर तरी पाय पडावा आणि मनातल्या भयानं फणा काढावा, असे रे चे हे भास आहेत. त्यांनी व्यापलेला रे च्या मनाचा कोपरा प्रेक्षकांना त्याच्या भीषण गंडाची पुरती चुणूक दाखवतो. तशाच त्याच्या आठवणी. त्या आठवणींमधलं त्याचं घर कायम झळझळत्या उन्हात न्हाणारं. रंगीत रसरशीत आहे. रंगीबेरंगी बाटल्या टांगलेलं तिथलं झाड म्हणजे रे च्या नादप्रेमाचं आणि रंगांना मुकलेल्या त्याच्या दृष्टीचं प्रतीकच. दुःख आणि आनंद अशा परस्परविरोधी प्रवाहात सापडलेला हा कलावंत. आपल्यामधल्या उसळणाऱ्या स्त्रोताला त्याने संगीतातून जोरकसपणे वाट करून दिली. पण त्याचं भरकटणंही त्याच्या ऊर्जेला अपरिहार्यच होतं. असं परस्परविरोधी आव्हानात्मक व्यक्तिमत्त्व जेमी फॉक्‍सनं रेखाटलं आहे. यंदाच्या ऑस्कर पुरस्कारासाठी त्याच्या या व्यक्तिरेखेला नामांकन मिळालंय, ही त्याच्या कामाला पावतीच आहे. बालपणी निरोगी-उत्साही असणाऱ्या रे च्या देहबोलीत हळूहळू बदल होत जातो. अंधत्वानं येणारी असहायता आणि कलावंताची ऊर्जा यांच्यातला अंतर्विरोध जेमीनं जिवंत केला आहे. स्त्रियांबद्दल त्याला वाटणारं आकर्षण, अत्यानंदाच्या वेळी कलाविष्काराच्या वेळी त्याच्या शरीराची होणारी अस्वस्थ हालचाल, ड्रग्जनी त्याच्या शरीरावर केलेला परिणाम हे सगळं जेमीनं कसलाही नाट्यपूर्णतेचा आव न आणता साकारलंय. एरवी काहीसा चाचरणारा रे, गाताना मात्र मुक्तपणे बोलत असतो. हा बारीकसा तपशीलही जेमीनं अचूक पकडलाय. अडखळत, चाचरत होणारं त्याचं बोलणं त्याची अस्वस्थता व्यक्त करतं. रे च्या आईची व्यक्तिरेखाही ठसा उमटवून जाणारी आहे. तिच्या शिडशिडीत-लहानखुऱ्या चणीमधूनही तिच्यातला सळसळता जीवनोल्हास जाणवल्याशिवाय राहत नाही. तिच्या चेहऱ्याची करारी ठेवण आणि चमकणारे डोळे लक्षात राहून जातात. रे च्या आयुष्यामधले काही अनावश्‍यक तपशील टाळले असते तर त्याच्या गोष्टीला अधिक वेग आला असता हे खरंच. पण हा दोष वगळताही, रे चं भावविश्‍व साकारण्याची दिग्दर्शकाची संयत शैली आणि त्याला पुरेपूर साथ देणारा जेमीचा बंद्या रुपयासारखा खणखणीत अभिनय ही "रे' बघण्यासाठी पुरेशी सबळ कारणं आहेत.

- मेघना भुस्कुटे (सकाळमधून)

2 comments:

Abhijit Bathe April 11, 2008 at 12:29 AM  

मेघना - I am confused.
हे परिक्षण तु सकाळ मध्ये लिहिलयस का?

Meghana Bhuskute June 2, 2008 at 8:55 AM  

होय. 'मुंबई सकाळ'मधे काही वर्षांपूर्वी.

Post a Comment

  © Blogger template Werd by Ourblogtemplates.com 2009

Back to TOP