हाऊ टू मॅडमॅन मेक अ फिल्म
>> Saturday, February 16, 2008
सिनेमातला नायक बनण्याची सुप्त इच्छा प्रत्येक तरुणाच्या मनात असते. आदर्श नायकही कसा? तर एखाद्या संकटग्रस्त मुलीची मदत करणारा. तिच्या जीवनात सुखाची पखरण करणारा व चित्रपटाअखेर तिचे चुंबन घेणारा!
ह्यूजो आणि तिनचेक हेदेखील असे स्वप्नाळू तरुण. रुग्णालयात मानसोपचार घेणारे. काहीसे मतिमंद. चित्रपट बनविण्याच्या वेडापायी त्यांच्या हालचालींवर नजर ठेवण्यासाठी वापरात असलेला कँमेरा घेऊन ते पळ काढतात व सुरू होते आगळ्या-वेगळ्या चित्रपटाचे शुटिंग.
व्हायको अँन्जेलिक .या स्लोव्हेनियाच्या तरुण दिग्दर्शकाने आपल्या हाऊ टू मॅडमॅन मेक अ फिल्म (लास्ट सपर) या पहिल्याच चित्रपटात ह्युजो आणि तिनचेक या दोन मतिमंद तरुणांची कथा अनोख्या पध्दतीने सादर केली आहे. ह्युजो आणि तिनचेक रुग्णालयातून पळ काढतात आणि त्यानंतर आपण पाहतो ते ह्युजोच्या हातातला कँमेऱयाने चित्रबध्द केलेला चित्रपट.
या चित्रपटाचा नायक आहे तिनचेक. तिनचेक आणि ह्यूजो यांना पलायन प्रवासात भेटलेली सर्व माणसे त्यांच्या चित्रपटाच्या व्यक्तिरेखा बनून जातात. वास्तव जीवनातल्या अस्सल, खऱय़ाखुऱया माणसांना ह्युजो कँमेरात कैद करतो. तिनचेक नायक बनण्यासाठी हरप्रकारे प्रयत्न करू लागतो. सिनेमातल्या नायकाला सहजपणे शक्य होणारी गोष्ट खऱया जीवनात प्राप्त होणे किती कठीण असते याचा प्रत्ययही त्याला येऊ लागतो. काही सुंदर स्रियांना आपल्याकडे आकर्षित करण्याचा प्रयत्नही तो करतो. पण व्यर्थ!
अखेरीस एका देखण्या तरुणाचा माग काढत ते तिच्या घरापर्यंत पोहोचतात. तिच्या घरातील पलंगाखाली लपून ह्यूजो चित्रिकरण करत राहतो. ही तरुणी असते मॅग्डोलेना. मँग्डानेलाच्या प्रियकराने तिला वेश्याव्यवसायात ढकललेलं असतं. या व्यवसायाला कंटाळून तिने आत्महत्या करण्याचा निर्णय घेतलेला असतो. ह्युजो आणि तिनचेक मॅग्डानेलाला आत्महत्या करण्यासाठी मदत करायचे ठरवतात. अट फक्त एकच. मॅग्डानेला आत्महत्येपासून वाचविण्याचे,म्हणजेच तिनचेकला नायक म्हणून सिध्द करणारे दृश्य चित्रित करण्याची परवानगी ते मँग्डालेनाकडून घेतात. मँग्डानेलाच्या आत्महत्येपूर्वी `अखेरचे जेवण` घेण्यासाठी ह्युजो तिला आपल्या आजीच्या घरी नेतो. आतापर्यंत निर्दयी जगात वावरलेली मॅग्डालेना, ह्युजो,तिनचेक व आजी यांच्या अकृत्रिम प्रेमाने हरखून जाते. तिनचेक नायक होण्यासाठी उत्सुक असतो. तो व ह्युजो मॅग्डालेनाच्या आत्महत्येची तयारी पूर्ण करतात. या पळून गेलेल्या रुग्णांच्या मागावर असलेले रुग्णालयातील कर्मचारी व मँग्डानेलाचा प्रियकर त्याचवेळी तेथे येऊन पोहोचतात.
हाऊ टू मॅडमॅन मेक अ फिल्म किंवा लास्ट सपर अनेकार्थाने वैशिष्टयपूर्ण आहे. नायक मतिमंद, तर नायिका वेश्या. समाजाने नाकारलेल्या या घटकांमधील निरागस नाते टिपता टिपता दिग्दर्शक समाजातल्या व्यंगावर नेमकेपणाने बोट ठेवतो व रुढार्थाने मतिमंद तरुणांना वास्तव जीवनातील नायकपण बहाल करतो.
-संतोष पाठारे
1 comments:
'मुलीची मदत' की 'मुलीला मदत'?
ही विभक्ती कायमचीच बदलली असं समजायचं की काय? :(
Post a Comment