फ्रेंच एंगेजमेंट

>> Thursday, February 21, 2008


जॉन-पीटर जुनेट आणि मार्क कारो या दोन फ्रेंच दिग्दर्शकांनी एकत्रितपणे चित्रपट बनवायला सुरवात केली ती 1992 मध्ये. पहिल्या चित्रपटापासूनच ही नावं लोकांच्या चांगली लक्षात राहिली. कारण त्यांनी बनवलेले दोन चित्रपट सर्वांच्या पसंतीला उतरण्यातले नसले, तरी विक्षिप्त ब्लॅक कॉमेडी म्हणून नाव मिळवून गेले. या दोन्ही चित्रपटांचे विषय चमत्कारिक होते. पहिला होता डेलिकसी (1992)- ज्यात अन्नटंचाई असलेल्या भविष्यातल्या जगाचं चित्रण होतं. जिथे खाटकाचा सहायक म्हणून राहिलेल्या नायकाला नोकरीवर ठेवण्यात मालकाचा इरादा असतो तो त्याला प्रत्यक्ष खाद्य म्हणून वापरण्याचा. दुसऱ्या "सिटी ऑफ लॉस्ट चिल्ड्रन'मध्ये एक वेडा शास्त्रज्ञ लहान मुलांचं अपहरण करतो ते त्यांची स्वप्नं पळवण्यासाठी. कारण त्याचं स्वतःचं वय हे स्वप्नांच्या अभावे झपाट्याने वाढायला लागलेलं असतं. या दोन्ही चित्रपटांचे नाव आहे ते त्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण दृश्‍य शैलीसाठी, आणि विषयातला भयानकपणा सांभाळूनही दिग्दर्शकांनी कथेत आणलेल्या विनोदासाठी. अर्थात हे दोन चित्रपट पाहिल्यावर या जोडीविषयी प्रेक्षक आणि समीक्षकांनी काही विशिष्ट मतं बनवली, आणि सर्जनशील परंतु आम प्रेक्षकांसाठी नसणाऱ्या चित्रपटांच्या दिग्दर्शकांमध्ये त्यांची गणना करून टाकली. कारोने पुढे दिग्दर्शन केलं नाही. जुनेटने हॉलिवूडची "एलिअन ः रेझरेक्‍शन' हा एलिअन चित्रपट मालिकेचा चौथा भाग बनवण्याची ऑफर स्वीकारली, आणि मग फ्रान्सला परत गेला. आता मात्र जुनेटने आपल्याबद्दल असणाऱ्या सर्व समजांना खोटं पाडलं, आणि केवळ फ्रान्समधल्याच नाही, तर जगभराच्या सर्व प्रेक्षकांना आपला वाटेल असा चित्रपट पडद्यावर आणला. 2001 चा "एमिली' जो "लगान' आणि "नो मॅन्स लॅंड'बरोबर ऑस्कर स्पर्धेत होता, आणि त्यालाच बक्षीस मिळेल, अशी अनेकांची समजूतही होती. एमिली हा जुनेटच्या आधीच्या चित्रपटांहून संपूर्णपणे वेगळा होता. त्यात गडद छटा नावालाही नव्हत्या. छोट्या छोट्या गोष्टींमधला आनंद लोकांपर्यंत पोचवून जगाचं भल करण्याची इच्छा असणाऱ्या एका प्रसन्न मुलीची ही गोष्ट होती. एमिलीच्या यशाने आडाखेबाज समीक्षक संभ्रमात पडले, आणि आता हा दिग्दर्शक कोणता नवा रस्ता निवडतो, हे पाहण्याच्या तयारीला लागले.
विरुद्ध दृश्‍य भाषांचं एकत्रीकरण
एमिलीनंतरचा जुनेटचा चित्रपट "ए व्हेरी लॉंग एंगेजमेंट' नुकताच पाहण्यात आला. गडद आणि प्रसन्न, नकारात्मक आणि सकारात्मक, गंभीर आणि विनोदी, अशा सर्वच छटांना एकत्र करणारा हा चित्रपट सादरीकरणातही पारंपरिक आणि आधुनिक अशा दोन विरुद्ध दृश्‍य भाषांना एकत्र करताना दिसतो, तेही अत्यंत सफाईने; दिग्दर्शकीय हुशारीचं प्रदर्शन न करता. या चित्रपटाचा विषय पाहायचा तर सरळ गंभीर या सदरात मोडणारा आहे. ही प्रेमकथा, शोधकथा आणि युद्धकथा या तीनही परस्परभिन्न प्रकारांना चित्रपट वैशिष्ट्यपूर्ण पद्धतीने जोडतो. कथा घडते ती प्रामुख्याने 1920 मध्ये. मात्र अनेक वेळा भूतकाळात उड्या घेऊन ती 1917 मधला कथाभागही सांगते. पहिलं महायुद्ध हे त्यावर गेलेल्या सैनिकांसाठी अतिशय त्रासदायक युद्ध होतं. मानसिकदृष्ट्यादेखील. विरुद्ध देशांचं सैन्य समोरासमोरच्या छावण्यांमध्ये महिनो न्‌ महिने तळ ठोकून बसलेलं असे. या काळातलं वाट पाहणं, अधेमधे युद्ध पुकारणं, पण बहुतेक वेळा थंडी-वाऱ्या-चिखलाला तोंड देत बसणं अनेक सैनिकांना सहन होत नसे. मग यावर अखेरचा आत्महत्येचा तोडगा अनेक जण स्वीकारीत. याहून अधिक आशावादी, घरची ओढ असणारे सैनिक स्वतःलाच जखमी करून घेत आणि सैन्यातून सुटायचा प्रयत्न करीत. मात्र यात एक गोम होती. जर का वरिष्ठांच्या लक्षात आलं, की ही सैन्यातून बाहेर पडण्याची युक्ती आहे, तर स्वतःलाच जखमी केल्याच्या आरोपाखाली त्यांना मृत्युदंड मिळे. मथिल्डा (ऑड्रे टॉटो, एमिलीचीच नायिका) हिच्या मानेक (गास्पार युलिटेल) या प्रियकरालाही अशीच शिक्षा झालेली आहे. मात्र ही शिक्षा अमलात आणली गेल्याचा पुरावा मात्र मथिल्डाकडे नाही. आता सुमारे तीन वर्षांनंतरही मथिल्डा आपल्या प्रियकराच्या मृत्यूबद्दलचं सत्य मान्य करायला तयार नाही. तिला आतून वाटतंय, की तो अजूनही जिवंत आहे. त्याला शोधून काढण्यासाठी ही पायाने किंचित अधू मुलगी जिवाचं रान करते. सैन्याची कागदपत्रं शोधून पाहते, प्रायव्हेट डिटेक्‍टिव्हला कामाला लावते, पेपरात जाहिराती देते, प्रत्यक्ष मृत्युस्थळीही जाऊन येते. मानेकला प्रत्यक्ष मरताना पाहणारा कोणी नसला, तरी युद्धानंतर त्याचं काय झालं, हे जाणणाराही कोणी माणूस नसतो. मानेकप्रमाणेच शिक्षा झालेल्या पाच जणांना प्रत्यक्ष गोळ्या न घालता, जर्मन आणि फ्रेंच छावण्यांमधल्या नो मॅन्सलॅंडवर सोडण्यात आलं, अन्‌ त्यातले बहुतेक जण दगावले हे मॅथिल्डाला माहीत असतं, पण पुढची बातमी मिळणं मुश्‍कील होत जातं. तपशील युद्धाचा
"ए व्हेरी लॉंग एंगेजमेंट'चा प्राण जर प्रेमकथेचा असला, तर तपशील युद्धकथेचा आहे, अन्‌ सादरीकरण रहस्यपटाप्रमाणे आहे. पटकथा एमिलीच्या शोधप्रयत्नांबरोबर पुढे सरकते, आणि समोरचं चित्र हळूहळू स्पष्ट व्हायला लागतं. मात्र मिळालेली माहिती नेहमीच योग्य दिशेला नेते असंही नाही. कधी कधी ती या तपासाला भरकटतदेखील नेते. उदाहरणार्थ- पाचांतल्या एकाचा मृत्यू मथिल्डा ग्राह्य धरते तो या फ्रेंच सैनिकाने घातलेल्या जर्मन बुटांमुळे. कारण मृत्युमुखी पडलेल्या एका सैनिकाच्या पायांत हे बूट असल्याचं तिला कळलेलं असतं. पुढे लवकरच माहिती मिळते, की छावणीबाहेर पाठवताना त्याने एका मित्राबरोबर बूट बदलले होते. याचा अर्थ मेलेला माणूस हा पाच जणांपैकी नसून, वेगळाच कोणी असतो. युद्धचित्रणाच्या बाबतीतही एंगेजमेंट हा संपूर्णपणे काळाबरोबर आहे. युद्धावर गरजेहून अधिक वेळ तो रेंगाळत नाही, पण प्रेक्षकांची भिडभाड न ठेवता तो स्पीलबर्ग स्कूलप्रमाणे युद्ध आहे तसं रोमॅंटिक न करता पाठवतो. असं असूनही यातला सर्वांत छान भाग आहे तो या अतिशय गंभीर विषयाच्या कथेत ठेवलेला प्रसन्नपणा आणि विनोदाचा शिडकाव्याचा. नायिकेचा आशावाद हा या चित्रपटात पूर्ण पसरलेला आहे- जो चित्रपटाला निराशेकडे झुकू देत नाही. एका परीने पाहायचं तर हा चित्रपट जुनेटच्या पहिल्या दोन चित्रपटांना नंतरच्या एमिलीच्या सुराबरोबर सांधतो. आता हा दिग्दर्शक आपल्या मूळच्या विचित्र विषयांकडे न वळता, याच प्रकारचे, सर्वांपर्यंत पोचणारे चित्रपट करत राहिला तर उत्तम होईल. कारण त्याच्या कलेचा आस्वाद जितका अधिक लोकांना घेता येईल तितकं चांगलं. केवळ थोडक्‍या प्रेक्षक वर्गावर ती दवडणं हा तिचा अपव्यय ठरेल.
-गणेश मतकरी ( साप्ताहिक स‌काळ)

Post a Comment

  © Blogger template Werd by Ourblogtemplates.com 2009

Back to TOP