तैवानी प्रतिबिंब
>> Monday, February 11, 2008
एका तैवानी कुटुंबातला लग्नसमारंभ. ग्रुप फोटोची तयारी चाललेली. गर्दीत पुढं यांग-यांग हा छोटा- सहा-सात वर्षांचा मुलगा उभा. त्याच्या मागे तीन-चार मुली. यांग-यांग (जोनाथन चांग) पुढे पाहत असताना हळूच एक मुलगी मागून टपली मारते. तो वळून पाहतो, पण एव्हाना मुली साळसूदपणे उभ्या. काही वेळानं दुसरी मुलगी तेच करते. यांग-यांग वळेपर्यंत जैसे थे. हा प्रसंग तसा साधा, अगदी कोणत्याही लग्नसमारंभात पाहायला मिळण्यासारखा; पण दिग्दर्शक एडवर्ड यांगच्या "यीयी' (yiyi) या तीन तास चालणाऱ्या प्रदीर्घ आणि अर्थपूर्ण चित्रपटात तो एक महत्त्वाचं कथासूत्र मांडण्यासाठी वापरला जातो. हे सूत्र अर्थातच या प्रसंगात स्पष्ट होत नाही. त्यासाठी आपल्याला काही काळ वाट पाहावी लागते. पुढं एका प्रसंगात यांग-यांग आपल्या वडिलांना म्हणजे चित्रपटाचा नायक एन.जे. (निन-जेन वु) याला विचारतो, की आपण फक्त समोरचंच पाहू शकतो; मग आपल्याला संपूर्ण सत्य कसं कळू शकेल? या आपल्या नजरेच्या किंवा दृष्टिकोनाच्या मर्यादेनं यांग-यांग एका परीनं झपाटून जातो. वडिलांनी दिलेल्या कॅमेराचा उपयोगही तो पाठमोऱ्या माणसांचे फोटो काढण्यासाठी करतो. त्या त्या माणसाला त्याच्या नजरेला कधीच पडू न शकणारा भाग दाखवण्यासाठी. यांग-यांगला पडलेला प्रश्न बालसुलभ असला आणि तो मांडताना दिग्दर्शकानं मांडलेली उदाहरणं, म्हणजे यांग-यांगला टपली कोण मारतंय हे न कळणं किंवा पाठमोरे फोटो काढणं, ही गमतीदार आणि मुलांच्या विश्वाबरोबर सहजपणे मिसळणारी असली, तरी दिग्दर्शकाला अभिप्रेत अर्थ हा अधिक खोलवर जाणारा आहे. जगातला प्रत्येक माणूस हा त्याच्या दृष्टिकोनानं बांधलेला असतो आणि त्याच्यापुरते अर्थ त्यानं काढले तरी कोणत्याही गोष्टीचा त्रयस्थपणे आणि सर्व पैलूंनी विचार करणं त्याला अशक्य असतं, असं हा चित्रपट मांडतो. अतिशय सोप्या शब्दांत, सहजपणे आणि आपण काही वैश्विक सत्य सांगत असल्याचा आव न आणता. 2000 च्या कान चित्रपट महोत्सवात सर्वोत्कृष्ट दिग्दर्शनाचं पारितोषिक पटकावणारा हा चित्रपट अमुक एका चित्रप्रकाराच्या लेबलाखाली बसण्यासारखा नाही. एका उच्च मध्यमवर्गीय कुटुंबाच्या जीवनात काही महिन्यांच्या कालावधीत घडणाऱ्या घडामोडी इथं पाहायला मिळतात. एका लग्नापासून सुरू होणारा हा चित्रपट त्याच कुटुंबात घडणाऱ्या एका व्यक्तीच्या मृत्यूनं संपतो. मध्यंतरीच्या कालावधीत एका मुलाचा जन्म, एक आत्महत्येचा प्रयत्न आणि एक खून अशा ठळक आणि मेलोड्रामाच्या दिशेनं प्रवास करण्यासाठी चालतीलशा जागा पटकथेत येतात; पण चित्रपट कुठंही अतिनाट्याच्या वाटेला जात नाही.
अस्सल चित्रण
एन.जे., त्याची पत्नी मिन-मिन (एलेन जिन), मुलगी टिंग-टिंग (केली ली) आणि मुलगा यांग-यांग हे इथलं प्रमुख कुटुंब. एन.जे. त्याच्या व्यवसायात काही अडचणींना तोंड देतोय. अशातच त्याची भेट शेरीशी (सु-युन को) होते. शेरी ही त्याची महाविद्यालयीन काळातली प्रेयसी. पण हा संबंध एन.जे.नं काही वैयक्तिक कारणासाठी संपवलेला. आता शेरी ही तिच्या वैवाहिक आयुष्यात सुखात आहे. मिन-मिनच्या आईला याच सुमारास काही अपघात होतो आणि पुढं आलेल्या प्रदीर्घ आजारपणात निराश झालेली मिन-मिन अध्यात्माचा आधार घेते. शेजारच्या घरातल्या लिलीचा मित्र फॅटी (पॅन्ग चांग यु) हा टिंग-टिंगकडे आकर्षित होतो आणि तिचं विश्व थोडं बदलायला लागतं. इकडं यांग-यांगच्या शालेय जीवनातही काहीशा याच प्रकारच्या घडामोडी व्हायला लागतात. एन.जे. शेरीशी संपर्क वाढवायचं ठरवतो आणि कुटुंबाच्या समस्या वाढण्याची चिन्हं दिसायला लागतात. बहुधा चित्रपटांमध्ये असं दिसतं, की कथा या घडवल्या जातात. पात्रं घेत असलेले निर्णय हे प्रत्यक्ष व्यक्तीपेक्षा व्यक्तिरेखा घेईल, असे घेतले जातात आणि गोष्ट पुढं जाण्यासाठी अनेक तडजोडी केल्या जातात. पडद्यावरची पात्रं फारसा विचार करताना दिसत नाहीत आणि रचना ही बहुधा शेवटावर नजर ठेवून आकाराला आलेली दिसते. "यीयी'चा विशेष म्हणजे हे चित्रकर्त्यांचे आडाखे आणि चित्रपट बांधण्याचे प्रयत्न इथं जाणवत नाहीत. कितीही लहान-मोठं पात्र असो, त्याला कथेला पुढं नेण्याची घाई झाल्याचं दिसत नाही. ती आपल्या गतीनं काम करतात, आपल्या गतीनं आणि कुवतीनं विचार करतात आणि अत्यंत नैसर्गिकपणे वागतात. त्यांचं कुठंही नकली न होणं, या चित्रपटाला वेगळ्या उंचीवर नेतं. मनुष्यस्वभावाचं बारकाईनं केलेलं निरीक्षण, ही या चित्रपटातली महत्त्वाची बाजू. चित्रपटातल्या सर्व वयाच्या पात्रांच्या चित्रणात हे दिसून येतं; मग ते व्यावसायिक यशासाठी तडजोडी करायचं नाकारून घरी बसणारं एन.जे.सारखं प्रमुख पात्र असो किंवा एन.जे. आणि त्याच्या मित्राला हॉटेलमध्ये "तुम्ही जुगार तर खेळत नाही,' असा प्रश्न विचारून दुसऱ्या क्षणी "कोण जिंकलं?' असं विचारणारं, केवळ काही सेकंद पडद्यावर येणारं वेटरचं पात्र असो. चित्रपटाची लांबी आपल्याला न जाणवण्याचं कारण काही प्रमाणात हे अस्सल चित्रण आहे, जे आपल्याला अनेकदा आपण चित्रपट पाहतोय हे विसरायला लावतं आणि या कुटुंबाच्या सुख-दुःखात आपल्याला एखाद्या हितचिंतकाप्रमाणे सहभागी करून घेतं. यातल्या आजीच्या पात्राचा, पटकथेच्या दृष्टिकोनातून खास उल्लेख करण्याची आवश्यकता वाटते. हे पात्र चित्रपटाच्या बहुतेक काळ कोमामध्ये आहे. त्यामुळे ते प्रत्यक्ष घटनांमध्ये सहभागी होत नाही; पण दिग्दर्शकानं अनेक पात्रांना या आजीच्या संपर्कात आणलं आहे. ती एकप्रकारे या व्यक्तिरेखांचा साऊंडबोर्ड आहे. डॉक्टरांनी ती बरी होण्यासाठी सल्ला दिलेला आहे, की बेशुद्धावस्थेत असूनही तिच्याशी बोलत राहण्याची आवश्यकता आहे आणि प्रत्येक जण वैयक्तिकपणे या पात्राशी जो संवाद साधतो, तो चित्रपटाच्या आणि व्यक्तिरेखांच्या जडणघडणीत महत्त्वाचा ठरणारा आहे. त्या-त्या पात्राच्या स्वभावाचं प्रतिबिंबही या एकतर्फी संभाषणांवर पडलेलं दिसतं. उदाहरणार्थ टिंग-टिंगच्या मनात अपराधाची भावना आहे, की आजीच्या या अवस्थेला आपणच जबाबदार आहोत. या संवादातून ती माफीची अपेक्षा करते आणि मनाच्या चलबिचलीला वाट करून देते. तिचे प्रसंग हे चित्रपटाच्या अखेरीला खास महत्त्वाचे ठरतात. एका प्रसंगी एन.जे. या संवादालाच शब्दांत पकडण्याचा प्रयत्न करतो. म्हणतो, "हे थोडं प्रार्थना करण्यासारखं आहे. आपलं म्हणणं पलीकडच्या व्यक्तीला ऐकू येतंय की नाही, हे कळायला मार्ग नाही आणि आपलं बोलणं कितपत प्रामाणिक आहे याचीही शाश्वती नाही.'
आपल्या समाजाचं प्रतिबिंब
चित्रपट प्रेक्षकाला सतत गुंतवून ठेवत असला, तरी त्यातलं रचनेचं सौंदर्य अचानक समोर आणून देणारा भाग आहे तो जवळजवळ दोन-तृतीयांश चित्रपट झाल्यानंतरचा. हा भाग एन.जे.च्या टोकिओ प्रवासाशी संबंधित आहे. मिंग-मिंग या वेळपर्यंत पुरती निराश झाली आहे आणि एका आश्रमात वस्तीला जाऊन राहिली आहे. एन.जे. कामानिमित्तानं टोकिओला जातो आणि आपल्या जुन्या दिवसांना स्मरत शेरीलाही तिथं बोलवून घेतो. हा भाग या दोन व्यक्तिरेखांना आपल्या जुन्या आठवणी जागवताना दाखवतो आणि त्याला समांतर म्हणून एन.जे.च्या दोन मुलांच्या आयुष्यात येणारी प्रेमाची पहिली चाहूलही चित्रित करतो. जवळजवळ एक स्वतंत्र चित्रपट होण्याची क्षमता असणाऱ्या या भागातून "यीयी'मधलं आणखी एक कथासूत्र समोर येतं- ते म्हणजे गतकाळात हातून निसटलेल्या संधींचा पाठपुरावा आणि आपण घेतलेले निर्णय चुकले का किंवा वेगळे निर्णय आपल्याला कोणत्या नव्या दिशेला घेऊन गेले असते, याचा विचार करणारा आपला स्वभाव. चित्रपट हा भूतकाळ एन.जे.समोर उभा करतो आणि आपल्या सर्वांच्याच मनातल्या काही सुप्त जखमांना वाचा फोडतो. असं असूनही अखेरीस चित्रपटाचा विश्वास आहे तो मात्र प्राक्तनावर. प्रत्येकाचं आयुष्य दुसरी संधीही बदलू शकणार नाही, या मतावर तो ठाम आहे. मात्र, हा विचार तो आपल्यावर लादत नाही. आपल्याला याच निर्णयापर्यंत पोचण्याची दिशा मात्र दाखवतो. वरकरणी साधा सोपा वाटला तरीही "यीयी' हा तैवानी चित्रपट अत्यंत कौशल्यानं सादर करण्यात आला आहे. यांतली एकही व्यक्तिरेखा आपल्या वंशाची नसली तरी हा समाज जणू आपल्या समाजाचं प्रतिबिंब आहे. त्यामुळे कोणीही परकं वाटत नाही. इथं लग्नाचं जेवण सोडून मॅक्डोनल्डमध्ये जाणारा आणि टेबलवर बॅटमॅन रॉबिनची चित्रं लावणारा मुलगा आपला जसा पाहण्यातला आहे, तसाच तत्कालीन स्वार्थासाठी हलक्या प्रतीच्या कंपनीबरोबर कॉन्ट्रॅक्ट करणारा एन.जे.चा बिझनेस पार्टनरही. मैत्रिणीची पत्रं पोचवताना स्वतःच तिच्या मित्राकडे आकर्षित होणारी मुलगी जशी पाहण्यातली आहे, तशीच जबाबदाऱ्यांनी थकून गेलेली, सुटकेचा मार्ग शोधणारी तिची आईही. हे सगळे जण आपल्याला जो अनुभव देतात, तो केवळ चित्रपटाच्या सांकेतिक व्याख्येमधून व्यक्त होण्याजोगा नाही. त्यापलीकडे जाऊन तो आपल्या मनाशी थेट संवाद साधणारा आहे. आपल्या माणूस म्हणून असणाऱ्या मर्यादांचा आणि परिपूर्णतेचा साक्षात्कार घडवणारा आहे.
-गणेश मतकरी ( साप्ताहिक सकाळमधून)
-गणेश मतकरी ( साप्ताहिक सकाळमधून)
0 comments:
Post a Comment